26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषआकाशाला गवसणी घालणारे व्यक्तिमत्त्व : वैजनाथराव खांडके

आकाशाला गवसणी घालणारे व्यक्तिमत्त्व : वैजनाथराव खांडके

एकमत ऑनलाईन

आई-वडील शेतमजूर असल्याने त्यांना रोजगारासाठी वणवण भटकंती करावी लागायची. त्यामुळे हे कौटुंबिक चित्र पालटण्यासाठी वैजनाथराव खांडके यांनी ध्यास घेतला. ‘शिक्षणाचे महत्त्व सर्वांनाच कळले, अगदी बालगोपालही त्यापासून नाही सुटले’ या उक्तीप्रमाणे वैजनाथराव खांडके गुरुजी यांनी जिद्दीच्या जोरावर शिक्षणाला महत्त्व दिले. रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी अखेर आपले ध्येय गाठले. लातूर व औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदासह संचालक, मिपा, औरंगाबाद, संचालक, राज्य प्रौढ शिक्षणसंस्था, शिक्षण उपसंचालक, पुणे, शिक्षण सहसंचालक, अंदाज व नियोजन, शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षण या पदांचा अतिरिक्त पदभार असलेले खांडके गुरुजी दि. ३१ जुलै २०२१ रोजी ३२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा!

व्ही. के. ऊर्फ वैजनाथराव कोंडिबा खांडके यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे दि. ७ जुलै १९६३ रोजी झाला. शेतमजूर असलेले अशिक्षित आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा त्यांचा परिवार. घरात अठराविश्व दारिद्र्य. आई-वडील रोजगाराला गेले तरच घरातील चूल पेटायची. आई- वडिलांचे अपार कष्ट पाहून वैजनाथराव यांच्या जिवाची खूप घालमेल व्हायची. शिक्षण शिकून आपण आपल्या आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करण्याचा त्यांनी विडा उचलला. गावात शिक्षणाची उज्ज्वल परंपरा निर्माण करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक कुंडलीकराव तरकसे, प्रा. वसंत ओगले, सुगंध ओगले, एकनाथराव सुरवसे, दिगंबर चव्हाण यांना आदर्शस्थानी ठेवून वैजनाथरावांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू केली.

गावातील जिल्हा परिषद व महात्मा फुले हायस्कूल येथे इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण घेऊन वैजनाथराव बीड येथील कंकालेश्वर विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाले. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होऊन ते बी. एस्सी. उत्तीर्ण झाले. त्यानंतर नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून एम.एस्सी. (रसायनशास्त्र) चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात बी. एड. चे शिक्षण घेतले अन् १९८७ ला ते उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. उदगीर येथे चार वर्षे सेवा बजावल्यानंतर १९९१ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण सेवा वर्ग-२ पदी त्यांची निवड झाली. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी १९९१ ते १९९६ या काळात सेवा बजावली.

मॉडर्ना लसीला आपत्कालीन परवानगी

१९९६ ते १९९८ या काळात त्यांनी परभणी येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले. १९९८ ते २००३ या कालावधीत त्यांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपसंचालक म्हणून काम केले. सन २००३ ते २००७ या काळात लातूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपनिरीक्षक म्हणून पदस्थापना मिळाली. सन २००८ ते २०१० या कालावधीत नांदेड येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावली. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणारे नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात खांडके गुरुजींनी इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्तीकरिता १० वर्षे व १३ वर्षे वयाच्या मुलांचे निवासी वर्ग आयोजित करून चौथी व सातवी परीक्षेत नांदेड जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल स्थानी आणला. तसेच साक्षरता अभियान व साक्षरोत्तर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून मुखेड तालुका राज्यात व नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आणला.

तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गरीब व होतकरू मुलांकरिता एम. पी. एस्सी. चे मार्गदर्शन वर्ग खांडके गुरुजींनी आयोजित केल्याने अनेक विद्यार्थ्यांची लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. ‘मिपा’चे संचालक म्हणून कार्य करताना संपूर्ण राज्यात शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्यासाठी लीडरशिप डेव्हलपमेंटचा कार्यक्रम प्रभावीपणे एनसीइआरटी व एससीइआरटीच्या सहकार्याने खांडके गुरुजींनी राबविला.

प्राथमिक शिक्षणापासून ते पुढील शिक्षण घेण्यासाठी माझ्या आई-वडिलांचे कष्ट, मेहुणे सोपानराव सोनवणे, मोठी बहीण सत्यभामा सोनवणे, मेहुणे देविदास सोनवणे यांचे सहकार्य व आशीर्वाद हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे खांडके गुरुजी सांगतात. भविष्यात वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे, शेतीची आवड असल्याने एक आदर्शवत शेती करून उच्चशिक्षित तरुणांना मार्गदर्शक असे काम करणे हेच खांडके गुरुजींचे उद्दिष्ट आहे.

२०१० ला पदोन्नतीने शिक्षण सेवा वर्ग-१ माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी म्हणून उस्मानाबाद येथे बदली झाली. येथे चार वर्षे सेवा बाजावल्यानंतर २०१४ ला लातूरच्या शिक्षण उपसंचालक पदावर ते रुजू झाले. २०१७ ते २०२० पर्यंत औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक व २०२० ला पुणे येथे बदली. पुणे येथे शिक्षण उपसंचालक म्हणून आजपर्यंत ते कार्यरत होते. लातूर व औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदासह संचालक, मिपा, औरंगाबाद, संचालक, राज्य प्रौढ शिक्षण संस्था, शिक्षण उपसंचालक, पुणे, शिक्षण सहसंचालक, अंदाज व नियोजन, शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षण या पदांचा अतिरिक्त पदभार असलेले खांडके गुरुजी दि. ३१ जुलै २०२१ रोजी ३२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!

प्राचार्य डी. एन. केंद्रे
सचिव, राजमाता जिजामाता
शैक्षणिक संकुल, लातूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या