22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषघट्ट होतोय प्रदूषणाचा विळखा!

घट्ट होतोय प्रदूषणाचा विळखा!

एकमत ऑनलाईन

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या देशात आज सर्व संसाधने प्रदूषित होत आहेत. वायुप्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे. सर्वेक्षणात दरवर्षी भारत प्रदूषणाचे नवनवीन विक्रम नोंदवीत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आज आपण जगात आघाडीवर आहोत. चीनमध्येही अशीच समस्या होती. परंतु त्यांनी ठोस कृति आराखडा तयार केला आणि त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली. चीन हे करू शकतो तर आपण का नाही करू शकत?

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या जीवनासाठी अत्यावश्यक पंचमहातत्त्वांपैकी कोणता घटक आज प्रदूषणापासून मुक्त राहिला आहे? हवा, माती, पाणी सारेच प्रदूषित झाले आहे. ही पंचमहातत्त्वे जीवनाचा मूलाधार आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. यापैकी कोणत्याही एका घटकाच्या अभावाने जीवन संपुष्टात येईल. भारताला हे सर्व घटक वारशाने विपुल प्रमाणात मिळाले आहेत. आपल्याकडे जंगले, पाणवठे, नद्या, पर्वत, माती, सुपीकता सारे काही होते. जीवनाचे आधार असलेले सर्व घटक येथे विपुल प्रमाणात असल्यामुळेच आक्रमक या भूमीच्या दिशेने पुन:पुन्हा येत राहिले. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या देशात आज सर्व संसाधने प्रदूषित होत आहेत. वायुप्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे. सर्वेक्षणात दरवर्षी भारत प्रदूषणाचे नवनवीन विक्रम नोंदवीत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आज आपण जगात आघाडीवर आहोत.

देशातील ६३ टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहते, जिथे हवेचा दर्जा निर्धारित पातळीपेक्षा खराब असतो. भारताने निश्चित केलेला निकष ४० मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर आहे. जागतिक प्रमाणाशी तुलना केल्यास तो ११ पट अधिक आहे. जागतिक मानकांनुसार देशातील ९० टक्के लोकसंख्या प्रदूषणाच्या विळख्यात असण्याची शक्यता आहे. २०१३ पासून जगातील ४४ टक्के प्रदूषण भारतात होत आहे. भूतान हा आग्नेय आशियातील एकमेव असा देश आहे, जिथे नकारात्मक कार्बन फूटप्रिंट आहे. म्हणजेच भूतान जेवढा कार्बन उत्सर्जित करतो, त्यापेक्षा जास्त ती क्षती ऑक्सिजनने भरून काढली जाते. आपल्याकडील प्रदूषणाचा बोजा भूतानवरही पडत आहे. जीडीपी, लोकसंख्या, क्षेत्रफळ, क्षमता या बाबतीत तो आपल्यापेक्षा खूपच लहान देश आहे. परंतु उत्तम नैसर्गिक संतुलन राखलेला हा देश आहे. आपली संस्कृती नद्यांच्या काठांवर विकसित झाली आहे, कारण शेतीयोग्य माती आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे तेथे जीवन सोपे झाले.

एका अहवालानुसार, गंगेच्या मैदानात जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या तुलनेत २१ पट अधिक वायुप्रदूषण आहे. या भागात देशाची बहुसंख्य लोकसंख्या राहते. घनदाट वस्तीमुळे तेथील लोकसंख्येचा मोठा भाग प्रदूषणाच्या विळख्यात आहे. लॅन्सेटच्या २०१९ च्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे १.६ दशलक्ष मृत्यू होत आहेत. हा आकडा एकंदरीत अकाली मृत्यूंच्या आकडेवारीच्या १७ टक्के आहे. औद्योगीकरण हे वायुप्रदूषणाच्या प्रमुख तीन कारणांपैकी आहे. विकासासाठी ते आवश्यक आहे; मात्र नियोजनशून्यतेमुळे अडचणी वाढल्या आहेत. शहराच्या मध्यभागी मोठा उद्योग उभारण्यासारख्या घटनांमुळे हवा प्रदूषित झाली. दुसरे म्हणजे आर्थिक विकासाच्या नावाखाली मोठे महामार्ग, कॉरिडॉर बांधले गेले. ते आवश्यकही आहे; पण त्यासाठी लाखो झाडे तोडण्यात आली. भरपाई म्हणून नवी झाडे लावण्याचे आश्वासन दिले गेले; परंतु ते पूर्ण होणार का, हा प्रश्न आहे. तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या होय. सन २००० पासून रस्त्यांवरील वाहनांची संख्या चार पटींनी वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण अधिक गंभीर बनले आहे. गरज असेल तरच कार घ्या, असा स्वीडनमध्ये नियम आहे. एकाच ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ वाहन उभे राहिल्यास त्यावर दंड आकारला जातो. परंतु याउलट आपल्या देशातील अनेक कुटुंबांकडे चार ते पाच वाहने आहेत. प्रदूषकांमध्ये पीएम २.५ ची चर्चा होते; परंतु पीएम १० वर मात्र चर्चा होत नाही.

या प्रदूषणाची निर्मिती रस्त्याकडेच्या धुळीमध्ये होते. वायुप्रदूषणामुळे सरासरी आयुर्मान दोन ते अडीच वर्षांनी कमी झाले आहे. कर्करोग शल्यचिकित्सक म्हणून मी लोकांना दारू आणि सिगारेट सोडण्याचे आवाहन करतो. परंतु प्रदूषणासोबतच या सवयींमुळेही लोकांना धोका निर्माण झाला आहे, हे लज्जास्पद आहे. सिगारेटमुळे आयुर्मान १.९ वर्षांनी, दारूमुळे आठ महिन्यांनी, पाण्याच्या सततच्या प्रदूषणामुळे सात महिन्यांनी तर एचआयव्ही, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांमुळे तीन ते चार महिन्यांनी कमी होते. रस्त्यांवरील अपघात हे भारतातील मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. दुसरे हृदयविकार आणि तिसरे कर्करोग आहे. आपण बारकाईने शोध घेतला तर वायुप्रदूषण हे कारण शीर्षस्थानी पोहोचेल. कारण हवेचे प्रदूषण हृदयविकाराचा झटका, कर्करोग आदी आजारांना कारणीभूत आहे. चीनमध्येही अशीच समस्या होती. परंतु त्यांनी ठोस कृति आराखडा तयार केला आणि त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली. २०१३ पासून दरवर्षी त्यांचे वायुप्रदूषण सातत्याने कमी होत आहे. चीन हे करू शकतो तर आपण का नाही करू शकत?

हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत प्रदूषण वाढते. त्यावेळी तापमान झपाट्याने कमी होते. जमिनीपासून जे प्रदूषण खूप उंचावर असते, ते वातावरणात आर्द्रता येताच खाली येते. त्यामुळे लोकांना प्रदूषणाचा त्रास जाणवू लागतो. शेतात पिकाचे बुडखे जाळणे आणि फटाके यामुळे हे प्रदूषण अधिक गंभीर बनते. प्रदूषण नेहमीच असते, हे वास्तव आहे. यावर गांभीर्याने विचार करणे हाच उपाय आहे. प्रदूषणाला कारणीभूत ठरणा-या विकासाच्या उपक्रमांमधून रोगांवरील खर्चाची किंमत वजा केली तर आपल्याला दिसत असलेला फायदा खूपच कमी उरतो. दुसरी गोष्ट अशी की, ही समस्या एका व्यक्तीपुरती किंवा एका पिढीपुरती मर्यादित नाही. संपूर्ण देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ही त्रासदायक समस्या आहे. आपल्याला केवळ वर्तमानाचीच नव्हे तर भविष्याचीही काळजी करण्याची गरज आहे. आपण भावी पिढीला काय देत आहोत, याचा विचार करायला हवा. यामध्ये अशा लोकांनाही फटका बसत आहे, ज्यांचा काहीही दोष नाही. प्रदूषण नियंत्रण हे आपल्या प्राधान्यक्रमात असायला हवे. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. केवळ प्राधान्य दिल्यानेच आपण कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढू शकतो. म्हणजेच, प्राधान्यक्रम महत्त्वाचा!

– रंगनाथ कोकणे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या