29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home विशेष अवयवदान ही मोहीम व्हावी

अवयवदान ही मोहीम व्हावी

केवळ वीस महिने वय असलेल्या एका चिमुकलीला असाध्य आजाराने घेरले आणि ती देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदात्री बनली. या मुलीचे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि दोन्ही कॉर्निया दान करण्यात आले आणि त्यातून पाच लहानग्यांना नवसंजीवनी मिळाली. आपल्या देशात अवयवदानाबद्दल पुरेशी जागरूकता नाही. परंतु या चिमुकलीच्या वडिलांनी जो निर्णय घेतला, त्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.

एकमत ऑनलाईन

भारतात अवयवदानाची काही स्तुत्य उदाहरणे दिसत असली, तरी ही प्रक्रिया अशा उदाहरणांपुरती मर्यादित न राहता एक चळवळ व्हायला हवी. दहा लाख लोकसंख्येमागे ०.२६ व्यक्ती एवढेच आपल्याकडे अवयवदान करणा-या लोकांचे प्रमाण आहे. आवश्यक अवयव न मिळाल्याने दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांना जीव गमवावा लागतो. देशात देहदान आणि प्रत्यारोपणाचा दरही खूप कमी आहे. केवळ २० ते ३० टक्के देहदान आपल्याकडे होते. ढोबळपणे पाहायचे झाल्यास सुमारे २० हजार रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची प्रतीक्षा आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात देहदानाच्या संख्येत खूपच फरक आहे. दक्षिण भारतात हे प्रमाण अधिक आहे. तेथे दहा लाखांच्या लोकसंख्येमागे एक देहदान होते. उत्तर भारतात मात्र हेच प्रमाण ०.०१ एवढे अत्यल्प आहे. केवळ वीस महिने वय असलेल्या एका चिमुकलीला असाध्य आजाराने घेरले आणि ती देशातील सर्वांत कमी वयाची अवयवदात्री बनली.

रुग्णालयाकडून तिला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या मुलीचे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि दोन्ही कॉर्निया दान करण्यात आले आणि त्यातून पाच लहानग्यांना नवसंजीवनी मिळाली. दिल्लीच्या रोहिणी भागात राहणारी ही मुलगी आठ जानेवारीच्या संध्याकाळी खेळता खेळता पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडली होती. ती गंभीर जखमी असल्यामुळे तिला घेऊन आईवडील रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र ११ जानेवारीला तिला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. मुलीच्या आईवडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलीचे वडील म्हणाले, ‘‘आमच्या मुलीला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले तेव्हा मी डॉक्टरांना विचारले की, आम्ही तिचे अवयव दान करू शकतो का?’’ डॉक्टरांनी त्यास होकार दिल्यानंतर मुलीच्या मृतदेहाचे दफन करण्याऐवजी देहदान करण्याचा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने घेतला. ज्या लहानग्या मुलांना तिच्यामुळे जीवदान मिळेल, त्यांच्या रूपाने आमची मुलगीच जिवंत असल्याचे समाधान आम्हाला लाभेल, असा विचार आम्ही केला.

जेव्हा आमची मुलगी रुग्णालयात होती, तेव्हा आम्हाला असे काही पालक भेटले, ज्यांना त्यांच्या मुलांचा जीव वाचविण्यासाठी अवयवदान मिळण्याची प्रतीक्षा होती.’’संबंधित मुलीच्या मृत्यूनंतर तिचे दोन्ही मूत्रपिंड दोन वयस्क व्यक्तींना दान करण्यात आले तर हृदय आणि यकृत दोन वेगवेगळ्या मुलांना देण्यात आले. कॉर्निया अजून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत आणि ते दोन लोकांना देण्यात येतील. अशा प्रकारे या मुलीने पाच व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. आपल्याकडे रक्तदानही लोक अभावानेच करतात; त्यामुळे अवयवदानाचे प्रमाण तर अत्यंत अल्प आहे. अवयवदानाची प्रथाच मुळी आपल्याकडे नाही. अशा पार्श्वभूमीवर, एका वीस महिन्यांच्या मुलीने पाच जणांचे प्राण वाचविले ही घटना अत्यंत प्रेरणादायी ठरते. देशात दरवर्षी सुमारे साडेतीन लाख लोक रस्त्यांवरील अपघातांत मृत्युमुखी पडतात. त्यांना जर वेळेत रुग्णालयात पोहोचविले गेले आणि त्यांना अवयवांचे दान मिळाले तर त्यातील अनेकांचा जीव वाचू शकेल.

अखेर महापोर्टल रद्द

भारत सरकार याविषयी जनजागृती अभियान चालवून लोकांना देहदान आणि अवयवदानाविषयी प्रेरित करण्याचा प्रयत्न करीत आहे. संचार माध्यमे याविषयी कायम प्रचार करीत असतात. परंतु तरीही आपल्या देशात अवयवदानाबद्दल पुरेशी जागरूकता नाही. पाश्चात्त्य देशांमध्ये ही जागरूकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपल्याकडे धार्मिक मते, अंधश्रद्धा यामुळेही लोक ब-याच वेळा देहदानासाठी किंवा अवयवदानासाठी पुढे येत नाहीत. अशा सर्वांना या चिमुकलीच्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयातून निश्चित प्रेरणा मिळेल. अवयवदानाविषयी प्रोत्साहित करणारा एखादा कायदा सरकारने संमत करायला हवा. या वीस महिन्यांच्या मुलीने, म्हणजेच तिच्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळाले, यातून आपण स्फूर्ती घ्यायला हवी. रक्तदानाप्रमाणेच देहदान हीसुद्धा एक अत्यंत सामान्य घटना ठरायला हवी.

शैलेश धारकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या