21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेषसकारात्मकतेचे धागे पकडणारी ‘रंगप्रभा’

सकारात्मकतेचे धागे पकडणारी ‘रंगप्रभा’

एकमत ऑनलाईन

सौ. सरोज देशपांडे यांचा ‘रंगप्रभा’ हा चौथा कथासंग्रह. सरोज ताईंचे लिखाण हे जीवनातील सकारात्मकतेचे धागे पकडून विनोदी ढंगाने पुढे जाणारी कथा आहे तथापि ‘रंगप्रभा’मधील सर्वच कथा विनोदी अंगाने जाणा-या दिसत नाहीत तर ब-याच कथा या कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न तर काही कथा ‘माझी दंतकथा’, ‘काळी लक्ष्मी’, ‘सारी हौस फिटली’, ‘आमच्या भागातील स्वच्छता अभियान’ या विनोदी ढंगाने पण समाजातील दोषांवर फोकस करतात. धनी पत्रास कारण की सामाजिक विषय गंभीरपणे हाताळताना दिसतात तथापि या कथेला अजून कारुण्याची झालर लावली असती तर कथेला चार चांद लागले असते.

कथांचे स्वरूप छोटेखानी असले तरी विषयाच्या विविधतेमुळे प्रशंसेस प्राप्त झाली आहे. लिखाणात वेगळ्या विषयाबरोबर विविध भावछटा पाहायला मिळतात. कथा वाचताना अरे हे तर आपल्या आजूबाजूला नेहमीच घडते इतके ते लिखाण आपलेसे वाटते. कथांची भाषा ही साधी-सरळ-सोपी ब-याचदा परभणी भाषेच्या वळणाची वाटते. भाषेचा नट्टापट्टा कुठेही दिसत नाही किंवा तिला जाणूनबुजून असंस्कृत शोभिवंत केले जात नाही म्हणूनच सरोजताईची भाषा जशी आहे तशी नैसर्गिक स्वरूपात जास्त भावते. त्यांची कथा ही संवादाच्या वळणा वळणाने पुढे पुढे सरकत जाते. त्यांच्या संवादात अनेक मराठमोळ्या म्हणी सहज विखुरलेल्या सापडतात व भाषेला वेगळाच बाज आणतात. त्यांच्या कथांमध्ये विविध नाती जसे की मुलगा-मुलगी, आई -मुलगा, सासू-सासरे-सून, बहीण-भावंड, मैत्रिणी वगैरे अशा अनेकांचे एकमेकांशी बरे-वाईट संबंध, त्यातून निर्माण होणारे प्रश्न तसेच आजच्या आधुनिकतेच्या नावाखाली असलेली ‘हम दो -हमारे दो’ कुटुंबं तसेच देशात- परदेशात उच्च शिक्षणाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले भारतीय संस्कृतीशी फारकत घेतलेल्या अनेक व्यक्ती येथे भेटतात. नाण्याची दुसरी बाजू, फिरतीवरचे देव, यक्षप्रश्न मधील दिव्यांग मुलगी, तिच्या आयुष्याची होणारी फरफट, भावाचे तिच्यावर प्रेम असूनही ती परिस्थितीपुढे हतबल आहे हा प्रश्न लेखिकेने चांगला मांडला. ‘अपराधी कोण?’ मधील नायक नायिकेचा व्यक्तिश: दोष नसतानाही एड्ससारख्या आजाराशी झुंजावे लागते. अशा आजारात बाहेरचे तर सोडून द्या घरचेही साथ देत नाहीत हे समाजातील विदारक सत्य आपल्यासमोर येते.

‘घुसमट’ कथेतही नायिकेचा अपराध नसताना केवळ आई-वडिलांच्या इच्छेपुढे झुकते व श्रीमंत स्थळाला होकार देते. वरकरणी सारे छान परंतु स्वत:चे स्वत्व गमावण्याची सल तिला आहे. कळते पण वळत नाही ती काहीच करू शकत नाही. जेव्हा तिची दुसरी बहीण याच घरात येणार हे तिला कळते तेव्हा मात्र फक्त मानसिक आक्रोश तिच्या हाती असतो. माझी दंतकथा, काळी लक्ष्मी, सारी हौस फिटली, आमच्या भागातलं स्वच्छता अभियान या सा-या विनोदी कथेच्या व्याख्येत चपखल बसतात माणूस कितीही शिकलासवरला तरी अंधश्रद्धेतून अजून बाहेर पडलेला नाही. जुन्या संकल्पनांवर अजूनही त्याचा विश्वास आहे हेच त्यांची ‘काळी मांजर’ आपणाला सांगते. ‘कौटुंबिक कथा’ मध्ये परस्परांविषयी प्रेम, माया, जिव्हाळा, राग, लोभ एकमेकांना स्वार्थापोटी फसवणे तर कधी एखाद दुस-या नावाचे नात्याचे दु:ख जाणून त्यांना समजून घेताना दिसते. उदा. ‘ओवाळणी’ कथेत बहिणीवर संकटे येतात. ती निराधार होते अशावेळी भाऊ तिच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. तिला आर्थिक मदत करताना दिसतो.

‘नाण्याची दुसरी बाजू’मधील वडिलांचे म्हणणे ब-याच कालावधीनंतर मुलांना पटते आणि कथेचा शेवट गोड होताना दिसतो. सार्वजनिक ठिकाणी घडणा-या जीवघेण्या घडामोडीही आपल्यासमोर इथे येतात. ‘भेट’ या कथेतून मुलांसाठी व्याकुळ होणारी, मानसिकदृष्ट्या तडफडणारी गरीब माताही इथे भेटते. ‘भेट’सारख्या काही कथा या मनात मानसिक आंदोलन निर्माण करणा-या आहेत. कथा वाचताना कथाही आवडू लागते. आपण त्यात तल्लीन होतो आणि एकदम कथा संपते आणि आपण अरेच्चा संपली का अजून हवी होती असे म्हणू लागतो. पुस्तकाची बांधणी व मुखपृष्ठ पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. स्त्रीच्या पदराचे विविध रंग, त्याची बहुविधता व उंच आकाशी झेप घेणारी त्याची वृत्ती सारेच मोहून टाकणारे आहे.
जीवनात हास्याचा रंग हा खरंच आनंददायी, प्रेरक व सुखकारक असा आहे परंतु त्याच्या जोडीला जीवनाचा नकोसा
वाटला तरी दु:खाचा रंग हा जीवनाच्या नाण्याची दुसरी बाजू आहे लेखिकेने आसू आणि हसू असा मिलाप लिखाणाद्वारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुची निर्मिती करावी. लेखिकेची आनंदी वृत्ती व लेखन प्रवास असाच पुढे चालू राहावा यासाठी शुभेच्छा!

-सौ. वर्षा डोंग्रजकर,
मोबा. : ९८९०८ ३२५५३

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या