22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेष‘चिन्हांकित यादीतली माणसं’

‘चिन्हांकित यादीतली माणसं’

एकमत ऑनलाईन

मराठी साहित्याचे अभ्यासक आणि ग्रामीण जीवनाचा वेध घेणारे मराठवाड्यातील एक आश्वासक कथाकार म्हणून अल्पावधीतच मराठी साहित्यविश्वात सर्वत्र सुपरिचित झालेल्या प्रा. माधव जाधव यांचा ‘चिन्हांकित यादीतील माणसं’ हा लघुकथासंग्रह पुण्याच्या सायन पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केला असून या संग्रहात एकूण १७ कथा आहेत. विशेष म्हणजे आशयविषयाच्या दृष्टीने या कथा भिन्न असून सतत बदलत जाणारे ग्रामजीवन हे या कथांचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे.

‘शिकवणी’ या पहिल्याच कथेत डी.एड. उत्तीर्ण झालेल्या आणि बेकारीत फिरणा-या नामूची कथा नि व्यथा व्यक्त झाली असून तो स्वत:च्या नशिबाला कसलाही दोष न देता किंवा निराश व हतबल न होता हदगावला शिकवणी वर्गात सहभागी होतो आणि स्वत:च्या बेकारीवर मात करतो. सोयाबीन खुरपण्यासाठी गावात मजूर मिळत नाहीत तेव्हा नाना पाटलांचा पदवीधर झालेला रमेश स्वत: बाजारात जाऊन ‘परशूट’आणतो आणि स्वत:च फवारतो. पर्यायाने शेतक-याने दुस-यावर अवलंबून न राहता शेतामध्ये स्वत: राबलं पाहिजे, असा बोध देणारी ‘पर्याय’ ही कथा नवी दिशा दाखवणारी आहे, तर स्वत:च्या पसंतीची मोटारसायकल घेण्यासाठी घरामध्ये बहकल्यासारखा वागून, घराला वेठीस धरणारा बारक्या ‘एकात एक’ कथेत भेटतो.

पण मास्तर असलेला त्याचा भाऊ बहकलेल्या बारक्याचे म्हणणे ऐकून घेतो आणि त्याला त्याच्या पसंतीची गाडी घेऊन देतो, पण रोज सकाळी घरचे दूध तालुक्याला नेऊन विकायची अट घालतो. अखेर बारक्या तयार होतो आणि दूधविक्री करू लागतो. हातात चार पैसे येऊ लागताच त्याला कामाची गोडी लागते आणि तो सुधरतो. या कथेतून लेखकाने ग्रामीण परिसरातील बहकलेल्या तरुणाईला नीट समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करण्याची गरज प्रतिपादन केली आहे. प्रखर विवेकनिष्ठ विचार करणारी मुक्ता संकटसमयीदेखील तिच्या मतांवर कशी ठाम राहते है ‘तिचा विश्वास’ कथेतून शब्दांकित केले असून मुक्ताचा घरा-दारातील संघर्ष वाचून स्तिमित व्हायला होतं. तर ‘गुढा’ कथेतही अशीच बंडखोर नायिका : सीमा लेखकाने रंगवली असून जुनी पिढी आणि आजची विचारशील विवेकनिष्ठ पिढी यांच्यातील संघर्ष नेमका टिपला आहे.

मागासवर्गीय समाजाच्या गरीब विधवा महिलेच्या; शारदेच्या गरिबीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या गोविंद कावळे नावाच्या पंचायत समिती सदस्याला हिंमतवान शारदा कसा कायमचा धडा शिकवते, याचे वेधक चित्रण ‘हिसका’ कथेत आहे. ‘दु:खाचे टॉवर,सुखाची रेंज’ या कथेचा आशय आहे. या कथेत लेखकाने सुविचारासारखे एक अतिशय समर्पक वाक्य नोंदवले आहे, ते म्हणजे : आपल्या सुखाचे कव्हरेज वाढवण्यासाठी दुसरा कोणीतरी येऊन टॉवर उभारणार नसतो, तर ते आपल्यालाच उभारावे लागते. ‘इलाज’ ही कथा ग्रामीण भागातल्या राजकारणाच्या अतिरेकी हव्यासापोटी अनेक घरं कशी उद्ध्वस्त होत आहेत, याचे रेखाटन करून या जिवंत समस्येवर इलाजही सुचवते, ग्रामीण परिसरातील आजच्या शिक्षणाचं वेडं-वाकडं रूप ‘पटपडताळणी’ कथेमध्ये उजागर झाले असून तेथील कष्टकरी शेतकरीवर्गाची शिक्षणाबद्दलची अनास्था इथे गोचर झाली आहे.

वुहानमध्ये विषाणू बॉम्ब?

तसेच शाळेमध्ये चालत असणारे संस्थाचालक व शिक्षक यांचे राजकारणही या कथेत समर्थपणे आले आहे. ‘मायमया’ ही या संग्रहातील विनोदी ढंगाची कथा असून ही कथा ग्रामीण माणसांच्या पारंपरिक मानसिकतेवर आणि मनोवृत्तीवर प्रकाशझोत टाकते. ‘चिन्हांकित यादीतील माणसं’ ही या कथासंग्रहातील एक नितांतसुंदर कथा असून लेखकाने तिची मांडणी नर्मविनोदी शैलीत केली आहे, या कथेतून ग्रामीण परिसरातील आज प्रचलित असलेल्या राजकारणाचे बहुपेडी वास्तव अगदी नेमकेपणाने प्रकट झाले असून गावातल्या गटबाजीच्या राजकारणात भरडून निघणा-या सामान्य माणसाचे अंगभूत चातुर्य आणि हुशारीही इथे प्रतीत झाली आहे. गावाजवळून जाणा-या तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गात किसन आबाची एकरभर जमीन जाते आणि त्याचे रक्ताचे नातेवाईकच त्याचे दुश्मन होतात. स्वत:च्या मुलीकडूनच : वनिताकडूनच आलेल्या रकमेत तिस-या हिश्श्याची मागणी केली जाते आणि आबाला धक्काच बसतो.

मात्र आबा तिसरा हिस्सा द्यायला नकार देतो तेव्हा त्याचा जावई कोर्टाची भाषा करू लागतो. कथेतील पात्रांच्या संवादांमधून पात्रांच्या स्वभावरेषा अगदी नेमकेपणाने व्यक्त होतात. तसेच नांदेड परिसरातल्या मराठवाडी बोलीभाषेतील ‘इपितर’, ‘हेकाडी’, ‘ये-हीच ’, ‘काऊन ’, ‘हंबळा ’ सारखे शब्द वाचनानंद देऊन कथेची खुमारी वाढवतात. पण याचा अर्थ या संग्रहात एकही उणीव नाही, असा नाही. ‘नामा आज्या ’ आणि ‘दावेकर गुरुजी’ या लेखांचा अंतर्भाव इथे कथा म्हणून केला असला तरी या दोन्ही कथा नव्हेत. तसेच ‘बिचारी की विचारी ’ही कथा नसून एक उत्तम प्रतीचा ललितलेख आहे.

चिन्हांकित यादीतली माणसं – (कथासंग्रह)
लेखक : माधव जाधव
प्रकाशक : सायन पब्लिकेशन्स, पुणे.

-उमेश मोहिते, मोबा: ९४०५० ७२१५४

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या