21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeविशेषक्वाड आणि आत्मनिर्भर भारत

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या क्वाड समूहाची दुसरी बैठक नुकतीच झाली. चीनला शह देण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्यासाठीही या समूहाकडून मदत अपेक्षित आहे. भारताच्या संस्कृतीत विस्तारवादाला कधीच थारा नव्हता. त्यामुळे या समूहाने भारताला बळ दिल्यास चीनच्या विस्तारवादी धोरणाला अंकुश लावणे शक्य होईल.

एकमत ऑनलाईन

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा नामोल्लेख न करता नियमसंगत जागतिक व्यवस्था तयार करण्याची मागणी केली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांनी चीन हा जागतिक शांततेचा शत्रू असल्याचा आरोप करून अन्य देशांसोबत एकत्रित येऊन काम करण्यावर भर दिला. कोरोना संसर्गाविषयी केलेल्या टिप्पणीमुळे ऑस्ट्रेलियाला चीनच्या टीकेचा सामना गेल्या अनेक महिन्यांपासून करावा लागत आहे. जपानला दक्षिण चीन समुद्रात थेट चीनशी मुकाबला करावा लागत आहे. असे चार देश एकत्र आले आहेत; परंतु हा गट अधिकाधिक उपयुक्त कसा करता येईल, हा खरा प्रश्न आहे.

अनेक मुद्यांवर मतभिन्नता असूनसुद्धा भारत आणि चीनदरम्यानचे व्यापारी संबंध सातत्याने वाढत होते. परंतु चीनचे हेतू चांगले नव्हते. भारताचा आर्थिक कणा कोरोनाच्या संसर्गामुळे अस्ताव्यस्त झाला आहे आणि त्यामुळे चीनचे आक्रमण भारत सहन करू शकणार नाही, असे चीन मानत होता. परंतु चीनचे इरादे उद्ध्वस्त झाले. आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यापासून चीनचा आर्थिक अंकुशही राहिलेला नाही. चीनच्या व्यापारी भाराखाली भारत अजूनही दबलेला आहे, ही गोष्ट खरी आहे; परंतु आता पर्यायी आकृतिबंध तयार होताना दिसत आहे. सौरऊर्जेसाठी सोलर पॅनेल भारत चीनमधून आयात करीत होता. परंतु आता ही आयात बंद झाली आहे. अन्य देशांकडेही संसाधने आहेत आणि ती वापरून भारत आपली संरचना मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील वीस वर्षांत आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्णपणे तडीस गेलेला असेल, अशी आशा करायला हरकत नाही. या मोहिमेत क्वाड देशांची खूपच मदत होणार आहे. जपानकडे तर ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’चे भांडारच आहे.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर जपान काम करीत आहे. पूर्व आशिया आणि युरोपातील सगळे श्रीमंत देश अमेरिकेचे सहकारी आहेत तसेच त्यातील अनेक देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. क्वाड समूहात जर ‘ग्रीन एनर्जी’बाबत सहमती झाली, तर चीनचा बेल्ट रोड उपक्रम रोखता येऊ शकेल. सुमारे ६५ देशांमध्ये आपल्या आर्थिक विस्ताराचा तंबू चीनने ठोकला असून, त्यातील २५ देशांची अर्थव्यवस्था कोळसा आणि इंधनाच्या आधारे चालते. त्यापैकी २० देश गरिबी आणि हवामान बदलाच्या समस्येने ग्रस्त आहेत. २०१५ मध्ये पॅरिस जलवायू संमेलनात असे सांगितले गेले होते की, श्रीमंत देश दरवर्षी १०० दशलक्ष डॉलरची मदत गरीब देशांना ‘ग्रीन एनर्जी’साठी देतील. भारताने आधीच चाणाक्षपणे ‘एक सूर्य, एक विश्व आणि एक ग्रिड’ ही संकल्पना मांडली आहे. भारत जर क्वाडच्या मदतीने ग्रीन एनर्जीचे केंद्र बनला आणि हिंद-प्रशांत क्षेत्राला हरित बनविण्याची जबाबदारी भारताकडे आली, तर बरेच काही बदलून जाणार आहे. अशा स्थितीत अनेक देश स्वस्त आणि टिकाऊ विकासाचा पर्याय स्वीकारून चीनची साथ सोडतील, क्वाडच्या मागे उभे राहतील.

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

क्वाडच्या माध्यमातून शेजारी देशांमध्ये भारताची विश्वासार्हता वाढेल. शेजारी देशांमध्ये भारतविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न चीन अनेक दशकांपासून करीत आहे. परंतु हे देश सांस्कृतिक परंपरेने भारताशी जोडले गेलेले आहेत. सुनील आंबेकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि ईशान्येकडील देशांमध्ये भारताची अमीट छाप उमटलेली आहे. भारताने सिल्क रूटच्या माध्यमातून या देशांमध्ये समानता आणि मैत्रीची छाप उमटविली आहे. आजही भारताची विचारधारा त्याच सांस्कृतिक परंपरेवर आधारित आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाची प्रतीक्षा चीन करीत आहे. चीनला खात्री आहे की, रिपब्लिकन पक्षाचा पराभव आणि डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय होईल आणि अमेरिका-चीन संघर्ष संपुष्टात येईल. तसेच यामुळे चीनवरील आंतरराष्ट्रीय अंकुशही समाप्त होईल, असे चीनला वाटते. त्यामुळेच क्वाड देशांनी चीनचे विस्तारवादी धोरण रोखण्यासाठी भारताला सर्व संसाधने देणे गरजेचे आहे. तसेच भारताकडून प्रस्थापित केली जाणारी व्यवस्था व्यापक बनू शकेल.

चीनची लष्करी ताकद त्या देशाच्या आर्थिक ताकदीमुळेच निर्माण झालेली आहे. त्यामुळेच चीन आपल्या शेजारी देशांवर गुरगुरू लागला आहे. चीनचा शक्तिपात त्याची आर्थिक ताकद मोडून काढूनच करता येऊ शकेल. त्यासाठी आत्मनिर्भर भारतापेक्षा अन्य पर्याय जगाकडे असू शकत नाही. भारताच्या संस्कृतीत कधीही विस्तारवादाला स्थान नव्हते. त्यामुळे क्वाड देशांनी याविषयी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कोरोनाच्या संसर्गाने जगाला बरेच काही शिकविले आहे. ज्याप्रकारे आकंठ भौतिकवादाने जगाला विनाशाच्या रस्त्यावर ढकलले, त्यापासून मुक्ती मिळविण्याची प्रेरणाही या संसर्गाने दिली आहे. शेजारी उपाशी असताना आपण सुखाने झोपू शकत नाही, हा संदेशही या संसर्गाने जगाला दिला आहे. संपूर्ण विश्व पक्क्या धाग्यांनी बांधले गेले आहे आणि ठिणगी कुठूनही उडाली, तरी त्यापासून निर्माण होणारी आग सर्वनाश करेल, ही विचारप्रणालीही भारतीय संस्कृतीचीच देणगी आहे.

प्रा. सतीश कुमार
आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या