36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeविशेषबंडखोर, चळवळ्या कॉ. धनंजय कुलकर्णी

बंडखोर, चळवळ्या कॉ. धनंजय कुलकर्णी

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबादचे जनरल सेक्रेटरी कॉ. धनंजय कुलकर्णी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी बँकेतून सेवानिवृत्त झाले. संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गोरव समारंभ रविवार, दि. १० जानेवारी २०२१ रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने

एकमत ऑनलाईन

कॉम्रेड धनंजय दादासाहेब कुलकर्णी, जन्म ६ डिसेंबर १९६०. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण लातूर व पुणे येथे. पदवीनंतर बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सप्टेंबर १९८१मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क म्हणून रुजू. धनंजय चा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. म्हणून आचार आणि विचार मध्यमवर्गीयच. घरातलं वातावरण अगदी मध्यमवर्गीय. आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्यामुळे ताबडतोबीच्या कुठल्याही जबाबदारीचं ओझं नाही. लौकिक अर्थाने ‘जैसे थे’ आणि ‘स्थितीवादी’ जीवनशैलीला पोषक अस पर्यावरण/वातावरण.

१९७० ते १९८० हे दशक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणाच्या दृष्टीने खूप घडामोडीचे. युवा आंदोलने, स्त्रीमुक्ती चळवळ, आदिवासी चळवळ, पर्यावरण चळवळ यांना धुमारे फुटले ते याच काळात. या सर्व चळवळीत एक सामायिक गोष्ट म्हणजे बंडखोरी. जैसे थे, स्थिती वादाशी बंडखोरी. मध्यमवर्गीय तरुण हे स्वत:च्या ओळखीच्या शोधात होते त्यांना तर या बंडखोरीचं विलक्षण आकर्षण. यासाठी कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक सुरक्षितता नाकारून स्वत:ला झोकुन देण्याची विलक्षण आस. या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरणात भरण-पोषण झालेल्या मध्यमवर्गीय तरुणातील एक धनंजय कुलकर्णी.

याने १९८१ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मधील उस्मानाबाद शाखेत नोकरी पटकावली. १९८१ ते १९८४ या काळात कुटुंबाच्या बाहेर मित्रांच्या संगतीत तो विलक्षण कैफात जगला. बाह्यात्कारी पर्यावरणातून आकारात येणार बंडखोर मन, त्यात भर पडली ती आर्थिक स्वातंत्र्याची आणि भरीसभर मित्रांच्या संगतीतलं कैफात जगणं यातून धनंजय कुलकर्णी नावाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत होता. बँकेत रुजू झाल्यानंतर ट्रेड युनियनचे सभासदत्व स्वीकारले. यातून अकइएअ या संघटनेची ओळख झाली. हळूहळू कामगार चळवळीची ओळख झाली. संघटनेचा विचार जसजसा समजू लागला तसतसे त्या विचारांच्या आकर्षणातून चळवळीबद्दल आकर्षण वाढले. त्यावेळचे संघटनेचे अग्रणी कार्यकर्ते कॉम्रेड पी. जे. देशपांडे लातूर, कॉम्रेड प्रभाकर यादव सोलापूर यांची ओळख झाली. सहवास वाढला. तसा संघटनेमधील वावर देखील वाढला. मधल्या काळात विनंतीवरून बदली घेऊन उस्मानाबाद हून लातूर येथे १ ऑगस्ट १९८४ रोजी स्वग्रही आगमन झाले.

कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी ज्या बँकिंग उद्योगात प्रवेश केला त्या उद्योगाचं राष्ट्रीयीकरण १९६९ मध्ये झाले. १९७० ते ८० या दशकात बँकांच्या ब्रँचेसच जाळ वाढलं. नोकर भरती मोठ्या प्रमाणावर झाली. संघटनांचं प्राबल्य वाढलं. या टप्प्यावर कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी बँकेत पदार्पण केलं. चळवळीतील वावर वाढवला. हा तो काळ होता ज्या काळात चळवळीचे केंद्र लातूर तेथील त्यावेळचे सक्रिय कार्यकर्ते पी. जे. देशपांडे, बी. आर. कुलकर्णी यांच्यामुळे बनले होते.
या पार्श्वभूमीवर कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी चळवळीमधील आपल्या प्रवासाला सुरुवात केली पण मुळात त्यांचा पिंड होता स्थितीवादाला नाकारण्याचा. नवोन्मेषी, सृजनशील होता. त्यामुळे ट्रेड युनियन मधील वहिवाट, चाकोरी त्यांना बोचत होती. ही देखील त्यांनी नाकारली आणि समवयस्क उत्तम होळीकर, प्रदीप कुलकर्णी, एहसान सय्यद, नंदकिशोर दिवाण यांना बरोबर घेऊन त्यांनी चळवळीला एक नवीन आयाम देण्याच्या आपल्या प्रवासाला सुरुवात केली.

एका राज्यात एकाच कंपनीला परवानगी द्या – राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

हाच तो टप्पा ज्या टप्प्यावर बँक कर्मचारी चळवळीतील नेते कॉम. सुरेश धोपेश्वरकर यांच्या ते संपर्कात आले. त्यांच्या विचारांकडे ते आकर्षित झाले १९८५ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मधील युनियनच्या विकेंद्रीकरण, लोकशाहीकरण प्रक्रियेत २० जानेवारी १९८५ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद ची स्थापना झाली. स्थापना अधिवेशन औरंगाबाद येथे झाले होते. त्यात कॉ. बि. आर. कुलकर्णी लातूर व कॉ. शरद बोर्डे,कळंब यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली असली तरी अघोषित कार्यकारीणी सदस्य म्हणून कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या कॉ. धनंजय कुलकर्णी यांनीच ती जबाबदारी स्वखुशीने व लीलया पेलली. १९८७ मध्ये औरंगाबाद युनियनचे बार्शी येथे पहिले अधिवेशन पार पडले त्यात त्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली तर १९८९ साली लातूर येथे ३ दिवसीय अधिवेशनाचे आयोजन, नियोजन व निधी संकलन अत्यंत समर्पकपणे कॉ. धनंजय यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या अधिवेशनात संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

संघटनेच्या स्थापना अधिवेशनापासून बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे दोन स्तंभ कॉम्रेड प्रभाकर यादव सोलापूर आणि कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर औरंगाबाद. यात एक समतोल निर्माण करणारा तिसरा स्तंभ म्हणून कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी आपली जागा निर्माण केली. १९८७ च्या बार्शी अधिवेशनात संघटनेने सुरू केलेला पहिला उपक्रम बुलेटीन द्वैमासिक याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. बुलेटिनचा मजकूर कर्मचा-यांच्या प्रश्नापुरता मर्यादित न ठेवता सभासदांच्या विचारांच्या भरणपोषणाचे साधन म्हणून बुलेटीनला त्यांनी आकार दिला. सभासद, कार्यकर्ते यांच्या विचारांना आकार देण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. याच सोबत बँकिंग व वैद्यकीय, शैक्षणिक, व्यापारी, कायदाक्षेत्र, विद्यार्थी अशा इतर क्षेत्रातील अनेक तरुण व प्रौढ व्यक्तींना सोबत घेऊन लातूर येथे संवाद फिल्म सोसायटी स्थापन करून मराठवाड्यातील लातूर सारख्या शहरात जागतिक पातळीवर नामांकित असे अनेक आशयघन, कलात्मक चित्रपट सभासदांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.

कॉम्रेड प्रदीप कुलकर्णी यांचा पिंड एक कलाकाराचा. त्याचा वापर करत त्यांनी पोस्टर नावाचं नाटक बसवण्यात पुढाकार घेतला आणि चळवळीला एक सांस्कृतिक आयाम दिला. कॉ. उत्तम होळीकर हा एक हाडाचा कार्यकर्ता. याचा वापर करत अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रम हाती घेतले. नंदकिशोर दिवाण, एहसान सय्यद हे बँक ऑफिसमध्ये तरबेज. पडद्याआड राहून या दोघांनी कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी चळवळीत उंच झेप घ्यावी म्हणून संघटनेच्या लातूर येथील दैनंदिन कामातून त्यांना उसंत मिळवून दिली. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले.

ट्रेड युनियन ही समाजातील सर्व घटनांशी संवेदनशील राहावी, कार्यकर्त्यांनी सामाजिक स्पंदनाशी त्याच समाज व्यवस्थेचा घटक म्हणून सामाजिक स्पंदनाशी एकरूप होण्याचा,तदात्म्य पावण्याचा सतत प्रयत्न करावा हे स्वरूप निर्माण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला।मग बीड येथील तत्कालीन पुराची आपत्ती असो की किल्लारी येथील विध्वंसक भूकंप असो, या विभागातील बँक कर्मचारी संघटना सतत या संकटात मदत व निवारण कार्यात प्रशासन, व इतर सामाजिक संस्था घटक यांचे सोबत काम करीत अग्रेसर राहिली. भूकंप परिसरात युनियन कार्यकर्त्यांनी सतत काही महिने तळ ठोकून या भागात मदत व पुनर्वसन कार्य केले, अकइएअ च्या वतीने ग्रामस्थांसाठी घरे बांधून देऊन ती प्रशासनाकडे सुपूर्द केली.

या प्रवासात त्यांनी विद्यार्थी चळवळीतील काम करणा-या का.ॅ वर्षा देशपांडे यांच्याशी तत्कालीन घट्ट सामाजिक बंधने झुगारून विवाह केला. त्यांच्या या प्रवासात कॉ. वर्षा देशपांडे यांनी केवळ पत्नीचं नव्हे तर एक मैत्रीण, सखी व कार्यकर्ती म्हणून साथ दिली हे ही विशेष. तसेच अंबेजोगाई येथील कॉम्रेड दिवाकर धोंड, परभणीचे कॉम्रेड मंगेश उदगीरकर, बी. टी. यादव, बीड येथील कॉम. कोकीळ,नांदेड येथील संजीवनी कुलकर्णी असे अनेक जिवाभावाचे सोबती जोडले व कार्यकर्त्यांची एक घट्ट वीण तयार केली. इ. स. २००५ मध्ये ते ऑल इंडिया फेडरेशनचे कार्यकारणी सभासद झाले तर इ. स. २०१४ मध्ये ट्रेझरर/कोषाध्यक्ष आणि ऑगस्ट २०१८ मध्ये ऑल इंडियाच्या सेक्रेटरी पदी त्यांची निवड झाली. तेव्हापासूनच ते ऑल इंडिया फेडरेशनच्या वाटाघाटी समितीचे सदस्य म्हणून काम करू लागले. इ. स. १९९८ मध्ये महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली तर इ. स. २००० पासून ते लातूर बँक कर्मचारी समन्वय समितीचे काम पाहू लागले.

नाशिकमध्ये भाजपला खिंडार

जानेवारी २०१७ मध्ये चेन्नई येथे पार पडलेल्या अकइएअच्या अधिवेशनात त्यांची जनरल कौन्सिल मेंबर म्हणून निवड झाली. बँकेच्या कर्मचारी कल्याण निधी समितीचे ते ऑल इंडिया फेडरेशनचे प्रतिनिधित्व ऑगस्ट २०१७ पासून करू लागले. याशिवाय प्रारंभी मराठवाडा ग्रामीण बँक आणि नंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील संघटनेतील सहभाग त्यांनी सततचा ठेवला. ट्रेंड युनियन क्षेत्रात झोकून देणा-या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन,औरंगाबादच्यावतीने कॉ. श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार प्रदान करण्याचा पायंडा त्यांच्या कल्पकतेतून साकारला. दिवाळी शुभेच्छा, नववर्ष शुभेच्छा, की बँक राष्ट्रीयीकरण दिवस अथवा अधिवेशन असो की संप यानिमित्ताने तयार करण्यात येणारी शुभेच्छा कार्ड पोस्टर यातून त्यांनी ‘लातूर पॅटर्न’ची एक छबी निर्माण केली.
या पूर्ण संघटनात्मक प्रवासात अनेक कसोटीचे क्षण आले. मग ‘गांधी मला भेटला होता’ या वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितेवरून उभी राहिलेली कायद्याची लढाई असो की लातूर येथील बँकेचे विभागीय कार्यालय रद्द होणे ही संभाव्यता असो किंवा ऑल इंडिया फेडरेशनमध्ये निर्माण झालेले संघटनात्मक पेच प्रसंग असो या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आसाधारण दृढता, जिद्द, चिकाटी व स्वत:ला झोकून देऊन तीव्र संघर्ष करण्याची तयारी दाखवली व या सर्व आव्हानांना ते जाऊन भिडले आणि वास्तव बदलून दाखवले.

या प्रवासात त्यांची डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यातून ‘वेध’ हा उपक्रम त्यांनी लातूर येथे सुरू केला. ट्रेड युनियन शिवाय एका नव्या प्रवासाची ही सुरुवात होती. या उपक्रमाला देखील त्यांनी एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. यातून जगण्यातील ताणतणावांशी संघर्षाशी नव्या पिढीला अधिक विश्वासाने भिडता यावे यासाठी चा दृष्टिकोन त्यांनी मिळवून दिला. ट्रेड युनियन चळवळीतील आपल्या प्रवासात त्यांनी जुन्यांना सरसकट नाकारले नाही तसेच स्वीकारले देखील नाही. नव्याना खुप उमेदिने प्रोत्साहन दिले. चळवळीची गरज म्हणून असहमती असतानादेखील त्यांच्याशी सहअस्तित्व ठेवत प्रवास केला तो संघटनेचे हित डोळ्यापुढे ठेवून. बँकेतील त्यांचे जॉइनिंग पासून इथपर्यंत हा झाला त्यांच्या आयुष्यातील पहिला टप्पा. बँकेतील चार दशकांच्या सेवेनंतरची निवृत्ती हा झाला त्यांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा. आता त्यांच्या आयुष्यातील तिस-या टप्प्याला प्रारंभ झाला आहे.

कॉ. धनंजय कुलकर्णी यांचा हा तिसरा टप्प्यातला प्रवास या दोन टप्प्यात मिळवलेल्या संचीताच्या जोरावर अधिक अर्थपूर्ण राहणार आहे यात मुळीच शंका नाही. रुंदावलेल्या क्षितिजावर जगण्याचे इतर दालनातील त्यांचा हा प्रवास आपल्याला समूह म्हणून जगण्याला नवी दिशा देणारा, अधिक चांगला अर्थ मिळवून देणारा ठरणार आहे ज्यात आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या मर्यादा सांभाळत शक्यतो प्रतिसाद देणे, त्यांच्या प्रयत्नात प्रामाणिकपणे सहभागी होणे त्या प्रवासात सहप्रवासी म्हणून सहभागी होणे याच त्यांना ख-या शुभेच्छा होऊ शकतात.

देवीदास तुळजापूरकर
औरंगाबाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या