30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home विशेष अनमोल हिरा

अनमोल हिरा

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती अशी की सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक सत्यजित राय यांचे ते आवडते अभिनेते होत. राय यांच्या अभिनयाच्या अपेक्षा आणि निकष किती कठोर होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या तब्बल १४ चित्रपटांमध्ये सौमित्र चटर्जी यांनी भूमिका केल्या. केवळ बंगाली चित्रपटसृष्टीतच नव्हे तर जागतिक चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा होता. दिवाळीच्या दुस-याच दिवशी या सिद्धहस्त अभिनेत्याने कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोविड-१९ च्या संसर्गामुळे ६ ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक आजारांनी पीडित असलेले चटर्जी ८५ वर्षांचे असल्यामुळे कोविडची लागण होताच गुंतागुंत वाढत गेली आणि अखेर त्यांनी मृत्यूसमोर शरणागती पत्करली. बंगाली लोकांमध्ये सत्यजित राय जितके लोकप्रिय तितकेच सौमित्र चटर्जीही. एखादा अभिनेता केवळ अभिनयाच्या बळावर नव्हे तर गोड स्वभावाच्या आणि चौफेर अभ्यासाच्या जोरावर आपली लोकप्रियता किती पटींनी वाढवू शकतो, हे चटर्जी यांनी दाखवून दिले. नटाला प्रगल्भता येण्यासाठी विविधांगी अभ्यास उपयुक्त ठरतो, हे वास्तव आजकाल फार कमी अभिनेते स्वीकारतील. परंतु अभिनयाच्या विश्वात दीर्घकाळ मुशाफिरी करण्यासाठी केवळ अभिनयाचीच नव्हे तर ज्ञानाची कक्षाही रुंद करावी लागते.

‘अपू’ या तीन चित्रपटांच्या मालिकेतील ‘अपराजितो’ या पहिल्या चित्रपटात सत्यजित राय यांनी सौमित्र यांना अपूच्या भूमिकेसाठी निवडले नव्हते. कारण त्या चित्रपटात अपू पोरगेला दिसणे अपेक्षित होते आणि सौमित्र हे काहीसे थोराड दिसत होते. परंतु अपू हे पात्र सौमित्र यांच्या अभिनयानेच अजरामर होणार हे जणूकाही ठरलेलेच होते. म्हणूनच ‘अपूर संसार’ या चित्रपटात अपूची भूमिका साकारून सौमित्र यांनी रसिकमनावर खोलवर ठसा उमटवला. अपू म्हणजे सौमित्र असेच समीकरण बनले. पुढे राय यांच्या ‘फेलुदा’ या व्यक्तिरेखेलाही सौमित्र यांनीच भरभरून न्याय दिला. त्यामुळे राय आणि सौमित्र यांच्यातील नाते आणखी भक्कम झाले. एखाद्या कलाकृतीतून बौद्धिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या काही सामग्री मिळावी, अशी अपेक्षा असणारे रसिक संख्येने कमी असतात; पण प्रत्येक काळात ते असतात हे नक्की.

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

कलाकृतीतून मनोरंजन तर व्हायलाच हवे; पण जीवनविषयक दृष्टिकोन आणि रोजची लढाई लढण्यासाठी बळ देणारा विचारही मिळायला हवा. बंगालची भूमीच बुद्धिवंतांची असून, या परंपरेतील बुद्धिवादी रसिकांना सौमित्र यांचे मोठे आकर्षण होते. सौमित्र यांना साहित्य आणि काव्याची आवड आणि जाण होती. विचारांना भक्कम पाया होता. रवींद्र संगीताची आवड होती. त्यामुळेच बुद्धिवादी रसिकांचे सौमित्र यांच्याशी घट्ट ऋणानुबंध जुळले होते. एका यशस्वी नटाला आवश्यक असणारे बा व्यक्तिमत्त्व, आवाज आणि चेहरा सौमित्र चटर्जी यांच्याकडे होताच. सत्यजित राय आणि सौमित्र चटर्जी यांच्या नात्याविषयी बोलायचे झाल्यास अभिनेता म्हणून जेवढा विश्वास राय यांनी सौमित्र यांच्यावर दाखविला, तेवढ्याच विश्वासाने सौमित्र यांनी स्वत:ची कारकीर्द राय यांच्या स्वाधीन केली.

सत्यजित राय यांनी घडविलेले अभिनेते म्हणूनच सौमित्र ओळखले जातात. राय यांनीच सौमित्र यांना जगातील उत्तमोत्तम चित्रकृती पाहण्याची, अभ्यासण्याची सवय लावली. कलाकृतीच्या रसग्रहणातून घडणारे व्यक्तिमत्त्व अधिक तेजस्वी असते, हे सौमित्र यांनीही जगाला दाखवून दिले. चारुलता, जोय बाबा फेलुनाथ, हिराक राजार देशे, शोनार केल्ला, अरण्येर दिनरात्री हे सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेले आणि सौमित्र यांनी अभिनित केलेले चित्रपट होत. याखेरीज सौमित्र यांनी मृणाल सेन, तपन सिन्हा, गौतम घोष, अपर्णा सेन, तरुण मुजूमदार, अंजन दास आदी दिग्दर्शकांसमवेत काम केले. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम मानणा-या कलावंतांपैकी सौमित्र हे एक होते. हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांचा बोलबाला असतो आणि म्हणूनच त्यांनी हिंदी चित्रपट करणे टाळले असावे. शिवाय, आपण जे करतो आहोत ते सकस असल्याचे जाणवल्यास कोणताही कलावंत त्याच्या आसपास आणखी शक्यता तपासत राहतो.

एखादी कलाकृती जेव्हा वैश्विक बनते, तेव्हा ती भाषेच्या पलीकडे गेलेली असते. तीनशेपेक्षा अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाची जादू पेरणारे सौमित्र यांचे वर्णन एखाद्या शब्दाने, वाक्याने किंवा परिच्छेदानेही करता येणार नाही. ते बंगाली चित्रपटांपुरते मर्यादित राहिले; पण अभिनयातील गुणवत्तेमुळे वैश्विक सिनेमामध्ये लौकिक मिळविला. रंगभूमी आणि रुपेरी पडदा अशा दोन्ही माध्यमांतील अभिनयात वाक्बगार असणा-या सौमित्र यांनी बॉलिवूडच्या झगमगाटाकडे मात्र साफ पाठ केली. बॉलिवूडमधून अनेक प्रस्ताव त्यांना प्राप्त झाले होते; परंतु कोलकाता सोडून ते मुंबईला कधीच आले नाहीत. साहित्यविषयक जी कामे आपल्याला करायची आहेत, त्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य या झगमगाटामुळे हिरावले जाईल, असे त्यांना वाटत असे. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी एका नियतकालिकाचे संपादन केले. देश, राज्य आणि भाषांच्या सीमा ओलांडून त्यांनी सत्यजित राय यांच्या दृष्टीला पडद्यावर मूर्तरूप प्रदान केले. तीनशेपेक्षा अधिक चित्रपटांत काम करणारे सौमित्र यांनी समांतर चित्रपटांप्रमाणेच व्यावसायिक चित्रपटांमध्ये स्वत:ला त्या ढंगात पेश केले. केवळ अभिनयच नव्हे तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी काम केले.

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

कोलकाता येथे १९३५ मध्ये सौमित्र यांचा जन्म झाला. नाडिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. कौटुंबिक नाटकांच्या माध्यमातून अभिनयाशी त्यांचा पहिला संबंध त्यांचे आजोबा आणि वडील यांच्यामुळे आला. ते दोघेही कलाकार होते. कोलकाता विद्यापीठातून बंगाली साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर सौमित्र यांची अभिनेता म्हणून खरी कारकीर्द सुरू झाली. चित्रपटात दिग्दर्शकाचे आणि लेखकाचे ऐकून त्याबरहुकूम काम करणारे सौमित्र व्यक्तिगत जीवनात मात्र स्वतंत्र मनोवृत्तीचे होते आणि आपल्या तत्त्वांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी एकदा सोडून दोनदा नकार दिला. २००१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही नाकारला. पुरस्कार निवड समितीच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला होता. २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पोड्डोखेप’ या चित्रपटासाठी २००६ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर २०१२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अभिनय कौशल्याची सर्वांत मोठी पावती म्हणजे फ्रान्सचा ‘लीजन डी ऑनर’ हा सर्वोच्च सन्मान सौमित्र यांना २०१८ मध्ये प्रदान करण्यात आला. एवढ्या मोठ्या उंचीचा अभिनेता आणि तत्त्वनिष्ठ माणूस आज आपल्यात राहिला नाही; मात्र त्यांचे काम आणि त्यांच्या स्मृती आपल्याला सातत्याने प्रेरणा देत राहतील.

मानवेंद्र उपाध्याय, सिनेसमीक्षक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या