29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home विशेष तरतुदींचा भोंगा, प्रवाशांना ठेंगा!

तरतुदींचा भोंगा, प्रवाशांना ठेंगा!

एकमत ऑनलाईन

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख १० हजार ०५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तथापि, रेल्वे प्रवाशांसाठी कोणतीही विशेष घोषणा अर्थमंत्र्यांनी केली नाही. मेट्रो रेल्वेसाठी ठिकठिकाणी तरतुदी केल्या असल्या तरी त्याचा लाभ केवळ शहरी प्रवाशांसाठी होईल; परंतु यावर्षी एकाही नवीन रेल्वेगाडीची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ‘विस्टा डोम कोच’ सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. ही गाडी १८० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असून, डिसेंबरमध्ये या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. अर्थात, पर्यटनाला चालना देणे हाच या गाडीचा उद्देश असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा या गाडीशीही तूर्तास संबंध येणार नाही.

शहरी विकासाकडे असलेला सरकारचा ‘फोकस’ आणखी एका गोष्टीतून दिसून येतो. टिअर-२ शहरांमध्ये मेट्रो लाइट आणि मेट्रो नियो सुरू करण्याचा विचार सीतारमन यांनी मांडला. कोची मेट्रोचा ११ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाणार असून, त्यासाठी १९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चेन्नईमध्ये ६३ हजार कोटी रुपये खर्चून १८० किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. बंगळुरूमध्येही १४७८८ कोटी रुपये खर्चाचा ५८ किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग प्रस्तावित असून, नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटी आणि नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त रेल्वेसाठी या अर्थसंकल्पात विशेष असे काहीही दिसले नाही. त्याऐवजी पूर्वीच्याच ‘नॅशनल रेल्वे प्लॅन २०३०’चा पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी केला. या योजनेची सुरुवात २०२० मध्येच करण्यात आली आहे. ‘फ्यूचर रेडी रेल्वे सिस्टिम’ उभारणे हा या योजनेचा उद्देश आहे. मालवाहतुकचे खर्च कमी करण्याचाही उद्देश यामागे असल्याचे सांगितले गेले असले तरी यंदाच्या अर्थसंकल्पात मालवाहतुकसंदर्भात वेगळे काहीच सांगण्यात आलेले नाही.

जून २०२२ पर्यंत ‘इस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ तयार होणे अपेक्षित आहे. ‘नॅशनल रेल्वे प्लॅन’अंतर्गत एकंदर मालवाहतुकत रेल्वेचा हिस्सा ४५ टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याखेरीज देशातील सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण २०२३ पर्यंत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात १३,६८७ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. म्हणजेच दरवर्षी सुमारे २७०० किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण केले गेले. एक ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्युतीकरण केलेल्या मार्गांची लांबी आणखी विस्तारली. एकंदर ६७,४२० किलोमीटरपैकी ४१,५४८ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. आता तीन वर्षांत उर्वरित २६ हजार किलोमीटरचे काम करायचे आहे. म्हणजेच दरवर्षी ८६०० किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण करावे लागेल; परंतु हे उद्दिष्ट अत्यंत अवघड आहे.

– सूर्यकांत पाठक

भाविकांनी दान केलेली १०२१ जमीन मंदिर समितीच्या ताब्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या