24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषलोकप्रिय लोकनेता

लोकप्रिय लोकनेता

एकमत ऑनलाईन

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची २६ मे रोजी ७७ वी जयंती विविध विधायक उपक्रमांनी साजरी होत आहे. लोकशाहीतील लोकनेता हा लोकगंगेच्या प्रवाहातून रुजत, वाढत, विस्तारत जात असतो. एखाद्या नदीप्रमाणे तो लोकांचे जीवन सुखी, समृध्द आणि संपन्न करतो. आदरणीय विलासराव देशमुख यांचा लोकसेवेला समर्पित नेतृत्वाचा प्रवास असाच झाला आहे. बाभळगावचे सरपंच, लातूरचे आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्याचे दोनदा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी त्यांची वाटचाल राहिली. या काळातील कार्यामुळे त्यांच्या रूपाने लोकशाहीतील नेतृत्वाचे एक नवे परिमाण निर्माण झाले आहे.

सर्वांगीण विकासाचे सूत्र
विलासरावजी देशमुख यांनी आपल्या राजकीय वाटचालीत विविध पदांवर काम केले. या कार्यकाळात लातूरसह राज्यातील आणि देशातील लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी अहोरात्र काम केले. सार्वजनिक जीवनात प्रारंभीपासून त्यांचे सर्वांगीण विकासाचे सूत्र हा विकासमंत्र होता. त्यांच्या विलक्षण नेतृत्वामुळे लातूरकरांनी कात टाकून शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली. सहकार, कृषी, सिंचन, उद्योग-व्यवसाय, मूलभूत सोयीसुविधांच्या विकासातून आर्थिक क्रांती झाली.

नव्या विचारांची पेरणी
लातूर जिल्ह्यात सामाजिक सलोख्याची परंपरा आहे. विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा सामाजिक वातावरणाची, सौहार्दतेची संस्कृती जपली आणि वाढवली. यामुळे येथे उद्योग, व्यवसाय, व्यापारास चालना मिळाली. सर्वसामान्यांनी प्रबोधनाची कास धरली व एक विकासाची चळवळ येथे सुरू झाली. सामाजिक प्रबोधनाची आंदोलने या काळात झाली. माणसाच्या मनातील वाईट रूढी, परंपरा, कर्मठता, देवभोळेपणा ही दैववादीवृत्ती नव्या प्रगतीच्या विचारांची पेरणी करून नष्ट केली. आपणही काही केले पाहिजे ही विधायक ऊर्मी सामान्य लातूरकरांत जागवली. यामुळे लातूरची प्रगती सर्व क्षेत्रांत होत आहे.

विकासाचा सुवर्णकाळ
लातूर आणि लातूरकरांवर विलासरावजींचे अतोनात प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लातूरचे हित जोपासले. राजकीय जीवनात काम करताना ‘जे नवं ते लातूरला हवं’ हे ब्रीद पाळले. यामुळे लातूरमध्ये अनेक योजना मार्गी लागल्या. राजकीय वाटचालीत ज्या खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारला त्या खात्याची योजना लातूरला विकासाचा पहिला घास म्हणून आणली. सन १९८० ला पहिल्यांदा आमदार, १९८२ ला गृहराज्यमंत्री असताना त्यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयाची इमारत, पोलिस वसाहत, शहरात तीन नवी पोलिस ठाणी उभी केली. १९८५ ला साहेब कॅबिनेट मंत्री झाले. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात विलासरावांकडे महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक व संसदीय कामकाज ही खाती होती. या काळात त्यांनी लातूरकरांच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ मांजरा कारखान्याच्या रूपाने उभारली. जिल्हा परिषदेची तीन मजली इमारत उभी करून शहरातील ४३ प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणली. नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय उभारले, परिवहन खात्याचा मंत्री म्हणून ‘गाव तेथे गाडी’ योजना राबविली. नंतरच्या काळात कृषी, लाभक्षेत्र विकास, फलोद्यान व पर्यटन विकास ही खाती सांभाळली. यावेळी लातूर येथे कृषि महाविद्यालय व उदगीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. कृषि महाविद्यालय, विभागीय कार्यालये लातुरात आणण्यात विलासरावजींचा सिंहाचा वाटा होता. लातूर हे व्यापार व व्यवसायांचे प्रमुख शहर आहे. या शहराला दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध होऊन विकासाला गती देण्यासाठी रेल्वे, विमानसेवा व राष्ट्रीय महामार्ग जोडणी यातून लातूर देशातील प्रमुख शहरांशी व जगभराशी जोडले.

सहकार आणि साखर उद्योगाला चालना
विलासरावजींना शेती, शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास होता, अभिमान होता. या भागाच्या उन्नतीसाठी सहकार, साखर उद्योग, आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण विकासासाठी दूरगामी निर्णय घेतले, योजना राबविल्या. सहकार आणि साखर उद्योगासाठी साखर धोरण ठरवले. कारखाना आधुनिकीकरण, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीस वित्त सहाय्य, ऊसविकास योजना, साखर आयात-निर्यात धोरण, अतिरिक्त उसाचे गाळप, साखर उतारा घट अनुदान, वाहतूक अनुदान, थकहमी, बफरस्टॉक, ऊसशेती यांत्रिकीकरण, विस्तारीकरण व उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प उभारणीस सभासदांची सक्तीने कपात न करणे हे त्यांनी घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत.

कृषीविकासासाठी ऐतिहासिक निर्णय
विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची जडणघडणच ग्रामीण भागातून झाली आहे. त्यांच्यावरचे सर्व संस्कार ग्रामीण संस्कृती, शेतीमाती या कुशीत झाले. यामुळे शेती, सहकार, ग्रामविकास, ग्रामीण भागातील जनजीवन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. सरपंचपदापासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदावर काम करताना या विषयाला त्यांनी न्याय दिला. यामुळे विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ हा सर्व दृष्टीने शेतक-यांसाठी सुवर्णकाळ होता. राज्यातील शेतक-यांसाठी मंत्रालय कृषीपंढरीच ठरली होती. त्यांनी शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय कृषीविकासासाठी घेतले. यामध्ये सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २१ टीएमसी पाणी मंजुरी, कर्जमाफी, शून्य टक्के व्याजदराने कर्ज, कृषी यांत्रिकीकरणास अनुदान, जैवतंत्रज्ञान धोरण, साखर धोरण, ऊसविकास योजना, इथेनॉल धोरण, अपारंपरिक ऊर्जा धोरण, आजारी साखर कारखान्यांना मदत, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, कृषी संशोधन संस्थांना भरीव मदत, बाजार समिती अद्ययावत करणे, कृषिमाल तारण योजना, शेती स्वावलंबन मिशन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, योजना राबविल्या. या योजना कृषीविकासाला दिशा देणा-या आहेत.

कर्तबगार मुख्यमंत्री
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक काळ आघाडी सरकार चालविले. या सरकारच्या माध्यमातून विशेषत: बहुजनांसाठी कार्य केले. राजकीय, सामाजिक, कृषी, आर्थिक, संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा दाखविणारे आहे. मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २१ टीएमसी पाणी मंजूर करणे, आशिया खंडातील पहिल्या मोनोरेल सेवेस मंजुरी, माहिती अधिकार, मराठवाडा विकासनिधी, महिला बचत गटांना अल्प व्याजाने कर्ज, सामाजिक विकास समन्वय कक्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रात अश्वारूढ पुतळा उभारणी, खेळाडंूना आरक्षण, दुय्यम न्यायालयात मराठीत निर्णय, ग्रंथालय अनुदानात वाढ, गृहनिर्माण धोरण, राज्य भारनियमनमुक्त केले, झोपडपट्टी पुनर्वसन, शेतकरी व विद्यार्थ्यांना विमा योजना असे एक ना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले यामुळे महाराष्ट्र विकास, गुंतवणूक यामध्ये देशात क्रमांक एकचे राज्य झाले होते. विलासरावजी देशमुख या अलौकिक नेतृत्वाची आज जयंती आहे, त्यांना शतश: नमन.

-राहुल इंगळे पाटील

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या