22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeविशेषपपईच्या पानांचा रस : फायदे

पपईच्या पानांचा रस : फायदे

एकमत ऑनलाईन

पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे पपईच्या झाडाला आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे. केवळ पपईच्या फळातच नाही तर पूर्ण झाडातच अनेक औषधी गुणधर्म लपलेले असतात. पपई खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होण्याबरोबरच पोटाच्या अनेक तक्रारींपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. पपईची फळे वर्षभर कधीही सहज उपलब्ध असतात. ही सध्या पपईच्या पानांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. कारण ही पाने आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅरोटीन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांसह जीवनसत्व अ, ब, क, ड, आणि ई व तसेच यामध्ये कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, लोह व फॉस्फरस ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पपईची हिरवी पाने अनेक पोषक तत्त्वांनी समृध्द मानली जातात. यामुळेच पपईच्या पानांमध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असतात.

पपईच्या पानांचा रस नियमितपणे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. डेंग्यू आजार तापाचा एक प्रकार असला तरी हा ताप प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रुग्णाला धोका होऊ शकतो. कारण या आजारामध्ये रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स अतिशय वेगाने कमी होऊ लागतात व त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते व रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्लेटलेट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रामुख्याने डेंग्यूची समस्या असल्यास अनेक लोक पपईच्या पानाचे किंवा त्याच्या रसाचे सेवन करतात. डेंग्यूसारख्या अत्यंत त्रासदायक आजाराच्या उपचारामध्ये पपईच्या पानांचा तयार केलेला रस किंवा काढा सेवन केल्याने रुग्णाला लवकर आराम मिळण्यास मदत होते. पपईच्या हिरव्या पानांचा रस पिल्याने आपल्या शरीरातील प्लेटलेट्स व लाल पेशींची संख्या वाढते व त्याचबरोबर रक्ताभिसरण सुध्दा चांगल्या प्रकारे होते. या कारणांमुळे तज्ज्ञ डॉक्टर किंवा वैद्याकडून डेंग्यू झालेल्या रुग्णाला पपईच्या हिरव्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

पपईच्या पानामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे होणा-या संसर्गापासून बचाव होतो. त्यासाठी पपईच्या झाडाची ताजी हिरवी पाने बारीक वाटून त्याचा स्वरस २५ मिली प्रमाणे दररोज नियमितपणे सेवन केल्यास फायदा होतो. डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे. तो डासाच्या चाव्याद्वारे संक्रमणात्मकरीत्या प्रसारित होतो. हा आजार दोन प्रकाराने होतो. १) डेंग्यू ताप ज्यामध्ये फ्लूसारखा आजार येऊन तीव्र ताप येतो. २) डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप- ज्यामध्ये अधिक तीव्र स्वरूपाचा ताप येऊन मृत्यूसुध्दा येऊ शकतो. डेंग्यू तापाची लागण झाल्यानंतर तीव्र डोकेदुखी, हात-पाय दुखणे, स्नायू दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, अंग थरथरणे, मळमळणे किंवा उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. या जीवघेण्या आजारामध्ये जास्त ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स लवकर कमी होतात तसेच रुग्णाला सतत ताप येतो आणि ब-याचदा हा ताप कमी होत नाही.

पपईच्या पानामध्ये ताप कमी होण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे पपईची हिरवी ताजी पाने स्वच्छ धुऊन व बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा. हा तयार केलेला ३० मिली स्वरस काही दिवस घेतल्यास फायदा होतो. पपईच्या पानामध्ये मलेरियाविरोधी गुणधर्म आहेत. मलेरिया हा आजार डास चावल्यामुळे होतो. यालाच हिवताप असेही म्हणतात. ज्यामध्ये थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी होणे, थांबून-थांबून ताप येणे, मळमळ व उलट्या होणे, शरीरात वेदना होणे, अंग दुखणे असे त्रास होतात. त्यासाठी पपईच्या ताज्या हिरव्या पानांचा अर्धा ग्लास रस काही दिवस पावसाळ्यात नियमितपणे घ्यावा ज्यामुळे मलेरियाची लागण होण्यापासून आपले संरक्षण होते. मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या पिशवीचे आकुंचन होत असते. ज्यामुळे या दिवसांत स्त्रियांना वारंवार ओटीपोटात दुखणे किंवा मासिक पाळी दरम्यान वेदना होतात. पपईमध्ये असलेले पेपीन हे द्रव्य मासिक पाळीतील रक्तस्त्राव नियंत्रित करते ज्यामुळे दुखण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी अशा परिस्थितीत महिलांनी पपईच्या ताज्या हिरव्या पानांचा काढा तयार करून त्यात चवीपुरते सैंधव मीठ घालून काही दिवस सेवन करावे.

पपईच्या पानामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत. कारण यामध्ये पेपीन, फ्लेवोनॉईड आणि जीवनसत्व-ई भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, स्नायू दुखणे आणि सांधेदुखीसारख्या अंतर्गत किंवा बा दाहक समस्यांच्या उपचारासाठी पपईच्या पानांचा वापर केला जातो. पपईच्या पानामध्ये लायकोपेन द्रव्य असते जे कर्करोगाचा प्रभाव रोखण्यास मदत करतात व तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवितात. शरीरातील पेशीची अति प्रमाणात वाढ झाल्यास कर्करोग होतो. त्यासाठी पपईच्या ताज्या हिरव्या पानांचा २५ मिली रस नियमितपणे घ्यावा ज्यामुळे गर्भाशय ग्रिवा व स्तनाच्या कर्करोग पेशी तयार होण्यास प्रतिबंध केला जातो. पपईच्या पानांचा रस सेवन केल्याने यकृताची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होते. कारण रसामध्ये असलेल्या या गुणधर्मामुळे जे पदार्थ यकृतासाठी नुकसान करणारे असतात ते सर्व नष्ट होतात. ज्यामुळे कावीळ किंवा लिव्हर सिरॉसिससारखे आजार होत नाहीत.

त्यासाठी पपईची ताजी हिरवी पाने बारीक वाटून त्याचा ३० मिली रस नियमितपणे पिल्यास फायदा होतो. पपईच्या पानामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचे आणि इन्सुलीनचा स्तर वाढविण्याचे गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे पपईच्या पानाचा रस नियमित सेवन केल्याने गोड पदार्थ खायची इच्छा हळूहळू कमी होण्यास मदत होते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही त्यासाठी पपईची हिरवी पाने बारीक वाटून त्याचा अर्धा कप रस नियमितपणे घेतल्यास लाभदायक होते. पपईच्या पानामध्ये जीवनसत्व क, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम विपुल प्रमाणात असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो जेणेकरून धमन्यामधील होणारा रक्तप्रवाह नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुध्दा सुधारतो. त्यासाठी पपईच्या पानांच्या ३० मिली रसाचे नियमित सेवन फायद्याचे असते.

पपईच्या पानांचा रस घेतल्याने आहे. बध्दकोष्ठता दूर होण्यास मदत होते. ब-याच वेळा मल घट्ट झाल्यामुळे शौचाला व्यवस्थित होत नाही किंवा कुंथावे लागते. त्यासाठी पपईच्या हिरव्या पानांचा अर्धा कप रस नियमित घेतल्याने पोटाच्या तक्रारी दूर होऊन आराम मिळण्यास मदत होते पपईच्या पानांमध्ये प्लेटलेट्स वाढविणारे घटक आहेत. ब-याच वेळा आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या हळूहळू कमी होते. हे वाढविण्यासाठी लोक पपईच्या पानांचा रस रुग्णाला देतात. त्यामुळे प्लेटलेट्स कमी झाल्यास पपईच्या ताज्या हिरव्या पानांचा रस दोन चमचे याप्रमाणे दररोज तीन महिन्यांपर्यंत सेवन केल्यास लाभदायक होते. पपईच्या पानाचे/रसाचे सेवन केल्याने गॅस, जळजळ, अपचन, मलावरोध सारख्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होऊन खाल्लेले अन्न चांगले पचन होते त्यासाठी नियमितपणे पानांचा रस घेतल्यास पचनक्रिया सुधारते.पपईच्या पानामध्ये जीवनसत्व क आणि ई चे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते व सोबतच त्वचेवरील सुरकुत्याही कमी होण्यास फायदा होतो.

त्वचा टवटवीत, मुलायम, तजेलदार व उजळ दिसण्यासाठी नियमितपणे पपईच्या हिरव्या ताज्या पानाच्या दोन चमचे रसाचे सेवन दररोज करावे. पपईच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात उपलब्ध असतात ज्यामुळे आपले केस अधिक मजबूत होतात. केस गळती होत नाही आणि नवीन केस येण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थ खाल्ल्यास ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत होते व केसांची वाढ सुधारते. त्यासाठी पानाचा दोन चमचे रस दररोज घ्यावा. पपईच्या पानामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. बुरशीच्या अतिवृध्दीमुळे डोक्यात कोंडा तयार होतो व त्यामुळे केसांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. टिप : वनौषधींचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या