‘लान्सेट’ या वैद्यकीय प्रकाशनाने आपल्या नव्या अंकामध्ये कोव्हिडविषयी एक महत्त्वाची गोष्ट मांडली आहे. ती म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोव्हिड १९ प्रतिबंधक लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल परीक्षणांमध्ये आशादायक यश मिळाले आहे. जगभरात या वृत्ताने आनंद निर्माण होणे स्वाभाविक आहे. या परीक्षणाशी निगडीत अनेक बाजूंवरील निष्कर्ष उत्साहवर्धक असल्याने जगभरात आनंदाची लाट निर्माण झाली आहे. पण आनंदोत्सव करण्यापूर्वी सावध राहून वाट पाहणे आवश्यक आहे.
संशोधनामध्ये झोकून देऊन आणि समर्पित होऊन काम करणारे सर्वच वैज्ञानिक, संशोधक आणि ज्या स्वयंसेवकांनी स्वत:वर या लसीचे परीक्षण करून घेतले आहे, ते सर्व जण कौतुकास पात्र आहेत. यातील काही स्वयंसेवक स्वत:च विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेला आपल्या व्यवसायाचा जुना परिपाठ कायम ठेवला आहे. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्यामध्ये आरोग्याची मोठी जोखीम असते हे माहीत असूनही संशोधक आणि वैद्यकीय कर्मचारी नव्या औषधाचे परीक्षण ते स्वत:वर करून घेत आहेत. यामधील एका परिचारिकेचाही समावेश आहे.
रुग्णांचा त्रास पाहिल्यानंतर या महामारीच्या लढाईत आपले वैयक्तिक योगदान देण्याने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे, असे मत या परिचारिकेने व्यक्त केले आहे. कोव्हिड १९ च्या लढाईतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सहकार्य. जागतिक पातळीवर देशांदेशांमध्ये भूराजकीय आणि व्यापारी तणावाची परिस्थिती असूनही औषध संशोधनाविषयी आंतरराष्ट्रीय सहकार्य कायम राहिले आहे. युरोप, अमेरिका, भारत आणि चीन या देशांतील वैज्ञानिक यावर उपाय काढण्यासाठी निरंतर एकमेकांच्या संपर्कात आहेत.
Read More वॉर रूम, टोल फ्री क्रमांकाचा नागरिकांनी फायदा घ्यावा
अनेक देशांमध्ये राजकीय नेतृत्वाने प्रतिबंधात्मक औषध निर्माण करण्याबाबत संकुचित राष्ट्रवाद दर्शवला आहे. आपल्या देशातील नागरिकांसाठीच प्राधान्याने लस विकसित करण्यास ते सांगताहेत. वैज्ञानिक चमू या संकुचित राजकीय विचाराच्या परीघाबाहेर विचार आणि कृती करत आहे. युरोपियन युनियनमधून वेगळे होण्याच्या मुद्द्यावरून म्हणजेच ब्रेक्झिटविषयी झालेल्या चर्चेदरम्यान या बाजूने अनुकूल असलेल्या ब-याच राजकारण्यांनी ब्रेक्झिटनंतर उद्भवणा-या संभाव्य प्रतिकूल परिणामांविषयी इशारा देणा-या तज्ज्ञांचा निषेध केला होता. परंतु महामारीमध्ये राजकय नेत्यांना तोंडावर आपटावे लागले आहे. लॉकडाऊनपासून ते सामाजिक अंतर राखण्यासारख्या गोष्टींचे पालन करण्यापर्यंत वैज्ञानिकांकडून देण्यात येणा-या अनेक सल्ल्यांचे ते पालनही करत आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रहही समाजाला धरत आहेत.
युरोपात कमीत कमी एकच व्यवसाय असा आहे, ज्याने समाजात खूप प्रतिष्ठा मिळवली आहे, तो पेशा आहे डॉक्टर, नर्स आणि सामाजिक कार्यकर्ते किंवा सेवा कर्मचारी. परंतु भारतात मात्र वेगळेच चित्र दिसले. समोर आलेल्या बातम्यांनुसार वैद्यकीय व्यवसाय विशेषत: खासगी क्षेत्रातील वैद्यकीय व्यवसायाविषयीची प्रतिष्ठा जनतेच्या दृष्टीने आणखी कमी झाली आहे. कारण या संकटाच्या काळातही नफेखोरी आणि अनैतिक गोष्टी करण्यात ते व्यग्र आहेत.
असो, जगात अन्य ठिकाणी झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत ऑक्सफर्डच्या संशोधनाला मिळालेल्या यशामागे, काही दिवसांपुर्वीच्या विरोधाभासी प्रक्रियांचाही हात आहे. कारण बाक सर्व ठिकाणी जिथे जिथे लॉकडाऊन झाले तिथे कोरोना विषाणूचा फैलाव मर्यादित ठेवणे आणि जीव वाचवणे यास हातभार जरुर लागला. मात्र त्यामुळे लसीच्या परीक्षणासाठी आवश्यक असलेल्या वेगवान हालचालींमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे संशोधन प्रक्रियेत दिरंगाई होणे स्वाभाविक होते.
कोविड १९ च्या उपचारासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी औषध बनवण्यात आले आहे; परंतु अंंतिम निष्कर्षावर पोहोचण्यासाठी अन्य अनेक चाचणी टप्प्यांंतून ते पार होणे गरजेचे आहे. ऑक्सफर्ड परीक्षणातून असे कळते की ज्या १००० स्वयंसेवकांवर या औषधाचा प्रयोगात्मक प्रकार वापरण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये कोव्हिड१९ विरोधात मजबूत रोगप्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे. ज्या लोकांनी पहिल्या टप्प्यातील प्रयोगात, चाचणीत सहभाग घेतला होता त्यांचे वय १८ ते ५५ दरम्यान होते.
Read More अणदूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३ वर
पण मग प्रश्न असा पडतो की ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे आणि ५५ पेक्षा जास्त आहे, त्यांच्यावरही हे औषध प्रभावी ठरेल का? कारण जगभरात कोरोना संसर्गाने मृत्यू पावणा-या लोकांचा आकडा पाहता, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांना त्याचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच प्रयोगाच्या पुढच्या पातळीवर ऐच्छिक स्वयंसेवकांचे वय ५६ ते ६९ वर्ष आणि ७० वर्षापेक्षा अधिक आहे हे आणखी दोन वयोगट जोडण्यात आले आहेत.
कोव्हिड १९ प्रतिरोधक लस संसर्गापासून बचाव करेल असे ध्येय- उद्दिष्ट ठेवून हे सर्व सायास केले जात आहेत. तथापि, लसीचा अंतिम प्रभाव मध्यम असेल, असेही म्हटले जाते. म्हणजे ही लस फक्त आजाराची तीव्रता कमी करू शकते, असे सांगितले जात आहे. या लसीचा परिणाम किती काळ टिकेल आणि त्याच्या बुस्टर डोसची गरज भासेल का हे पहावे लागेल. त्यामुळेच संशोधित केलेल्या औषधाचे पुढील परीक्षण खूप महत्त्वाचे आहे.
ब्राझील, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये ही चाचणी सुरू झालेली आहे. या देशांमध्ये संसर्गाचे प्रमाणही खूप जास्त आहे. एकीकडे कोव्हिड १९ प्रतिबंधक लस विकसित होताना ही लस सुरक्षित, प्रभावी असेल की नाही, ते अंशत:च प्रभावी ठरणार का या शक्यतांवर येणा-या काळात पडदा पडेल. दरम्यानच्या काळात, कोव्हिड १९ चा संसर्ग झालेल्या सध्याच्या रुग्णांना बरे करण्यासाठी औषध शोधणे हे मोठे आव्हान आहे. याबाबत काही अंशी यश मिळालेही आहे; पण प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्याऐवजी संसर्ग बरा करू शकणा-या औषधाकडे तुलनेने कमी लक्ष दिले जाते आहे.
प्रतिबंधात्मक लस येईलही; पण त्याच्या किमतीविषयी कोणतीच चर्चा किंवा अंदाज व्यक्त केला जात नाहीये. सुरक्षित आणि प्रभावी लसीचा खरा फायदा होण्यासाठी आणि ही लस जगभरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादन, किंमत, विपणन आणि उपलब्धता यांचे राजकीय गुणाकार भागाकार फार महत्त्वाचा ठरणार आहेत. यासाठी प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.
Read More वृक्षांना राखी बांधून जिल्हाधिकारी यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा सल्ला
कोरोना संसर्गाचे मूळ कारण आहे ते म्हणजे अमानवी वस्तीतील मानवाचे अतिक्रमण. प्राणी, पक्षी आणि जनावरे यांच्याशी जवळचा संपर्क झाल्यामुळे त्यांच्यातील विषाणू मानवांमध्ये प्रवेश करतात. ही प्रक्रिया अनियंत्रित किंवा अव्यवस्थित राहिली तर आपल्याला यापुढील काळातही नवीन विषाणू आणि अधिक धोकादायक आजारप्रकारांना सामोरे जावे लागेल, यात शंका नाही. कोव्हिड १९ ने जगभरात केवळ आरोग्य संकट उभे केले नाही तर सर्वात मोठे आर्थिक संकटही निर्माण केले आहे, त्यामुळे जगभरात अभूतपूर्व अशी बेकारी निर्माण झाली आहे.
ही दोन्ही संकटे जैवविविधतेची हानी झाल्याने निर्माण झाली आहेत. प्रतिबंधात्मक लस शोधण्यावर तातडीने लक्ष देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे; परंतु भांडवलशाही व्यवस्थेला सामाजिक आणि आर्थिक पर्याय निर्माण करण्यानेच पर्यावरणीय सुरक्षेचे सातत्यपूर्ण संवर्धन-संरक्षण करणे शक्य होणार आहे. त्यातच मानवजातीचे भले आहे. (अनुवाद: विजयालक्षमी साळवी)
प्रा. प्रीतम सिंह
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी