23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeविशेषकासिम रझवी आणि रझाकार

कासिम रझवी आणि रझाकार

एकमत ऑनलाईन

हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व भारतात विलीन होण्यासाठी खूप यातना सहन कराव्या लागल्या, निकराचे प्रयत्न करावे लागले. याचे कारण निजामाचे एकतंत्री शासन हे होते. पण त्याच्या सोबतीने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ व ‘रझाकार’ या संघटना होत्या. हैदराबाद येथे १९२८ साली ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना झाली. ‘इत्तेहाद’ म्हणजे ऐक्य. सुरुवातीस या संघटनेचे स्वरूप पूर्णपणे धार्मिक होते. नवाब बहादूर यारजंग यांनी या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मात्र या संघटनेने पूर्णपणे राजकीय स्वरूप धारण केले. १९४० मध्ये इत्तेहादची स्वयंसेवक शाखा म्हणून ‘रझाकार’ संघटना स्थापन झाली. रझाकार शब्दाचा अर्थ स्वयंसेवक असा होतो. या संघटनेच्या स्थापनेत सय्यद महंमद एहसान यांनी पुढाकार घेतला व तेच रझाकारांचे पहिले प्रमुख म्हणजेच ‘अफसरे आला’ झाले.

‘रझाकार’ या संघटनेची खरी वाढ लातूरच्या कासिम रझवी यांच्या आगमनानंतर झाली. ३१ मे १९०० मध्ये जन्मलेला सय्यद महंमद कासिम रझवी अलिगड विद्यापीठात एलएल. बी. झाला होता व लातूर येथे वकिली करत होता. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला, फाटक्या अंगाचा हा माणूस एका बलाढ्य संस्थानातील राजवटीच्या भवितव्याला हेलकावे देत, लक्षावधी लोकांना मूर्तिमंत भीतीचा अनुभव देऊन गेला. एकदा नवाब बहादूर यारजंग लातूरच्या दौ-यावर आले, तेव्हा रझवी इत्तेहादच्या लातूर शाखेचा अध्यक्ष होता. त्याने आपले राहते घर संघटनेच्या कार्याला देऊन टाकण्याची तयारी दर्शवली. अति भावनाप्रधान असलेल्या या माणसाने लगेच आपल्या घरातले फर्निचर स्वत:च बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्याचे दातृत्व पाहून बहादूर जंगनी रझवीला ‘सिद्दिके दकन’ असा किताब दिला. यानंतर रझवी वाढत गेला. बहादूर यारजंगच्या निधनानंतर अल्पकाळ एक-दोन अध्यक्ष झाले आणि मग नंतर कासिम रझवीच अध्यक्ष झाला. रझवीच्या काळात रझाकार संघटनेला ‘पस्ताकोम’ या संघटनेची मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. हैदराबादचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणे हा रझवीच्या इत्तेहादचा कार्यक्रम होता. संस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना भीतीग्रस्त करणे आणि मुस्लिमांना भडकावीत राहणे हा त्यासाठी स्वीकारलेला मार्ग होता. रझाकार संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली असली तरी हे त्यांचे खरे सामर्थ्य नव्हते. भडकावू नेतृत्व आणि सरकारचा पाठिंबा हे त्यांचे बळ होते.

रझाकार म्हणून नाव नोंदवणारे सर्वच काही त्यांच्या कारवायांत भाग घेत नसत. काहींनी केवळ सहानुभूती म्हणून नावे नोंदवलेली असत. एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या पाच टक्के लोकसुद्धा कडवे रझाकार नव्हते हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. उलट काही मुस्लिम लोक तर स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन निजामी राजवट उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरले. रझाकार संघटनेला खुद्द निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली. रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती. प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळे. कासीम रझवी हा जरी साधा वकील असला तरी त्याचे नेतृत्व अफाट होते. त्याची भाषणे ऐकणारे लोक सांगतात की, त्याच्या भाषणांमुळे सर्वसामान्य हिंदू समाजात धडकी भरत असे. तर मुस्लिम त्वेषाने प्राणार्पण करण्यास तयार होत असत. रझवी वकील असला तरी अतिशय उद्दाम वक्तव्यासाठी प्रसिद्ध होता. सिडने कॉटन हा ऑस्ट्रेलियन तस्कर पाकिस्तानमधून विमानाने शस्त्र, दारूगोळा आणायचा. रात्रीच्या वेळी कराची-गोवा-बिदर-हैदराबाद अशा विमानाच्या फे-या तो मारीत असे. शस्त्रसज्ज रझाकारांनी कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली संस्थानातील हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरू केले. हजारो लोकांच्या कत्तली केल्या, अनेक गावे जाळली. खून, बलात्कार, लुटालूट यांची परिसीमा गाठली.

शेवटच्या काळात निजामापेक्षाही रझवी प्रभावी झाला होता असे काही अभ्यासकांना वाटते, पण माझ्या मते ते चुकीचे आहे. निजामानेच आपणास हवा तसा रझाकार व रझवीचा वापर करून घेतला. ‘सर को कफन बांधे मुजाहिद बन बैठे है’ असे म्हणणारा कासिम रझवी शहीद वगैरे काही झाला नाही. १३ सप्टेंबरला प्रत्यक्ष लढाई चालू झाली तेव्हा तो सिकंदराबाद येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी लपून बसला होता आणि इकडे त्याच्या चिथावणीला बळी पडून हजारो तरुण रझाकार संघटनेत सामील झाले होते व भारतीय सैन्याशी लढण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिस कारवाईनंतर कासिम रझवीवर खटला भरण्यात आला. त्यास फक्त सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. ११ सप्टेंबर १९५७ रोजी तो येरवडा तुरुंगातून सुटला. नंतर तो हैदराबादला गेला. तेथे ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ ची सर्वसाधारण सभा बोलविली. यास १४० पैकी फक्त ४० सदस्य उपस्थित होते. अब्दुल वाहेद ओवेसी (मूळ गाव – औसा) यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालून तो मुंबईमार्गे कराचीला गेला. पाकिस्तानात आपले जंगी स्वागत होईल असे त्यास वाटले होते. पण त्याच्या पदरी निराशा आली. एक सामान्य आयुष्य जगून १५ जानेवारी १९७० ला कासिम रझवीचे कराचीत निधन झाले.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या