21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेषविद्रोही ‘पँथर’चा पे्ररक सुवर्णमहोत्सव

विद्रोही ‘पँथर’चा पे्ररक सुवर्णमहोत्सव

एकमत ऑनलाईन

९ जुलै १९७२ रोजी भारतातील जात्यंध, धर्मांध, भांडवलशाहीच्या नरडीचा घोट घेणा-या ‘दलित पँथर’ या अत्यंत आक्रमक, जहाल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक परिवर्तनवादी विचार व तत्त्वज्ञानाने झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईच्या कामाठीपु-यातील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात आयोजित केला होता. देशात व महाराष्ट्रात दलित, शोषितांवर वाढलेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी संघटित आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी हा मेळावा होता. मेळाव्यास नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार व अन्य हजर होते. याच मेळाव्यात दलित पँथर संघटनेचा जन्म झाला व संस्थापक म्हणून ढसाळ, ढाले, पवार यांची नावे पुढे प्रचलित झाली. अमेरिकेतील ब्लॅक पँथर संघटनेचा त्या काळात जगभरात बोलबाला होता. गोरे-काळे वर्णभेदाने मानवतेच्या ठिक-या उडत होत्या. शासन, प्रशासन व समाजव्यवस्थेत गो-यांनी निग्रोंवर अत्याचारांची परिसीमा गाठली होती. निग्रोंना गुलामगिरीत कायम ठेवण्याचे गो-या लोकांचे उद्दिष्ट होते. गो-यांची गुलामी व शोषणवादी भूमिकेविरुद्ध ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्यासाठी १९७० च्या दशकात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागात कृष्णवर्णियांच्या न्याय्य हक्कांसाठी बॉबी स्टिल, न्यूटन, लिबाय जोन्स, अ‍ॅन्जेला डेव्हिस आदी क्रांतिकारकांनी ‘ब्लॅक पँथर’ची स्थापना केली.

‘ब्लॅक पँथर’च्या लढ्याचे लोण भारतात पोहोचले होते. ब्लॅक पँथरच्या लढ्याची मूल्ये भारतात प्रस्थापित करण्यासाठी दलित पँथरचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ मध्ये महापरिनिर्वाण झाले. अ. भा. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त करून आंबेडकरी नेत्यांनी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पण वर्षभरात पक्षात फूट पडली. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या धुंदीत नेत्यांचे दलित, कष्टकरी लोकांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष झाले. डॉ. आंबेडकर यांच्यानंतर दलित-गरीब जनतेला वाली उरला नाही. रिपब्लिकन नेते गटा-तटांत विखुरले, कोणी काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले, कोणी समाजवाद्यांच्या वळचणीला बसून स्वहित साधू लागले. दलित-कष्टक-यांवर जात्यंध-धर्मांध प्रवृत्तीचे हल्ले वाढले. दलित-कष्टकरी भयभीत झाले होते. केंद्र सरकारने दलित अत्याचाराचा आढावा घेण्यासाठी खा. एलिया पेरूमल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने पाच वर्षे देशभरातील दलित अत्याचारांची प्रशासकीय स्तरावरून माहिती जमा केली. १० एप्रिल १९७० रोजी खा. पेरूमल यांनी तपशीलवार अहवाल केंद्र सरकारला सादर केला. हा अहवाल इतका स्फोटक होता की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सरकार हादरले. १९६५ ते १९६९ या वर्षांत देशभरात १,११७ दलितांचे खून झाले. दलित महिलांवर बलात्काराच्या ५४० घटना घडल्या.

महाराष्ट्रातील दलित अत्याचारांचा जाब राज्य सरकारला विचारण्यासाठी राजा ढाले यांनी १४ ऑगस्ट १९७२ रोजी विधानसभेवर मोर्चा काढला. दुस-याच दिवशी साप्ताहिक ‘साधना’मध्ये राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ नावाने लेख प्रसिद्ध झाला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. राज्य सरकार व पोलिस यंत्रणेच्या भेदभावपूर्ण कारभाराची लक्तरे टांगली गेली. महाराष्ट्रात गावोगावी दलित पँथरच्या शाखा स्थापन झाल्या. दलित तरुण भारावला. अत्याचाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी जिवावर उदार झाला. संघटन शक्ती, वैचारिक निष्ठा, पराकोटीचा ध्येयवाद, स्वसंरक्षणासाठी प्राणाचे बलिदान देण्याची तयारी असणा-या तरुणांची भक्कम फळी निर्माण झाली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार, प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, उमाकांत रणधीर, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, एस. एम. प्रधान, मनोहर अंकुश यांच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघायचा.

मुंबईच्या बीडीडी चाळीत व अन्य ठिकाणी शिवसेनेने दलित वस्त्यांना लक्ष्य करून हल्ले केले. १९७४ चा जानेवारी महिना होता. बीडीडी चाळीत दलित तरुण रमेश देवरूखकर हे पोलिस गोळीबारात शहीद झाले. पाच-सहा दिवसांनंतर १० जानेवारी रोजी मुंबईच्या परळ भागात पँथरच्या मोर्चावर इमारतीवरून दगडफेक झाली. त्याचवेळी पँथर भागवत जाधव यांच्या डोक्यावर मोठा दगड पडला. भागवत जाधव शहीद झाले. त्याचवर्षी २६ सप्टेंबर रोजी धाकली (जि. अकोला) येथे गोपाळ गवई व बब्रुवान गवई या बंधूंचे डोळे तीक्ष्ण सळईने सरंजामदार पाटलाने फोडले. त्याचे कारण म्हणजे गोपाळ गवई यांच्या तरुण मुलीस लग्नाचे वचन देऊन पाटलाच्या मुलाने लगट केली, मुलगी गरोदर राहिली. आपल्या मुलीस सून म्हणून स्वीकारावे म्हणून गवई बंधू पाटलाकडे गेले. विनंती केली पण जातश्रेष्ठत्वाचा गर्व चढलेल्या पाटलाने गवई बंधूंना डोळे फोडण्याची शिक्षा दिली. कायदा, न्यायालय पाटीलच झाला. गवई बंधूंचे डोळे फोडल्याचे प्रकरण पँथर नेत्यांनी मुंबई भेटीवर आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर नेले. इंदिराजींनी गवई बंधूंना पाहिले. कारुण्याने त्यांचे डोळे तरळले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर त्या रागावल्या. नंतर पंतप्रधानांनी गवई बंधूंना आर्थिक मदत केली. गवई बंधूंचे डोळे उपटण्याचे प्रकरण मुख्यमंत्री नाईक यांना भलतेच भोवले. १९ फेब्रुवारी १९७५ रोजी नाईकांना राजीनामा द्यावा लागला.

भारतीय दलित पँथरची स्थापना
दलित पँथर चळवळीला जगभर ख्याती मिळाली पण नेत्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याने अवघ्या ५ वर्षांत ७ मार्च १९७७ रोजी दलित पँथरमध्ये फूट पडली. ढाले, ढसाळ यांनी एकमेकांना आधीच पँथरमधून काढून टाकले. पँथर चळवळ धगधगती ठेवण्यासाठी प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, एस. एम. प्रधान यांची औरंगाबाद येथे २८ एप्रिल १९७७ रोजी व्यापक बैठक होऊन भारतीय दलित पँथरची स्थापना केली. १९७२ पासून आम्ही दलित पँथरच्या दुस-या फळीतील कार्यकर्ते होतो. औरंगाबादच्या बैठकीनंतर मराठवाड्यातील बहुतेक कार्यकर्ते भारतीय दलित पँथरमध्ये सामील झाले. मराठवाड्यात पँथर चळवळ फोफावली, बहरली, बलवान झाली.

एकसंध पँथरची विचारधारा व कार्यपद्धती स्वीकारून भारतीय दलित पँथरने विविध मागण्यांसाठी व्यापक आंदोलन छेडले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती, मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, सरकारी जमिनीचे भूमिहिनांना वाटप, डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार, डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र संसदेत, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी, बेरोजगारांना रोजगार, झोपडपट्टी रहिवाशांना मालकीचे घर या मागण्यांसाठी भारतीय दलित पँथरने व्यापक आंदोलने उभारली व सरकारला मागण्या मंजूर करण्यास भाग पाडले. असो. लढाऊ, ध्येयवादी, स्वाभिमानी पँथर चळवळीच्या स्थापनेला ९ जुलै २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात पँथर चळवळीच्या गुण-दोषांसह लेखाजोखा संक्षिप्त मांडण्याचा प्रयत्न पँथर चळवळीच्या आरंभापासून साक्षीदार व भागीदार म्हणून मी मांडला आहे. भविष्यात नेमके कोणत्या प्रश्नांवर संघटित लढे लढायचे ते विचारवंत, नेते व कार्यकर्त्यांनी ठरवावे आणि पँथरच्या विद्रोहाची मशाल तेवत ठेवावी ही अपेक्षा.

-रामराव गवळी
मोबा. : ९४२३३ ४५७९२

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या