21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषपिक्चर अभी बाकी है...

पिक्चर अभी बाकी है…

विधानसभा निवडणुकांना काही महिने उरलेले असताना पंजाबमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. नवज्योतसिंग सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष बनवल्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदरसिंग कमालीचे नाराज झाले आहेत. सिद्धू प्रदेशाध्यक्ष झाल्याने पंजाबच्या युवकांत उत्साह संचारला आहे. त्यांचे वक्तृत्वकौशल्य सर्वच जण जाणून आहेत. पण कॅप्टन अमरिंदर सिंग हे अजूनही प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते आहेत. पंजाबच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. त्यामुळे आगामी काळात दिल्लीश्वर पंजाब काँग्रेसमधील धग कशी शांत करतील हे पाहावे लागेल.

एकमत ऑनलाईन

तडाखेबंद फलंदाजी आणि क्रिकेट सामन्याच्या रोचक, रंजक समालोचनासाठी प्रसिद्ध असलेले, टीव्ही कॉमेडी शोच्या माध्यमातून एक कलावंत म्हणून घराघरांत पोचलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडल्यानंतर आम आदमी पक्षाचे दरवाजे ठोठावले. नंतर पंजाबातील विरोधकांना एकत्र आणून नवा राजकीय गट तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फसल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. मध्यंतरीच्या सर्व घडामोडींनंतर आता सिद्धू हे पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद आणखीच पेटला आहे. अमरिंदर सिंग यांचा गट अजूनही सिद्धूंनी माफी मागावी यावर ठाम आहे. दुसरीकडे सिद्धंूचा गट हा माफी न मागण्यावर अडून आहे. मुख्यमंत्र्यांची ट्विटरवरून माफी मागण्याची गरज नाही, असे सिद्धू समर्थक म्हणतात. कारण त्यांनी जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. माफी तर कॅप्टनने मागावी, असे सिद्धूंचा गट म्हणतो. या दोन्ही नेत्यांच्या संघर्षामुळे पक्षश्रेष्ठी कोंडीत अडकले आहेत. या दोन्ही नेत्यांतील मतभेद मिटले नाहीत तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अडचणीत येऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धू ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत आहेत. सिद्धूंना पंजाब प्रदेशची कमान सोपवल्यानंतर कॅप्टनसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मनात अपमानित झाल्याची भावना पसरली आहे. सिद्धूंनी २००४ मध्ये भाजपपासून राजकीय करिअर सुरू केले होते. त्यावेळी ते अमृतसर मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवली आणि सिद्धू यांना राज्यसभेतून पाठवण्यात आले. २०१६ पासून त्यांनी भाजपपासून फारकत घेतली. ते आप पक्षात जाण्याच्याही तयारीत होते. परंतु ताळमेळ बसला नाही. त्यानंतर काही महिन्यांतच ते काँग्रेसमध्ये गेले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सिद्धू काँग्रेसमध्ये आले. सिद्धूंना काँग्रेसमध्ये आणण्यास राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची मोठी भूमिका होती. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची तयारी नव्हती. त्यानंतर कॅप्टनच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पंजाबमध्ये ११७ पैकी ७७ जागा जिंकून चांगला विजय मिळवला. कॅप्टननी सिद्धूंना कॅबिनेट मंत्री केले. मंत्री असतानाही ते कपिल शर्माच्या शोमध्ये सामील व्हायचे.

२०१८ च्या पाकिस्तान दौ-याने नवज्योत सिद्धू यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का बसला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निमंत्रण मिळताच सिद्धू हे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिले. तेथे पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांची गळाभेट घेतल्याने भारतात खळबळ उडाली. सर्वत्र सिद्धंूवर टीका हेऊ लागली. त्यात अमरिंदर सिंग देखील सामील होते. शेवटी सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु पंजाबच्या जनतेने सिद्धूला भारत-पाकिस्तानचा शांतता दूत म्हणून पाहिले. यानंतर कर्तारपूर कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्तावही आला. हा कॉरिडॉर सुरू झाल्याने भारतीय शिखांना गुरुनानक देव यांच्या कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत पोचणे शक्य झाले. काही दिवस शांत बसल्यानंतर सिद्धूंनी कॅप्टनना टार्गेट करण्यास सुरुवात केली. २०१५ चे बरगाडी गोळीबार प्रकरण बाहेर काढले. या प्रकरणात अडकलेल्या बादल यांना कॅप्टनकडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सिद्धूंनी केला. तसेच खाण माफिया आणि वाहतूक माफियावरूनही सिद्धूने कॅप्टनला धारेवर धरले.

महाद्वार काल्याने आषाढी वारीची सांगता

आता प्रश्न असा की सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष बनवल्यामुळे काँग्रेसची स्थिती सुधारेल की बिघडेल? याचे उत्तर येणारा काळच देईल; पण प्रश्न असा की, ते सर्वांना सोबत घेऊन चालणार का? आणि ते कसे चालणार? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे सिद्धूंना कधीही काँग्रेसचे खूप पाठबळ मिळाले नाही. साहजिकच, पक्षात एकता नसेल तर आव्हाने अधिकच गडद होणार आहेत. विधानसभेची निवडणूक जवळ येताच पक्षांतर्गत कलह वाढू शकतो. वास्तविक कॅप्टन अमरिंदरसिंह सरकारने काहीच केले नाही, असे नाही. पण ज्येष्ठतेकडे झुकलेल्या कॅप्टन यांच्या कार्यशैलीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पंजाबच्या राजकारणात सध्या दलित आणि हिंदू हे केंद्रस्थानी असून दोन्ही घटकांना प्राधान्य देण्याची ही पहिलीच वेळ आाहे. काँग्रेसने जातीचे राजकारण करण्यासाठी जैत निवासी टकसानी काँग्रेस नेते पवन गोयल यांना पंजाबचे कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्याबरोबर आणखी तीन कार्यकारी अध्यक्ष देखील केले. कुलजित नागरा, सुखविंदर सिंग डॅनी आणि संगत सिंग यांचा समावेश आहे. त्यांची नियुक्ती ही जातीय समीकरणे आणि क्षेत्रिय संतुलन साधण्यासाठी केली आहे.

आतापर्यंत शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस पक्ष या दोन प्रमुख पक्षांनी एकूण लोकसंख्येच्या १९ टक्के हिस्सा असणा-या जाट समुदायावर खेळी केली आहे. परंतु त्यांची यंदाची नजर ७० टक्के दलित आणि हिंदू व्होट बँकवर आहे. यात काँग्रेस आणि अकाली दल सामील आहेत. पंजाबच्या राजकारणात दलित आणि हिंदूंची नेहमीच उपेक्षा झाली आहे. रामगडिया शिख समुदायाशी संबंध असणारे ग्यानी झैल सिंग वगळता १९६७ नंतर पंजाबमध्ये गैर जाट शिख कधीही मुख्यमंत्री बनला नाही. अकाली दलाने सरकार स्थापन झाल्यास हिंदू आणि दलित घटकातील व्यक्ती उपमुख्यमंत्री होईल, असे जाहीर केले. काँग्रेस, आम आदमी पक्ष देखील हिंदू आणि दलितांना प्राधान्य देत आहे. अकाली दलाने बसपाशी समझोता केला आहे. त्यामुळे सध्याचे पंजाबचे सत्ता समीकरण गोंधळाचे झाले आहे. अशावेळी काँग्रेस कसा सामना करेल, हा खरा प्रश्न आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग अजूनही प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते आहेत. पंजाबच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. सिद्धू प्रदेशाध्यक्ष झाल्याने पंजाबच्या युवकांत उत्साह संचारला आहे. सिद्धू हे पूर्वीपासूनच लोकप्रिय आहेत. त्यांचे वक्तृत्व कौशल्य सर्वच जण जाणून आहेत. त्यामुळे आगामी काळात दिल्लीश्वर पंजाब काँग्रेसमधील धग कशी शांत करतील हे पाहावे लागेल.

प्रा. पोपट नाईकनवरे
राज्यशास्त्र अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या