23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषजांभूळ रस - फायदे

जांभूळ रस – फायदे

एकमत ऑनलाईन

निळसर जांभळट, किंचित काळसर असलेले जांभूळ फळ उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारे व छोटासा हंगाम असणारे फळ आहे. या दिवसांत (एप्रिल ते जून) जांभळाच्या झाडाखाली सकाळी फेरफटका मारल्यास या फळाचा सडा पडलेला दिसतो. जांभूळ हे आम्ल प्रकृतीचे फळ असले तरी चवीला रुचकर, गोड, थोडेसे तुरट व थंड गुणधर्माचे असून पाचक असते. त्यामुळे जांभूळ फळाच्या किंवा त्याच्या रसाच्या सेवनाने वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष संतुलीत राहण्यास मदत होते. जांभळाच्या फळात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, झिंक, प्रथिने, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, जीवनसत्व-अ, जीवनसत्व-क, किंचित प्रमाणात जीवनसत्व-ब आणि थोड्या प्रमाणात मेदासह अनेक पौष्टिक घटकसुध्दा असतात. त्याचबरोबर कोलीन आणि फॉलिक आम्लसुध्दा या फळात असते. उपयोग : जांभळाचा रस किंवा त्याचे फळ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त औषधी आहे. जांभळाच्या रसामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी २५० ग्रॅम चांगली पिकलेली ताजी फळे स्वच्छ धुऊन ५०० मिली पाण्यामध्ये मंद आचेवर थोडा वेळ उकळावीत. थंड झाल्यावर ही फळे हाताने घुसळन करून कापडाने गाळून घ्यावीत व हे द्रावण दिवसातून तीन वेळा सेवन करावे अथवा मोठ्या आकाराची जांभूळ फळे उन्हामध्ये वाळवून त्याचे चूर्ण करावे व हे तयार केलेले चूर्ण दररोज तीन वेळा घ्यावे. असे एक महिना घेतल्यास मधुमेह कमी होण्यास फायदा होतो.

जांभळाच्या रसात पॉलिफिनॉल आणि अनेक बायोअ‍ॅक्टिव्ह फायटोकेमिकल्स असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच या रसात अ‍ॅन्थोसायनिन असतात जे आपल्या शरीरात निर्माण झालेल्या कर्करोगाच्या पेशीशी लढण्यास मदत करतात. ज्यामुळे कर्करोगाच्या पेशीची वाढ होत नाही. त्यामुळेच केमोथेरपी आणि रेडिएशन सुरू असलेल्या व्यक्तीला जांभळाच्या रस सेवनाचा सल्ला दिला जातो. जांभळाच्या रसामध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असते ज्यामुळे आपले दात आणि हिरड्या मजबूत होण्यास फायदा होतो. ब-याच वेळा हिरड्यातून रक्त येते, सूज येऊन वेदना होतात. त्यासाठी दररोज नियमितपणे जांभळाचा रस किंवा त्याच्या फळाचे सेवन करावे. त्यामुळे हिरड्याच्या मजबुतीसाठी जांभळाचा रस अत्यंत गुणकारी औषधी आहे. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जांभळाचा रस अत्यंत उपयुक्त आहे. जांभळाच्या रसामध्ये फ्लेवोनॉईड भरपूर प्रमाणात असते. जे अ‍ॅन्टीऑक्सिडंटचे कार्य करतात. यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स बाहेर पडण्यास फायदा होतो. त्यासाठी दररोज ५० मिली जांभळाच्या रसाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जांभळाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते, जे रक्त शुध्द करण्यासाठी आपल्या शरीरातील रक्त वाढविण्यासाठी मदत करते.

जांभळाच्या रसाचे किंवा जांभूळ फळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीन वाढतो. त्यामुळे हे नैसर्गिकरीत्या रक्त शुध्दीकरणास फायदेशीर असते व रक्तवाढीसाठी सुध्दा उपयुक्त असते. आहारात बदल झाल्यामुळे किंवा शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यामुळे अनेक वेळा तोंडामध्ये व्रण होतात. त्यामुळे आपल्या जेवणावर परिणाम होतो. त्यासाठी जांभळाचा ५० मिली रस नियमितपणे घेतल्यास तोंडातील व्रण कमी होण्यास फायदा होतो. तसेच घशाचे आजारही बरे होतात. त्याचप्रमाणे पोटातील अल्सरसाठी सुध्दा फायदेशीर आहे. जांभळाच्या रसामध्ये पौष्टिक घटकांसोबतच जीवनसत्व क आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास फायदा होतो. त्यासाठी जांभळाची फळे उन्हामध्ये वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. सध्याच्या धावपळीच्या कामामुळे लोकांना जेवणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे बाहेरचे जंकफुड खावे लागते त्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी निर्माण होतात. अगदी लहान मुलांमध्येसुध्दा ही समस्या असते ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी दररोज ५० ते ६० मिली जांभळाचा रस सेवन केल्याने पचनक्रिया सुधारून पचनशक्ती वाढते ज्यामुळे चयापचय चांगले होऊन पोटाच्या समस्या कमी होण्यास फायदा होतो. वयापरत्वे स्मरणशक्ती कमी होणे हा नैसर्गिक गुणधर्म आहे. परंतु काही लोकांमध्ये मेंदूच्या पेशींची क्षमता कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते.

जांभळाच्या रसामध्ये फ्लेवोनॉईडसारखे अ‍ॅन्टीऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास फायदा होतो. त्यासाठी दररोज नियमितपणे जांभळाचा रस ३० ते ४० मिली अथवा जांभळाची फळे सकाळ-संध्याकाळ खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते. ब-याच वेळा लोकांना बोलताना अडचण येते किंवा व्याख्यात्याला व्याख्यान देताना अथवा गायकांना गायन करताना अवाज घशात अडकतो त्यामुळे त्यांना सादरीकरणामध्ये अडचणी येतात. त्यासाठी जांभळाच्या फळाच्या गरात/रसात थोडा गूळ मिसळून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात व या गोळ्या नियमित घेतल्यास आवाज बरा व मुलायम होण्यास मदत होते. यकृत हा आपल्या शरीरातील अविरतपणे कार्य करणारा अवयव आहे. त्यामुळे जीवनसत्वे, लोह, क्षार याचा साठा करणे, साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे तसेच निकामी झालेल्या लाल रक्तपेशींवर प्रक्रिया करणे ही कार्ये विनासायास पार पाडतात. त्यासाठी यकृत निरोगी असणे गरजेचे असते. दररोज सकाळ-संध्याकाळ नियमितपणे जांभळाचा ५० ते ६० मिली रस पिल्यास यकृताच्या समस्या कमी होऊन आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हा एक प्रकारचा त्वचा विकार असून या विकारात चेह-यावर वेदनायुक्त किंवा वेदनारहित सौम्य किंवा तीव्र स्वरूपाच्या पुटकुळ्या येतात. यासाठी जांभळाचा रस गायीच्या दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी लावावा व सकाळी थंड पाण्याने धुऊन काढावा. असे नियमित काही दिवस केल्यास मुरूम कमी होऊन चेहरा सुंदर दिसतो.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या