22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeविशेषएक दिवस...बाबासाठी...

एक दिवस…बाबासाठी…

आईची महती मोठी आहेच; पण प्रसंगी पितासुद्धा तेवढ्याच समर्थपणे आईपण निभावतो. असे आज नाही तर इतिहासात असे प्रसंग आहेत. वडिलांची इच्छा पूर्ण करतांना मुले आपण मुलगा आहे की मुलगी आहे याचा विचार करीत नाहीत. हीच आजच्या पिढीची यशस्विता आहे. बरेचदा मुलांना विचारले की मोठेपणी कोण होणार? तर बरेचदा ‘मी बाबासारखा होणार’ असे उत्तर मिळते. मुलीही म्हणतात मी मोठेपणी बाबा होणार. असा हा गोड दिवस खूप छान जावो. आज ‘फादर्स डे’च्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.

एकमत ऑनलाईन

आई-बाबा वंदनीय असणं हे सार्वत्रिक आहे. जगाच्या पाठीवर जिथे म्हणून जीव आहेत तिथे ही मातृभावना, पितृभावना आहेच आहे. ही भावना अजरामर आहे. प्राणिमात्रांमध्ये एवढेच नव्हे तर निसर्गामध्ये हा भाव दिसून येतो. ईश्वराने सृष्टी निर्माण केली, त्याचबरोबर काही सुंदर भावना मानवाच्या मनात सहजगत्या पेरल्या. काही मानवाने स्वत:हून निर्माण केल्या. एकूणच मानवी जीवन फार सुंंदर आहे. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही दिवस जाणून योजिले आहेत. निसर्गपूजा पण आपल्याकडे प्रमुख महत्त्वाची मानली जाते. उगीच नाही म्हणत देवांनासुद्धा मानव जन्म घ्यावासा वाटला तर तो भारतात घ्यावासा वाटतो. कारण इथली संस्कृती, नातेजपणूक आणि कृतज्ञताभाव! आपल्याकडे म्हणतात ना मातृदेवो भव! पितृदेवो भव! गुरूदेवो भव! नित्य वंदनीय अशी ही त्रयी! त्यांच्या पूजनासाठी कोणत्याही विशेष दिवसाची आवश्यकता नाही.

आजही बाहेरगावी जाताना किंवा येताना आईवडिलांना नमस्कार करण्याची पद्धत सर्वत्र सारखी आहे. याला कारण आपल्याकडील कुटुंबसंस्था! एकत्र परिवार हा एक मोठा फायदा त्यामुळे मिळतो. आज घरं दुभंगली कारण काही असो. एकमेकांसाठी हवा तसा वेळ देता येत नाही. म्हणून या दिवसांना महत्त्व आले आहे. खरे तर त्यामुळे मजा येते. जगण्यातला तोचतोपणा काहीसा कमी होतो.

‘फादर्स डे’ मागची कथा फार टची आहे. कुठल्याशा देशातील एका मुलीने आपल्या वडिलांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी ‘फादर्स डे’ची मागणी केली होती. कारण तिच्या आईच्या पाठीमागे तिच्या वडिलांनी तिच्या चारही बहिणींसह तिचा सांभाळ फार प्रेमाने केला. आईची महती मोठी आहेच पण प्रसंगी पितासुद्धा तेवढ्याच समर्थपणे आईपण निभावतो. आज नाही तर इतिहासात असे प्रसंग आहेत. मुलांसाठी आर्ईबाबा नेहमीच आदर्श असतात. मुलं जन्माला येतात त्यात जसा आईबाबाचा समान वाटा असतो तसा तो नंतरही राहतो. पूर्वीच्या काळी यात थोडा फरक जरूर होत असे कारण त्यावेळी जीवनमान वेगळे होते. वडिलांचे मुलाशी मोकळे संबंध नसायचे पण प्रेम नाही असं मात्र नव्हतं. लक्ष जरूर असायचं. एकत्र कुटुंबपद्धती असायची. घरातल्या सर्व मुलांकडे कुटुंबप्रमुखाचे बारीक लक्ष असायचे.

मुलींना मोकळेपणा फारसा नसायचा. न आवडलेल्या मुलांशी लग्न करावं लागायचं. पण त्याहीवेळी काही मुलींना आपल्या मनाप्रमाणे लग्न करण्यात वडिलांनी न बोलता मदत केलेली आहे. मनाचा मोकळेपणा त्याही वेळी होताच. माझा एक काका होता त्याला सैन्यात जायचे होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्या आजोबांनी त्याची इच्छा पूर्ण केली होती. आजोबा आणि काकांमधले मित्रत्वाचे अबोध नाते नेहमीच राहिले. कधी पाठीवरून हात भलेही फिरला नसेल पण मन जाणून घेतल्यावर स्पर्शाची जरूर उरत नाही, हेच खरे आहे.

आज तशी परिस्थिती राहिली नाही. मुलांचे मन जाणून घेण्यात आईच्या बरोबरीने बाबांचा देखील सहभाग आहे. माझ्या एका विद्यार्थिनीचे वडील तिची इतकी काळजी घेतात अगदी केस धुण्यापासून ते व्यक्तिगत खरेदीपर्यंत! ती तर आईपेक्षा वडिलांशी जास्त जवळ आहे. ‘जवळपणाचे झाले बंधन…’ असेही नको. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘काहे दिया परदेस’ मधील गौरीचे आहे. इतका प्रेम, जिव्हाळा कधी जाचक ठरू शकतो. पण त्यातूनही बाहेर पडल्यावर गौरी आणि बाबाचं प्रेम आणि मैत्र कमी होत नाही हे खरं!

आज आपल्याकडे दिवसांचं महत्त्व वाढलेलं दिसतं. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, इत्यादी…. तेच आपण करू लागलो आहोत हे पाश्चिमात्त्यांचे अनुकरणही चांगले आहे. आपण आपले कॅलेंडर पाहिले तर ३६५ दिवस काहीना काही तरी प्रत्येक दिवशी आहेच. एकही दिवस काही नाही असे होत नाही. आपला भारत ऋणप्रिय आहे. सतत कोणाचं ना कोणाचं ऋण तो फेडत असतो. कघी पितृऋण तर कधी मातृऋण! तर कधी समाजऋण खरेतर सर्वांना एकत्र आणण्याचे काम हे दिवस करीत असतात. आजच्या धकाधकीच्या दिवसांत आनंद देतात. मुलं आपल्या दिनक्रमात मग्न असतात. या दिवसांना फोन किंवा ईमेल करून आपल्या भावना व्यक्त करतात. मोठाल्या भेटी पाठविणे. कधी वर्ल्डटूरची सोय करणे इ. मुलं आपल्यापरीने आपले ऋण फेडत असतात.

पूर्वीदेखील आईवडिलांना काशीयात्रा घडविणे पुण्याचं काम असे. तेव्हा तर प्रवास देखील कठीण होता. वाहनांची उपलब्धी नव्हती तरीपण ते होत असत. दिवस जातात, काळ बदलतो, शब्द बदलतात, अभिव्यक्ती बदलते पण भावनेचं, संस्काराचं मूळ मात्र बदलले नाही. भावना तीच राहिली हीच गोष्ट मनाला समाधान देणारी आहे. आपण काय किंवा परदेशी काय सगळे पृथ्वीवासीच ना! ‘वसुधैव कुटुंबकम्’ प्रमाणे दिनविशेषांचे आग्रही आहोत. वर्षाचा प्रत्येक दिवस महोत्सवाचा करणारे आहोत हेच खरंय!

आज आई आणि बाबा हे मुलांना सारखेच प्रिय आहेत. फरक फक्त निसर्गाने केलेला आहे. आजची तरुण पिढी आपल्या अपत्याविषयी फार जागरूक आहे. बाबा लोक तर आपल्या मुलांची काळजी आईइतकीच घेताना दिसून येतात. मुलांना न्हाऊ घालणे, जेवू घालणे आनंदाने करताना दिसतात. आज बाप-लेकीच्या कितीतरी प्रसिद्ध जोड्या दिसून येतात. त्यावरची काही गाणी अजरामर झालेली आहेत. वानगीदाखल म्हणायचे झाले तर ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला !’ आजच्या भारताच्या सम्राज्ञी असलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांचे ऋण फेडताना कोणताच दिवस पाहिला नाही. वडिलांची इच्छा पूर्ण करताना मुले आपण मुलगा आहोत की मुलगी आहे याचा विचार करीत नाहीत. हीच आजच्या पिढीची यशस्विता आहे. बरेचदा मुलांना विचारले की मोठेपणी कोण होणार? तर बरेचदा ‘मी बाबासारखा होणार’ असे उत्तर मिळते. मुलीपण म्हणतात ‘मी मोठेपणी बाबा होणार’. असा हा गोड दिवस खूप छान जावो. आज ‘फादर्स डे’च्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!

अरुणा सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या