देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात द्वितीय सत्र परीक्षा रद्द केल्या व नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमालाही कात्री लावावी लागली. हे सर्व पूर्वपदावर यायला अजूनही किती दिवस लागतील याविषयी साशंकता आहे. त्यातून मार्ग काढत राज्यभरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने सुरू केलेला ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यातून शिक्षक, विद्यार्थी व पालक यांमधील सुसंवादाला एक प्लॅटफॉर्म मिळण्यास मदत झाली व अध्ययन-अध्यापन प्रक्रियेस अधिक चालना मिळाली.
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम येथे शाळेला सुटी लागल्यानंतर इयत्ता तिसरीच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहिले. यावेळी शिक्षक-पालक सुसंवादासाठी असलेला वर्गाचा व्हॉट्स अॅप ग्रुप हा फक्त सूचना व शैक्षणिक कामासाठी होता. त्याचा उपयोग मग ऑनलाईन शिक्षणासाठी करायचा असे पालकांच्या संमतीने व सहकार्याने ठरले. खेड्यातील शाळा व तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ पालक यांना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पर्यायांपैकी व्हॉट्स अॅप हेच साधन परिचित व सहज वापरता येत होते. परंतु यामध्ये मुख्य अडचण आली ती ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत अशा पालकांची. वर्गातील एकूण २७ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांच्या घरी व्हॉट्स अॅपची सुविधा नव्हती. त्यांना प्रत्यक्ष फोन करून अभ्यास दिला व ज्या पालकांकडे जुना स्मार्टफोन असेल तो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याची विनंती केली.
राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
व्हॉट्स अॅपद्वारे ऑनलाईन अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. पण पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्हॉट्स अॅप हे साधनही काळानुरूप अपुरे वाटू लागले. त्यासाठी सर्व पालकांना गुगल मीट अॅप डाऊनलोड करून घ्यायला सांगितले व गुगल मीट वापरासंबंधी ऑनलाईन प्रशिक्षण दिले. सुरुवातीला गुगल मीटद्वारे पालकांशी संवाद साधला व तद्नंतर विद्यार्थ्यांशी हितगूज केले. तेव्हापासून शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात प्रत्यक्षात संवाद सुरू झाला. दररोज व्हॉट्स अॅपवर अभ्यास पाठवणा-या मॅडम जेव्हा प्रत्यक्ष शिकवताना फोनच्या स्क्रीनवर दिसू लागल्या तेव्हा विद्यार्थ्यांना आपण वर्गातच असल्याची अनुभूती आली. २७ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणासाठी चार गट करून प्रत्येक गटाला एक गटप्रमुख नेमून दिलेला आहे. परंतु केवळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण होत नाही तर महात्मा गांधीजींच्या विचाराप्रमाणे शिक्षण म्हणजे बालकाचे शरीर, मन व आत्मा यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे होय आणि हा विकास सहशालेय उपक्रमांतून होऊ शकतो.
१) कोरोना जनजागृती उपक्रम-
मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना व्हायरसबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी कोरोना जनजागृती मोहिमेत सहभागी होत ‘वर्क फ्रॉम होम’ उपक्रमांतर्गत ‘फोटो कोलाज’ द्वारे विद्यार्थ्यांनी सर्वांना शासनाचे नियम पाळून घरी रहा, स्वस्थ रहा व कोरोनाला हरवा, असा संदेश दिला.
२) गट्टी नकाशाशी उपक्रम- मार्चमध्ये अचानक शाळा बंद झाल्याने नकाशाच्या प्रतिकृती बनवणे हा उपक्रम अपूर्णावस्थेत होता. विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करून इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील अहमदनगर, महाराष्ट्र व भारत या नकाशांच्या पुठ्ठ्यापासून प्रतिकृती बनवून घेतल्या व त्यावर कोरोना जनजागृतीपर घोषवाक्य लिहित ‘गट्टी नकाशाशी’ हा उपक्रम पूर्ण केला.
३) ऑनलाईन चित्रकला स्पर्धा- चित्रांच्या रेखाटनातून मुलांचे भावविश्व साकार होत असते. काही मुले अबोल असतात. त्यांच्या भावना शब्दांतून व्यक्त होत नाहीत. अशी मुले आपल्या कल्पना जेव्हा चित्रात उतरवतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंद हा शब्दांपलीकडचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, बैलपोळा, गणेश चतुर्थी अशा विविध सण व उत्सवांचे प्रसंग मुलांनी आपल्या चित्रांत रेखाटले व आकर्षक रंग दिले.
४) ऑनलाईन रांगोळी सुशोभन- विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात फक्त पाठ्यपुस्तकांचे अध्ययन न करता आपल्या कलात्मक अंगाचा एक भाग असलेल्या रांगोळी सुशोभनाचे ऑनलाईन धडे गिरवले. विविध सण, उत्सव व दिनविशेष आपल्या रांगोळीतून रेखाटत कोरोना जनजागृतीपर संदेश दिले.
५) कृतज्ञता भेटकार्ड बनवणे- कागदकाम घटकांतर्गत शुभेच्छा भेटकार्ड विद्यार्थी नेहमी बनवतात पण कृतज्ञता भेटकार्ड बनवणे हा उपक्रम त्यांना नावीन्यपूर्ण वाटला.
शीतल मोहन झरेकर
ता. नेवासा, जि. अहमदनगर
मोबा. ७५८८६ ०२५१५