34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home विशेष माघार रजनींची, उत्सुकता कमलची

माघार रजनींची, उत्सुकता कमलची

एकमत ऑनलाईन

तामिळनाडूतील राजकारणाला सिनेमाचा तडका लागला आहे. चोवीस वर्षांच्या मंथनानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी शेवटी तामिळनाडूच्या राजकारणापासून चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावरून दक्षिणेतच नाही तर उत्तरेकडेही उत्सुकता लागली होती. परंतु त्यांनी तब्येतीचे कारण सांगून राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. यासाठी त्यांनी चाहत्यांची आणि समर्थकांची माफी मागितली. तब्येतीमुळे आपण हा कठीण निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले; पण त्यांच्या या घोषणेने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली.

रजनीकांत मैदानात उतरले असते तर तामिळनाडूच्या विधानसभा रणसंग्रामात तिरंगी मुकाबला झाला असता. पण आता हा मुकाबला अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्या आघाड्यांमध्येच होईल, अशी शक्यता आहे. तथापि, दक्षिणेतील आणखी एक सुपरस्टार कमल हसन मात्र राजकारणात सक्रिय आहेत. सत्तेत आल्यानंतर घरात काम करणा-या महिलांना म्हणजेच गृहिणींना भत्ता देऊ, अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली. येणा-या काळात अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावर लक्ष ठेवून राहूच; पण राजकारणाबाहेर राहण्यासाठी रजनीकांत यांनी सांगितलेले तब्येतीचे कारण हे एकच नाही. त्याला आणखी काही पैलू आहेत. रजनीकांत यांची तयारी ही अपूर्ण होती, असे या निर्णयावरून वाटते.

रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांनी पक्षाचे नाव जाहीर केले नव्हते. तरीही त्यांनी वेगळ्या प्रकारचे राजकारण करू, असे सांगितले होते. हे राजकारण अध्यात्मवादाने प्रेरित असेल, असे म्हटले होते. तरीही त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. परिणामी चाहते, समर्थक आणि मतदार देखील गोंधळलेल्या स्थितीत राहिले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, रजनीकांत यांची राजकीय वाटचाल करण्याबाबत पूर्ण तयारी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी लांब राहण्याचा निर्णय घेतला असावा. तसेच ते भाजप गोटाकडे जात असल्याचेही संकेत मिळत होते. सध्याच्या काळात दक्षिणेतील राजकीय घडामोडींकडे भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत.

रेल्वेची वाढीव दराने वसुली

कारण अनेक वर्षांनंतरही भाजपला दक्षिणेत बस्तान मांडता न आल्याने ते स्थानिक चेह-याच्या शोधात होते. रजनीकांत यांच्याकडे ते आशाळभूत नजरेने पाहत होते. परंतु रजनीकांत यांनी ऐन मोक्यावर माघार घेतल्याने भाजपच्या आशा मावळल्या आहेत. रजनीकांतचे मित्र कमल हसन यांनी २०१८ मध्ये आपल्या पक्षाची घोषणा केली होती. त्यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली. यात त्यांनी ३.७ टक्के मते मिळवली. ते सर्व वादग्रस्त मुद्यांवर जाहीरपणे मते मांडत असतात. मदुराई आणि चेन्नईच्या शहरी मतदारसंघात त्यांना १० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. आता ते विधानसभा निवडणुकीच्या २३४ जागांची तयारी करत आहेत. कमल हसन यांना शहरातून चांगला पाठिंबा आहे, तर रजनीकांत हे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत आहेत.

कमल हसन यांची प्रतिमा दक्षिण भारतात बॉलिवूडचे अभिनेते आमिर खान यांच्यासारखी आहे. कधी गंभीर, बुद्धिजीवीप्रमाणे त्यांचे वर्तन असते. तर रजनीकांत यांची प्रतिमा सलमान खान यांच्यासारखी आहे. रजनीकांत यांच्या तुलनेत कमल हसन यांना अपेक्षेपेक्षा कमी समर्थन आहे. अर्थात दोन्हीचा प्रभाव वेगवेगळा आहे. कमल हसन सध्या संपूर्णपणे राजकारणात उतरले आहेत. त्यांच्या सभेला गर्दी उसळते. परंतु या गर्दीचे रुपांतर मतात होईल की नाही, हे निकालाच्या दिवशीच समजू शकेल.

कमल हसन हे स्वत:ची तुलना मातब्बर नेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी करतात आणि आपण रामचंद्रन यांच्या कडेवर लहानाचे मोठे झालो आहोत, याची आठवण लोकांना करून देतात. रामचंद्रन यांचे वारसदार म्हणून कमल हसन प्रतिमा निर्माण करत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्याकडे काँग्रेसचीच मते जाणार आहेत. एकेकाळी तामिळनाडूत काँग्रेसचा दबदबा होता. आता स्थितीत बदल झाला आहे. अशावेळी काँग्रेसची पारंपरिक मते कमल हसन यांच्याकडे जात असतील तर आश्चर्य वाटायला नको.

आणखी एक गोष्ट म्हणजे कमल हसन हे अण्णाद्रमुक पक्षावर सातत्याने टीका करतात. त्या तुलनेत द्रमुकवर फारसे बोलत नाहीत. त्यामुळे भविष्यात ते द्रमुकबरोबर आघाडी करतील, असे संकेत मिळत आहेत. एका क्षणी कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन राजकारण करावे, अशीही चर्चा सुरू झाली होती. परंतु दोघांच्या विचारसरणीत अंतर आहे. जर ते दोघे एकत्र राहिले असते तर तिसरी शक्ती म्हणून नावारूपास आले असते. असे असले तरी त्यांच्याकडे मतांची टक्केवारी फारशी नाही. परंतु निवडणुकीत रजनीकांत हे कमल हसनसाठी आवाहन करू शकतात काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कमल हसन हे तमिळ बिग बॉसमध्ये बिझी होते. आता ते राजकीय आखाड्यात उतरले आहेत. परंतु ते भविष्यात चित्रपट करणे सुरूच ठेवतील असे वाटते.

तसेच रजनीकांत देखील चित्रपटात काम करणे सुरू करणार आहेत. एम. जी. रामचंद्रनही मुख्यमंत्री असताना सिनेक्षेत्रात काम करत होते आणि हे दोघे त्यांचाच कित्ता गिरवणार आहेत. रजनी यांची सिनेमातील जादू काही प्रमाणात ओसरली असली तरी ते अजूनही लोकांना तितकेच प्रिय आहेत. आजही चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांची स्टाईल, स्टंट हे लोकांच्या मनाला भावतात. त्यांच्या संवादफेकीने तर लोकांना वेड लागते. परंतु हेच यश राजकारणात मिळण्याच्या शक्यता कमी होत्या. कारण सिनेमापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असणारे तामिळनाडूचे राजकारण हे नेहमीच धक्कादायक आणि किचकट राहिले आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात अनिश्चितता आहे. चाहते आणि समर्थक हे रजनीकांत यांनी राजकारणात यावे यासाठी आवाहन करत होते. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. रजनीकांत यांनी पडद्यावर खलनायकाचा नेहमीच पाडाव केला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष अन्यायाविरोधात आवाज बुलंद करेल,असे वाटत होते. परंतु रजनीकांत यांनी स्वत:ला बाजूला ठेवत हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. ते नशिबावर विश्वास ठेवतात. काळाची गरज म्हणून आपण राजकारणात उतरत आहोत, असे रजनीकांत यांनी म्हटले होते. परंतु त्यांनीच काळाची पावले ओळखलेली दिसून येत नाहीत. ते स्वत:च्या पायावर उभे राहतील आणि ते कोणाच्या आधाराशिवाय राजकीय संघर्ष करतील, असे चाहत्यांना वाटत होते. परंतु त्यांनी राजकारणात उडी घेण्यापूर्वीच मागे हटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माघार घेतली असली तरी काही बाबतीत त्यांचे कौतुक करायला हवे.

राजकीय आवाका ओळखूनच त्यांनी माघार घेतली असावी, असा तर्क केला जात आहे. राजकारण ही गोष्ट आपल्या आवाक्यातील नाही आणि हे ओळखूनच ते माघारी फिरले असावेत, असे काहींचे मत असून त्यांनी या निर्णयाबाबत आदर व्यक्त केला. आता रजनींनंतर कमल हसन हे आगामी राजकारणात मतदारांसाठी काय आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात लढल्या जाणा-या निवडणुकीत राजकीय संघर्ष अटळ आहे. मात्र यास अनेक वळणे येऊ शकतात. तामिळनाडू विधानसभेला आणखी काही महिने असल्याने आगामी काळात अनेक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

के. श्रीनिवासन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या