जागतिक दिनांमध्ये सगळ्यात गाजतो तो १४ फेबु्रवारीचा व्हॅलेंटाईन डे! तरुणाईच्या गळ्यातला ताईतच तो.
‘प्रीती मिळेल का हो बाजारी,
प्रीती मिळेल का हो शेजारी…’
अशी प्रेमिकांची वणवण असते. व्हॅलेंटाईन हा आंतरराष्ट्रीय दिवस प्रेमासाठी आसुसलेल्या ‘तरुण’ मंडळीसाठी असतो आणि तरुणाईच्या जल्लोषाचा तो प्रतिध्वनी असतो. व्हॅलेंटाईन डे आपल्या संस्कृतीत बसत नाही म्हणून मागे कल्लोळ उडाला होता, पण जगातल्या कुठल्याही भागातले तरुण संवेदनशील असतात, हेच खरे.
प्रेम का टिकते नि ते दोघे एकमेकांना का आवडत राहतात, माहितीय का?
‘मला तू आवडतेस कारण
मी तुला काही स्पेशल सांगितलं तर
तुला कळतं की ते स्पेशल आहे…
आणि तू ते लक्षात ठेवतोस, अगदी असंख्य काळ’
प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील उत्कटता व्यक्त करणा-या अमृता प्रीतम यांच्या ओळी आहेत-
चादरीला ठिगळ पडले तर टाका घालू शकतो,
आकाश फाटलं तर कसं शिवता येईल?
नवरा मेला तर पुन्हा लग्न करता येते,
प्रियकर गेला तर मग कसं जगायचं?
अमृता-इमरोज ही एक झकास व्हॅलेंटाईन जोडी होती. रोमिओ-ज्युलियट, हिर-रांझा, बाजीराव-मस्तानी, नल-दमयंती, शिरी-फरहाद, लैला-मजनू यांच्याही प्रेमापेक्षा सरस वाटणारी. ती कविता जगली नि तो जीवन रेखाटत गेला. आसक्तीशिवाय परस्परांना तरलतेने आयुष्यभर सांभाळणे किती श्रेष्ठ दर्जाचे असू शकते, हे त्यांच्या प्रेमकथेतून शिकण्यासारखे आहे. प्रियकरांनी स्वप्ने विणण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा ‘स्वप्ने होण्याचे’ ठरविले पाहिजे. प्रेमाच्या नात्यात गुलाबाचा गंध दरवळत असतो; पाकळ्यांखालील काट्यांनी सावध होत असता, तो मनमुराद लुटायचा असतो. वपूंनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘कुणी कुणासाठी त्याग केला याचा हिशेब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहोर येण्याचा काळ संपला हे जाणावं.’’
मानवी जीवन हेच मुळी प्रेम या भावनेभोवती केंद्रित झालेले असते. प्रेम म्हणा, वा प्रीती! या अडीच शब्दांतील सामर्थ्य किती अद्भूत असते! जीवनाच्या वाटचालीत ओळखपाळख नसलेले दोन तरुण जीव एकत्र येतात, त्यांच्या भेटीगाठी होतात, ओळखीपाळखी वाढतात. एकमेकांशी चालता-बोलता विचार देतात, विचार घेतात. दोघांच्या विचारधारा जुळल्या की ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मानवी मनावर अमर्याद सत्ता गाजविणारी प्रेम ही अमूर्त शक्ती आहे. या शक्तीमुळेच तर वणवण भटकणारे दोन जीव रेशमी मुलायम धाग्यांनी बांधले जातात. प्रेमात पडलेल्या दोन माणसांच्या खोल वक्षी, सदैव एक निळा पक्षी सुंदर नक्षी कोरीत असतो आणि त्याला केवळ त्यांच्या स्वत:ची मने साक्षी असतात.
प्रेमिकांच्या प्रीतीभक्तीमागची (रोमान्स) केमिस्ट्री संशोधकांनी उलगडली आहे. प्रेमात पडलेल्या जोडीदारांच्या मेंदूतला विशिष्ट भाग ‘प्रकाशमान’ होतो आणि त्याच्या शरीरातील रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यांच्या तनोमनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि प्रेमभक्तीस उपयुक्त होतात. डोपामाईन या मेंदूतील शक्तिशाली रसायनाची ती किमया असते. प्रेम ही केवळ भावना नव्हे, तर चांगल्या आरोग्याची ती एक किल्लीदेखील असते. स्त्री-पुरुष मैत्री म्हटलं रे म्हटलं की ती ‘सेक्स रिलेशन’साठीच अशा ख-या शिक्क्यासकट माणसं गृहित धरतात. तो शिक्का सतत ओला ठेवतात. म्हणूनच मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू सांभाळण्याइतके जोखमीचे असते. शन्नांची ‘शहणी सकाळ’ त्यासाठी नजरेसमोर असावी लागते.
सध्याच्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’च्या जमान्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या साजरीकरणाला उधाण येणार आहे. तेव्हा, रॉय क्रॉफ्टच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे – I Love you, Not Only for what you are, but What I Am With you ही भावना प्रेमिकांत जेव्हा प्रबळ होईल तो त्यांचा खरा ‘व्हॅलेंटाईन डे’ असेल. आपल्याला आपले आईवडील निवडता येत नाहीत, पण मित्रमैत्रिणी निवडता येतात. त्यामुळे, मित्रमैत्रिणींचे आपल्या जीवनातले स्थान खूप महत्त्वाचे असते. दु:खात आपल्याला अनेकांची सहानुभूती मिळते. पण आपल्या आनंदात सहभागी होतात, तेच खरे मित्र होत. आपण एखाद्याला किंवा एखादीला त्यांच्या गुण-दोषांसह स्वीकारतो, तेव्हा ‘मैत्री’ टिकते. तिथे, मग कुठलीही अडचण वा कुठलाही अडथळा बाधा आणू शकत नाही. मनाचा निखळपणा आणि नि:स्वार्थीपणा मैत्रीसाठी आवश्यक असतो. मित्र किंवा मैत्रीण हे आपल्यातीलच चांगुलपणाचे प्रतिबिंब असते. मैत्री निरपेक्ष असावी लागते. परतफेडीची किंवा अन्य अपेक्षा आल्या की मैत्री बाधित होते. मैत्रीत व्यवहार होतो तेव्हा खूप सावध असावे लागते. पाच रुपयांचा हिशेब पारदर्शकतेने करून, नंतर मित्रांसाठी पाचशे रुपये उधळून टाकण्यात जाम मजा येते. ते सौख्य अनुभवण्यासारखे असते.
मैत्री ही व्यापक संकल्पना आहे. मैत्रीला स्थळ, काळ, वेळ, सीमा असे कुठलेच बंधन नसते. मैत्री माणसाशी होते. तशीच ती प्राण्यांसोबत होऊ शकते. निसर्गातल्या एखाद्या स्थळाशी होऊ शकते. ‘वनचरे’ असलेल्या वृक्षवेलींशी मैत्री करणे, ही आजची गरज बनून गेलीय. मैत्रीत बंधन नसावे असे वाटत असले तरी नात्यातही मैत्री होऊ शकते, टिकू शकते. मित्र-मैत्रिणीसारखे सहजीवन जगणारे पती-पत्नी म्हणजे आदर्श जोडपे होय. बाप-लेकांत आणि माय-लेकीत मित्र-मैत्रिणींचे नाते फोफावू शकते. भावाभावांत नि बहिणींमध्येदेखील मैत्र जुळू शकते. खरं पाहता नात्यात टिकून राहते, ती खरी मैत्री! पण त्यासाठी राग, लोभ, मत्सर, हेवा, द्वेष, भांडणे या अडथळ्यांना पार करण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे. अशा वेळी समझोता करणे आणि क्षमा मागणे ही कला आपल्याकडे असणे गरजेचे ठरते. मनाच्या मोठेपणाचे ते निर्देशांक आहेत.
-जोसेफ तुस्कानो, विज्ञान आणि समाजशास्त्राचे अभ्यासक