23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeविशेषपरफेक्शनिस्ट अब्जाधीश

परफेक्शनिस्ट अब्जाधीश

एकमत ऑनलाईन

भारतीय उद्योगजगतातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असणा-या पालनजी मिस्त्री यांचे नुकतेच निधन झाले. १५७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आशियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या पालनजींच्या उद्योगसमूहाने अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. पालनजी हे एक अद्भूत रसायन होते. उद्योगजगतात देदीप्यमान मजल मारल्यानंतरही ते सदैव प्रसिद्धीपासून दूर राहिलेले दिसले. त्यामुळेच त्यांना ‘बेपत्ता अब्जाधीश’ म्हटले जायचे. कारण सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांची उपस्थिती फारशी कधीच दिसली नाही. ते मूलत: परफेक्शनिस्ट होते. कार्यामध्ये अचूकता येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहण्यावर त्यांचा सदैव भर राहिला. गुणवत्तेशी तडजोड त्यांना कधीच रुचली नाही.

भारतीय उद्योगजगतातील अनेक उद्योजकांची कीर्ती सातासमुद्रापार पसरली आहे. एकेकाळी ज्या भारताला गारुड्यांचा देश म्हणून पाश्चिमात्त्य प्रगत राष्ट्रे हिणवत असत त्या देशातील उद्योजकांचा आणि उद्योजकतेचा आज जगभरात डंका आहे आणि विकसित राष्ट्रांमधील उद्योजकांना मागे टाकत भारतीय उद्योजकांनी आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे. जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्येही गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांनी मोठी मजल मारली आहे. भारताच्या या धवल औद्योगिक प्रवासामध्ये काही घराण्यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यामध्ये टाटांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्याबरोबरीने ज्या अन्य उद्योजकांचा नामोल्लेख होतो त्यामध्ये पालनजी घराण्याचा समावेश आहे. या शापुरजी पालनजी उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योजक पालनजी मिस्त्री यांचे नुकतेच मुंबईमध्ये निधन झाले. जगातील यशस्वी उद्योजकांमध्ये गणल्या जाणा-या पालनजींच्या उद्योगाचे साम्राज्य अनेक देशांमध्ये विस्तारलेले आहे. आपल्या उद्योगसमूहांमधून मिळवलेल्या सुमारे २९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळे त्यांची वर्णी जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये केली जात असे. पालनजी हे टाटा समूहातील सर्वांत मोठे वैयक्तिक भागधारक होते.

पालनजी हे एक अद्भूत रसायन होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उद्योगजगतात इतकी मोठी मजल मारल्यानंतरही ते सदैव प्रसिद्धीपासून दूर राहिलेले दिसले. त्यामुळेच त्यांना ‘बेपत्ता अब्जाधीश’ म्हटले जायचे. सामान्यत:, उद्योग-व्यवसाय नावारूपाला आला, विस्तारला की समाजामध्ये मानसन्मान मिळवण्याच्या उद्देशाने बहुतांश उद्योजक विविध मार्गांनी प्रयत्न करत असतात. पण पालनजी अशा प्रकारच्या मोहात कधीच अडकले नाहीत. सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांची उपस्थिती फारशी कधीच दिसली नाही. याचा अर्थ ते एकांतवासी किंवा एकाकीपणाप्रिय नव्हते. पण प्रसिद्धीच्या हव्यासाने उथळपणा करत राहणे हा त्यांचा पिंड नव्हता. आपल्या व्यवसाय कौशल्याच्या, विद्वत्तेच्या आधारे व्यवसाय विस्तारामध्येच ते गढलेले दिसले. त्यांचे व्यक्तिमत्त्व गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असणारे होते, असे त्यांचे मित्रगण आणि परिचित सांगतात. याखेरीज कोणतीही गोष्ट मुळासकट जाणून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते मूलत: परफेक्शनिस्ट होते. कार्यामध्ये अचूकता येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहण्यावर त्यांचा सदैव भर राहिला. आपल्या उद्योगांमध्येही त्यांनी हाच सिद्धांत केंद्रस्थानी ठेवला. त्यासाठी भलेही खर्चाचा आकडा वाढला तरी चालेल, पण गुणवत्तेशी तडजोड त्यांना कधीच रुचली नाही.

पालनजींचा जन्म १९२९ मध्ये भारतातील पारसी कुटुंबात झाला. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन केनन स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. त्यानंतर लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षापासून पालनजी कौटुंबिक व्यवसायात रुजू झाले. १८६५ मध्ये वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीसाठी त्यांनी अनेक देशांना सेवा दिली. १९७०च्या दशकामध्ये पालनजी यांनी हा व्यवसाय अबुधाबी, कतार, दुबई आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये विस्तारला. पालनजी उद्योगसमूह बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा, पाणी, ऊर्जा, अभियांत्रिकी, आर्थिक सेवा यांसह अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. आखाती देशांमधील बांधकाम क्षेत्रात, पायाभूत सुविधांच्या विकासात भारतीय कंपन्यांचे योगदान मोठे राहिले आहे. यामध्ये पालनजी उद्योगसमूहाचा समावेश होतो. विशेषत्वाने उल्लेख करायचा झाल्यास ओमानच्या सुलतानाचा निळा आणि सोनेरी अल आलम हा राजमहाल हा शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधला आहे.

भारतातही अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या उभारणीमध्ये या उद्योगसमूहाचा वाटा मोठा राहिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, मुंबई सेंट्रल स्टेशन, एचएसबीसी बँक, सेलचा पोलाद प्रकल्प, सिटी बँकेचे भारतातील मुख्यालय, राजधानी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम अशी अनेक उदाहरणे या समूहाच्या स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याचे साक्षीदार आहेत. १९६० च्या दशकात शापूरजी पालनजी उद्योगसमूहाची चर्चा आणखी एका कारणामुळे देशभरात झाली होती. ते म्हणजे मुगल-ए-आझम या बहुचर्चित हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये शापूरजी उद्योगसमूहाची महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट त्याकाळातील सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून ओळखला गेला. आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. १५७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आशियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या पालनजींच्या उद्योगसमूहात आज ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पालनजी यांनी विस्तारलेल्या या व्यवसायाचा वटवृक्ष आज त्यांची पुढची पिढी सांभाळत आहे.

– सीए संतोष घारे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या