21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषनव्या नवलाईचा पाऊस

नव्या नवलाईचा पाऊस

नव्या नवलाईचा ओळखीचा हवाहवासा वाटणारा! मृदगंध पसरविणारा मोगरा जाई-जुईच्या सुगंधासोबत मक्याच्या कणसाचा गोडसर खमंग वास सर्वत्र पसरविणारा! वाफाळत्या कॉफीसोबत कांदाभजी प्रेमाने खाऊ घालणा-या आपल्या जुन्याच बायकोकडे नवलाईने बघायला लावणारा! मोग-याचा गजरा डोक्यात माळायला लावणारा! हळवा चंदेरी आणि धुसर शरीर-मनाला ओलावा देत मनाचा मऊसूतपणा जोपासणारा घनगंभीर रुद्र अस्खलितपणे वातावरणात घुमवणारा सात्विक पवित्र पाऊस!

एकमत ऑनलाईन

कोणत्याही ऋतूची सुरुवात आणि शेवट हा नेहमीच हुरहुर लावणारा असतो. निरोप घेणं आणि निरोप देणं फार अवघड! आता मात्र हे करावं लागणार आहेच! हा तर निसर्गाचा नियम आहे. यातून कोणीच सुटत नाही.कडक उन्हाच्या तडाखेबाज सपाट्यातून कृत्रिम थंडावा तुम्हाला काही काळ वाचवू शकतो पण शेवटी हा उरतोच ना! गेल्या कित्येक वर्षांत तापलं नसेल असं ऊन यावर्षी होतं. पण एक सांगू या तापत्या उन्हाची पण एक आगळी लज्जत असते. ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडावं.. डांबरी रस्त्यावर फिरावं आणि या तळपत्या उन्हाची मजा अनुभवावी. दुतर्फा हिरवीगार कडुलिंबाची सोबत असते आणि मध्येच लालभडक गुलमोहर असतो. मध्येच शिरिशाचे तुर्रेदार टोकं झळकतात.

निरभ्र आकाशात निळ्या-पांढ-या ढगांची रेलचेल असते. पण याही दृष्यांचा हळूहळू कंटाळा येतो. मे चा नवतपा संपला की पावसाची वाट पाहणं सुरू होऊ लागतं. निरभ्र पांढ-या आकाशात आपल्याही नकळत काळे ढग! मन आणि डोळे शोधू लागतं! वृत्तपत्रात मान्सूनच्या तारखा बारकाईने तपासल्या जातात. मनात मोराचं नर्तन आपणच मनाने सुरू करतो. पण यायचा त्याचवेळी पाऊस येतो. उष्णता भोगून सोसून झालेली असते. जून सुरू होतो आणि पावसाचं वाट पाहणं ऐरणीवर येतं. डोळे शिणून जातात. हल्ली तर जुलै संपत आला तरी वर्षासरींनी न्हाऊन निघण्यासाठी वाट पहावी लागते. मग एकदाचा शिणलेल्या तनामनावर पाऊस अलगद अनिवार कोसळू लागतो. विरहार्त प्रियकरासारखा सर्वांगांनी स्पर्शत राहतो. जणू अबोलपणे आपला रुसवा काढीत राहतो. पहाट होते…मनाची अवस्था शांत होते. वातावरणात एक सुखद अबोलपणा बोलका होत असतो.

सृष्टीकर्त्यानं पावसाइतकं रोमँटिक काहीच निर्माण केलं नाही. त्याची सारी रसिकता, कल्पकता, नाजूकता, तरल मानसिकता त्याने पाऊस निर्माण करून व्यक्त केली. सृष्टी निर्माण झाली तिला चालवण्यासाठी निसर्ग निर्माण झाला, ऋतुचक्र निर्माण झाले. मानवाची निर्मिती झाली. त्याचा चरितार्थ सुचारूपणे चालण्यासाठी विविध गोष्टी निर्माण केल्या. मानवाला शहाणपण शिकवलं, व्यवहार शिकवला, जगरहाटी शिकवली. व्यावहारिकता शिकवताना मन नावाचं अव्यक्त अवयव दिलं. या मनाच्या सोहळ्यासाठी पाऊस, बरसात, बारिश अशा विविध नावांनी नटलेलं एक सुंदर देखणं लेणं दिलंं. मन, शरीर बहरून येणारं भावनांना हळुवार जपणारं जगण्याचं नवनिर्मितीचं मूळ दिलं. सृजनाचा स्रोत दिला. सृजनशिलतेला वाव दिला. वसुंधरेला भरजरी गर्भरेशमी वस्त्र दरवर्षी बहाल करण्याचं अभिवचन दिलं. पृथ्वीला सुजलाम् सुफलाम् केलं. हे सारं पावसाचं देणं आहे. ‘कुमारसंभवम’मध्ये महाकवी कालिदासाने पार्वतीच्या अंगावर पडणा-या पहिल्यावहिल्या पावसाच्या थेंबाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. ते सारं वर्णन आजही वाचताना अंगावर रोमांच उठतात.

प्रत्येक कवीच्या काव्यप्रतिभेला बहर आणण्याचे काम पाऊस करतो. आपल्या विविध रूपाविष्काराने तो मंत्रमुग्ध करतो. किती त्याच्या त-हा! कधी शांत अविरत तर कधी नाचरा पायात घुंगुरवाळा वाजविणारा! माळरानावर कधी परशुरामासारखा आसूड उडवित हाहाकार मजविणारा तर कधी सायीसारखा मऊसूत स्पर्शविणारा. अंगाअंगाला बिलगणारा. मध्यरात्री सुरेल संगीताने नादवणारा, कोणत्याही क्षणी जाग येताच वातावरणातील ओलसरपणा मनात रुतवणारा! पुन्हा पुन्हा झोप म्हणणारा! सकाळच्या कोवळ्या सूर्याच्या किरणांत मोती बनून अंगणातल्या तारांवर लटकणारा, झाडाझाडांवर आपल्या अस्तित्वाच्या ओल्या खुणा ठेवणारा! असा हा पाऊस! शेतकरी बांधवांचा सखा तारणहार!

पाऊस अधिकच सुशोभित, रोमँटिक करण्यासाठी पावसासोबत मधुबाला देवानं निर्माण केली. एक अजब रसायन आहे मधुबाला आणि पाऊस यांचं! मधुबालाच्या उल्लेखाशिवाय पाऊस पूर्णत्वाला जात नाही आणि पावसाच्या पूर्णत्वाला मधुबाला हवीच हवी. एक अभिजात सांैदर्य आणि एक निसर्गाचं सुंदर लेणं दोघांच्या समन्वयानं पाऊस नेहमी संपन्न होतो. एक नितांत रमणीय असं ते काव्य आहे. आजवर हिंदी चित्रपटांत पावसाची अनेक दृष्ये चित्रित करण्यात आली. अगदी मागच्या दशकापासून ते आजच्या आघाडीच्या नायिका पावसात यथेच्छ भिजल्या आणि आपल्या देखण्या आरसपानी ओलेत्या सांैदर्याने घायाळ करून गेल्या. या सगळ्यांना कुठेही मधुबालाची तोड नाही. कुठेही फारसं अंगप्रदर्शन न करता जे काही आहे ते तिच्या मुग्ध चेह-यात आहे. मग तो ‘चलती का नाम गाडी’ असो की ‘बरसात की रात’ असो. पाऊस तिच्यावरून विशेषत: तिच्या मुखावरून पुढे सरकायला तयार नसतो. आकंठ पावसात भिजलेला तिचा निरागस चेहरा कुठेही अश्लीलता नाही आणि उन्मत्तता नाही. तिचं पावसात भिजणं इतकं सुंदर आणि खरं असायचं की अनिमिश नेत्रांनी ते रूप डोळ्यांत साठवून घेतलेले आहे की आजही आम्ही वयाच्या मधल्या टप्प्यावर आहोत पण ती चिरतरुण पावसासारखी!

आजही पावसाळा म्हटलं की पांढ-या सलवार-कमीज किंवा पांढ-या साडीतली आरसपानी मधुबाला डोळ्यांसमोरून हलत नाही. तसेच राज-नर्गिस आणि पाऊस असंच प्रेमाचं एक सुंदर सरल भावभिन रूप आहे. पाऊस एकंदर असाच असतो. मनाच्या दारे-खिडक्यांवर आठवणींच्या पागोळ्या आपल्या पाण्यासोबत ठिबकत ठेवणारा! कोणत्याही वयाच्या मुखावर मार्दवता आणणारा, लहानपण आणि प्रौढत्व एकत्र आणणारा कवी लोकांना स्फुरणदायी असणारा, शेतकरी बांधवांना जीवन देणारा. नवविवाहितांना माहेरचा सांगावा आणणारा असा हा पाऊस जिवलग सखा! तसे सर्वच ऋतू चागंले आहेत पण पावसाळा मात्र माझ्या दृष्टीने ऋतुराज आहे. दरवर्षी भूतकाळात घेऊन जाणारा, दिल्या-घेतल्या शपथांचा जमाखर्च मांडणारा तर कधी सांगणारा! नव्या नवलाईचा ओळखीचा हवहवासा वाटणारा! मृदगंध पसरविणारा मोगरा जाईजुईच्या सुगंधासोबत मक्याच्या कणसाचा गोडसर खमंग वास सर्वत्र पसरविणारा! वाफाळत्या कॉफीसोबत कांदाभजी प्रेमाने खाऊ घालणा-या आपल्या, जुन्याच बायकोकडे नवलाईने बघायला लावणारा! मोग-याचा गजरा डोक्यात माळायला लावणारा! हळवा चंदेरी आणि धुसर शरीर-मनाला ओलावा देत मनाचा मऊसूतपणा जोपासणारा घनगंभीर रुद्र अस्खलितपणे वातावरणात घुमवणारा सात्विक पवित्र पाऊस!

अरुणा सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या