28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषउसाचा भाला करून सराव

उसाचा भाला करून सराव

एकमत ऑनलाईन

वडिलांची नजर चुकवून ती पहाटे चार वाजता उठून सरावासाठी शेतात पोहोचत असे. तिच्या मेहनतीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी उपेंद्रकुमारने तिला गुरुकुल प्रभात आश्रमाचा रस्ता दाखवला. हा आश्रम त्यांच्या घरापासून २० किलोमीटर अंतरावर होता. अशा परिस्थितीत अन्नू आठवड्यातून तीन दिवस गुरुकुल प्रभात आश्रमाच्या मैदानावर भालाफेकीचा सराव करण्यासाठी जात असे.

भारताच्या अन्नू राणीने राष्ट्रकुल स्पर्धेत (२०२२) इतिहास रचला. ६० मीटर अंतरावर भालाफेक करून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी भालाफेकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला ठरली. वास्तविक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत पदक जिंकण्याच्या अपेक्षांचा भार देशाची कन्या अन्नू राणीवर होता. सर्वजण तिच्या विजयासाठी शुभेच्छा देत होते. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधना भागातील एका छोट्याशा गावात राहणा-या अन्नू राणीने पदक जिंकून करोडो देशवासीयांच्या अपेक्षा ख-या ठरवल्या. तिच्या यशात तिचा मोठा भाऊ उपेंद्र याचा अतुलनीय वाटा होता. क्रिकेट खेळताना अन्नू राणीचा थ्रो पाहून तिला भालाफेकीत पुढे जाण्याची प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे उपेंद्र. पाच भावंडांमध्ये अन्नू सर्वांत लहान आहे. वडिलांकडे फारशी शेतजमीन नव्हती. अशा परिस्थितीत आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. परंतु अन्नूला भालाफेकमध्ये ती चांगली कामगिरी करू शकते हे समजल्यावर तिने भाला म्हणून ऊस फेकण्याचा सराव सुरू केला. नंतर बांबूला भाल्याचा आकार देऊन सराव सुरूच ठेवला. २००८ च्या सुमारास अन्नूने शालेय खेळात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने राज्य स्तरावर पदक पटकावले आणि नंतर मागे वळून पाहिले नाही.

उपेंद्र कुमार यांनीही अन्नू राणीच्या करिअरकडे लक्ष देण्यासाठी स्वत:च्या करिअरकडे फारसे लक्ष दिले नाही. उपेंद्र मेरठ कॉलेजमधून पदवीधर आहे. तो १५०० मीटरमधील धावपटूही आहे आणि त्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु दोन्ही खेळाडूंच्या सप्लिमेन्ट्स, डाएट आणि इतर खर्च भागविता येईल, अशी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. एकाचाच खर्च भागवता येईल, अशी स्थिती असल्यामुळे अन्नूच्या पाठीशी उपेंद्र उभा राहिला. त्याने बहिणीसाठी अ‍ॅथलेटिक्स सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपेंद्रनेही वडिलांप्रमाणेच शेती करण्यास सुरुवात केली. आजही तो शेतीच करतो. अन्नूचे वडील अमरपालसिंग हे सामान्य शेतकरी असून, खेळात मुलीने सहभागी होणे त्यांना अजिबात आवडले नाही. अशा परिस्थितीत वडिलांची नजर चुकवून ती पहाटे चार वाजता उठून सरावासाठी शेतात पोहोचत असे.

तिच्या मेहनतीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी उपेंद्रकुमारने तिला गुरुकुल प्रभात आश्रमाचा रस्ता दाखवला. हा आश्रम त्यांच्या घरापासून २० किलोमीटर अंतरावर होता. अशा परिस्थितीत अन्नू आठवड्यातून तीन दिवस गुरुकुल प्रभात आश्रमाच्या मैदानावर भालाफेकीचा सराव करण्यासाठी जात असे. अन्नूकडे सरावासाठी शूजदेखील नव्हते असे उपेंद्र सांगतात. देणगीतून जमा झालेल्या पैशातून तिच्यासाठी शूज खरेदी करण्यात आले. उपेंद्र सांगतात की, टोकियो ऑलिम्पिकच्या तीन ते चार महिने आधी अन्नू राणीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तिच्यावर चेन्नईत उपचार सुरू होते. परंतु ईश्वराच्या कृपेने सर्वकाही ठीक झाले आणि राष्ट्रकुल स्पर्धेला बर्मिंगहॅमला जाण्यापूर्वी अन्नूमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास संचारला. उपेंद्र हे स्पर्धेपूर्वी अन्नूशी बोलले होते. पदक येणार याची तिला पूर्ण खात्री होती फक्त रंग कोणता असेल, हे माहीत नव्हते. आता अन्नूने कांस्यपदक जिंकल्याने उपेंद्र पूर्णपणे समाधानी आहेत. संसाधनांची कमतरता असूनही भालाफेकमधील या कामगिरीला कमी लेखता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नू राणीने चौथ्या प्रयत्नात राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले.
-विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या