24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषसावरण्याची वेळ....

सावरण्याची वेळ….

एकमत ऑनलाईन

आपले पालनपोषण करणारी पृथ्वी आता आपल्याला शिक्षा करू लागली आहे. तिला समजून घेण्याची आणि शक्य तितके सावरण्याची वेळ आली आहे. असो, पण पृथ्वी आणि निसर्ग आपल्या अनुकूल राखायचा असेल तर आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचाच मार्ग अवलंबावा लागेल, हे अगदी खरे आहे. ज्याप्रमाणे निसर्गाला कोणताही पर्याय नाही, त्याप्रमाणे त्याच्या बचावासाठी भारतीय पौराणिक शास्त्राखेरीज पर्याय नाही. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (पाच जून) केलेले विचारमंथन सर्वांच्याच हिताचे ठरेल. कारण यावर्षी जगाने ‘वन अर्थ’ असा नारा देत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीच्या निसर्ग व्यवस्थापनाची समजच अनेक पैलूंकडे निर्देश करते आणि त्यातूनही शिकण्या-शिकवण्यासारखे बरेच काही आहे. निसर्गाला आपल्या विकासाच्या व्यवस्थापनाचा स्रोत बनविले पाहिजे.

४.६ अब्ज वर्षांपूर्वी ज्या प्रक्रियेद्वारे असंख्य प्रकारच्या वेदनांनंतर पृथ्वीने मानवाला जन्म दिला, ती प्रक्रियादेखील समजावून घ्यायला हवी. या पृथ्वीमंथनामुळे जीवनासाठी आवश्यक संधी निर्माण झाल्या. जीवनासाठी आवश्यक असलेली हवा, माती, जंगल, पाणी उपलब्ध झाले. प्रत्येक जिवाला अन्न, पाणी आणि हवा सहज आणि योग्य प्रमाणात उपलब्ध व्हावी हे पृथ्वीचे व्यवस्थापन होते. आता आपण पाहू शकतो की, अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक असणारी हवा आपल्याला किती सहजतेने, कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्वत्र उपलब्ध झाली आहे. हवा ही सर्व सजीवांची पहिली गरज आहे. म्हणूनच पृथ्वीने ती जल, जमीन आणि आकाशात वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ समुद्र आणि नद्यांमधील पाण्यात विरघळलेली हवा जलचर आणि पाणवनस्पतींच्या जीवनाचा एक प्रमुख घटक आहे. पृथ्वीचे पाणीव्यवस्थापनही पाहण्याजोगे आहे. डोंगरावरील हिमनगांमधून पाणी उपलब्ध केले. तेथून ओढ्या-नाल्यांमधून घरोघरी आणि प्रत्येक गावाला पाणी उपलब्ध करून दिले. मैदानी प्रदेशात तलाव आणि नद्यांचे उगमस्थान निर्माण केले. वाळवंटात विहिरींमधून पाणी दिले. या सर्व व्यवस्थेशिवाय हिमनग आणि भूगर्भातील पाण्याच्या रूपानेही एकप्रकारे जलसाठ्यांचे संरक्षण केले. म्हणजेच ते सुरक्षित राखले गेले.

या देशाने पर्यावरण आणि निसर्गाचे शिक्षण वेद, शास्त्र आणि पुराणांमधून घेतले. नद्या, पर्वत, हिमालय, समुद्र यांची महती धर्मग्रंथांमध्येच अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांचे महत्त्वही शास्त्रीय भाषेत समजावून सांगितले गेले. जल-जमीन-आकाशातील ८४ लक्ष प्रजातींचे जीवन ही निसर्गाची देणगी मानून त्यांचे पृथ्वीवरील अवलंबित्व आपल्याला तेथे दिसून येते. इतर देशांचीही समज अद्याप या स्वरूपात विकसित झालेली नाही. तिथे विकास, जीवन आणि निसर्ग यांचे समान मूल्य मानले जाते. संयुक्त राष्ट्रांनी यावर्षी ‘वन अर्थ’चा नारा दिला आहे. अखेर ‘वन अर्थ’चा नारा प्रभावी ठरू शकेल हे एवढ्या मोठ्या कालावधीनंतर संयुक्त राष्ट्रांना का समजले? संयुक्त राष्ट्रे नसताना आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हटले होते. वसुधैव कुटुंबकम्चा अर्थ आणि स्वरूप अशा स्वरूपात सांगितले गेले होते की पृथ्वीवरील सर्व जीवांचा आधार एकच आहे आणि त्यांचे अधिकारही समान आहेत. त्यापैकी कोणीही स्वतंत्र नसून ते एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच, पृथ्वीच्या समतोलामध्ये या सर्वांची स्वत:ची अशी एक भूमिका आहे. भारताचा हा मंत्र जगाला आता कळू लागला आहे. आज ‘ग्लोबल व्हिलेज’च्या घोषणेमागे भारतीय विचारसरणीच आहे. वास्तव असे की, या सर्व घोषणा म्हणजे मूलत: भारताच्या भूमीची देणगी आहेत. त्यांचा जगाने वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला आणि नवीन ब्रँडिंगसह सर्वांसमोर ठेवले.

इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल फॉर क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालाने पुन्हा एकदा जगाला पर्यावरणाबाबत गंभीर बनवले आहे. गेल्या तीन-चार दशकांतील या विषयावरील आंतरराष्ट्रीय बैठका अयशस्वी झाल्या आहेत. या गंभीर बैठका होत असतानाच जगाचे पर्यावरण आणखी बिघडले. याचे मूळ कारण पृथ्वीला आपण समजून घेतले नाही, हेच आहे. सर्वांची पृथ्वी, सर्वांची जबाबदारी ही संकल्पना पूर्णपणे गायब झाली. ग्लोबल व्हिलेज हे गृहितकही कागदोपत्रीच मर्यादित राहिले आहे. संयुक्त राष्ट्रांना हे समजू लागले असावे, म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या धर्तीवर यावेळी पर्यावरणदिनाची थीम ठेवण्यात आली- वन अर्थ! परंतु आता खूप उशीर झालेला दिसतो. जगात असा कोणताही देश नाही जिथे माणूस शांत चित्ताने मोकळा श्वास घेऊ शकतो.

जग नवनवीन वादळे आणि आजारांच्या तावडीत सापडत चालले आहे. पाहा ना, आपण कोरोनापासूनच अजून मुक्त झालो नाही, तोवर मंकीपॉक्सने आपल्याला घेरायला सुरुवात केली. अशीच काहीशी स्थिती जगभरात येत असलेल्या वादळांची आहे. अमेरिका असो वा ऑस्ट्रेलिया, विकासाचा सध्याचा मार्ग सर्वांसाठीच विनाशकारी ठरला. पावसाचा ट्रेन्ड आता समजून येत नाही. हवामान खातेही चाचरत-चाचरतच अंदाज व्यक्त करते. याचा अर्थ आता सर्वकाही मर्यादेच्या बाहेर चालले आहे. आपले पालनपोषण करणारी पृथ्वी आता आपल्याला शिक्षा करू लागली आहे. तिला समजून घेण्याची आणि शक्य तितके सावरण्याची वेळ आली आहे. असो, पण पृथ्वी आणि निसर्ग आपल्या अनुकूल राखायचा असेल तर आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचाच मार्ग अवलंबावा लागेल, हे अगदी खरे आहे. ज्याप्रमाणे निसर्गाला कोणताही पर्याय नाही, त्याप्रमाणे त्याच्या बचावासाठी भारतीय पौराणिक शास्त्राखेरीज पर्याय नाही.

– अनिल प्रकाश जोशी,
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या