Sunday, September 24, 2023

पुतीन यांचा घातक खेळ

सुमारे आठवडाभर जनमत घेतल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी घटनादुरुस्ती करणा-या आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार २०३६ पर्यंत राष्ट्रपतीपदी राहण्याची मुभा त्यांना मिळाली आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीपदाचे दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहू शकणार नाही, अशी तरतूद रशियाच्या घटनेत यापूर्वी होती. पुतीन हे २००० पासून २००८ पर्यंत दोन वेळा या पदावर राहिले आहेत. नंतर आपले निकटवर्तीय असणा-या मेदवेदेव यांना राष्ट्रपती करून पुतीन स्वत: पंतप्रधान बनले. मेदवेदेव यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ चार वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढविण्यात आला. पुतीन २०१२ मध्ये पुन्हा राष्ट्रपती झाले आणि २०१८ मध्ये त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. २०२४ मध्ये तो समाप्त होणार होता. परंतु घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्यांनी २०३६ पर्यंत खुर्चीला चिकटून राहण्याची तरतूद करून ठेवली.

रशियाचा शेजारी असणाºया चीनमध्येही दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदी विराजमान होण्यासाठी दोन कार्यकाळांची महत्तम मर्यादा काढून टाकण्यात आली होती आणि सध्याचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना आजन्म या पदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा केला होता. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. या खेळात आक्रमकतेबरोबरच डावपेचही असतात आणि हे दोन्ही आत्मसात करून त्यांनी सत्तेत टिकून राहण्याचा स्वत:चा मंत्र बनविला. घटनादुरुस्तीच्या आडून लोकशाहीच्या ठिक-या उडविण्याचा जो खेळ त्यांनी खेळला, तो भारत किंवा अन्य कोणत्याही लोकशाहीवादी देशात खेळला गेला असता तर राजकीय भूकंप झाला असता.

पुतीन यांचे कठोर निर्णय तेथील जनतेला रुचतात आणि म्हणूनच बहुधा ते हा खेळ खेळू शकले. सीरियामध्ये सरकारविरोधी बंडखोरांवर बाँबवर्षाव, युक्रेनमध्ये लष्करी हस्तक्षेप आणि २००४ मध्ये क्रिमियाचे रशियात विलिनीकरण करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे रशियन जनता त्यांना मजबूत नेता मानते. सोव्हिएत महासंघाचे पतन ही विसाव्या शतकातील सर्वांत विनाशकारी घटना मानणा-या पुतीन यांचे गुणगान तेथील माध्यमेही मन लावून करीत असतात. पुतीन यांची रशियात जी लोकप्रियता आहे, तशा लोकप्रियतेचे स्वप्नही पाश्चात्त्य नेते पाहू शकत नाहीत, असे तेथील माध्यमे वारंवार म्हणत असतात.

Read More  मनमोकळ जगा. कधीही आशा गमावू देऊ नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकप्रियतेच्या नावाखाली रशियात आकार घेत असलेल्या ‘पुतीन मार्का लोकशाही’बद्दल वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. दीर्घकाळ सत्तेवर टिकून राहण्याची मुभा नेत्याला मिळाल्यास तो निरंकुश बनू शकतो, असे म्हटले जाते. गेल्या आठवड्यात रशियात जनमत घेण्यात आले, त्यावेळीही पुतीन यांच्या विरोधात काही आवाज उठले होते. क्रेमलिनमधील त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे की, अपेक्षित निकाल लागावा यासाठी मतदानात गैरप्रकार करण्यात आले. या विरोधकांच्या मते रशियातील लोकांचा जीवनस्तर वेगाने ढासळत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. अशा स्थितीत पुतीन यांच्या बाजूने मिळालेल्या मतांची संख्या शंका उपस्थित करणारी ठरते.

जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम करणा-या पुतीन यांच्यासमोर अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र संबंध यासंदर्भात पूर्वीपेक्षा कितीतरी मोठी आव्हाने सध्या उभी आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाच्या भूमिकेची चर्चा नेहमीच केली जाते. अर्थात, जर या सर्व आघाड्यांवर ठोस धोरणे तयार करण्यात पुतीन यांना अपयश आले तर दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, असे म्हणता येईल.

परदेश

विनिता शाह

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या