31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home विशेष श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

एकमत ऑनलाईन

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष भूतान, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्येही आढळून येतो. याशिवाय हा वृक्ष नेपाळ, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांतसुध्दा चांगला वाढलेला आढळतो. तसेच हा वृक्ष पश्चिमेकडील रुक्ष प्रदेश सोडला तर भारतात सर्वत्र दाट जंगलात आढळतो. भारतात विशेषत: पूर्व हिमालय, उत्तर कारवार, कोकण आणि निलकूडजवळच्या दाट जंगलात सापडतो. या वृक्षाची फुले मोठी आणि रंगीत व फळे लांब तलवारीसारखी असल्यामुळे या वृक्षाची शोभेसाठी बागेमध्ये लागवड करतात. हा शोभिवंत वृक्ष समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीपर्यंत चांगला वाढलेला आढळतो.

हा वृक्ष नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने इगतपुरी, पेठ, सरगण या तालुक्यातील जंगलात व रस्त्याच्या बाजूने वाढलेला दिसतो. या निष्पर्ण झाडावरील लांबलचक (तलावारीसारख्या) पसरट शेंगा असलेले दृष्य फारच चमत्कारिक पण मनमोहक असून लक्ष वेधून घेणारे असते. टेटू मुळाची साल दशमुल या औषधीमधील एक प्रमुख घटक. टेटू या पानझडी वृक्षाच्या वाढीला उष्ण आणि उपोष्ण हवामान चांगले मानवते. स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश याच्या वाढीला पूरक असतो. वार्षिक पर्जन्यमान ८५० ते १३०० च्या दरम्यान असल्यास या वृक्षाची वाढ जोमदारपणे होते. वर्षभर खंडित पाऊसमान असल्याससुध्दा याची वाढ चांगली होते. लागवड शक्यतो पहिला पाऊस पडल्यानंतर जुलैमध्ये करावी. लागवडीसाठी जोमदार व १५ ते २० सें.मी. उंचीची रोपे निवडावीत. रोपे लावताना रोपाच्या मुळांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वसाधारणपणे एका हेक्टरमध्ये २५०० रोपांची लागवड करता येते. सर्वसाधारणपणे टेटू वृक्षाला तिस-या वर्षापासून फुले आणि फळे येण्यास सुरुवात होते. फुले परिपक्व होण्यासाठी तीन ते पाच महिने लागतात. श्योनक वृक्षाची प्रामुख्याने मुळाच्या सालीचे उत्पादन घेण्यासाठी लागवड केली जाते. त्यासाठी झाडे सहा ते आठ वर्षांची झाल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात मुळासहित उपटून काढावीत.

त्यापूर्वी झाडांना भरपूर पाणी द्यावे ज्यामुळे मुळे व्यवस्थित काढता येतील. मुळे काढल्यानंतर स्वच्छ धुऊन त्याची साल वेगळी करावी. ही साल सावलीमध्ये चांगली वाळवून आर्द्रताविरहित पिशवीमध्ये भरून ठेवावी. सहा वर्षांच्या एका झाडापासून एक किलो वाळलेल्या सालीचे उत्पादन मिळते. मंदाग्नी या आजारामध्ये अग्नि मंद झाल्यामुळे अन्न पचन होत नाही व त्यामुळे भूकही लागत नाही. त्यासाठी टेटू वनस्पतीच्या मुळाची २० ते ३० ग्रॅम साल २०० मिली थंड किंवा गरम पाण्यामध्ये चार तास भिजवून ठेवावी. नंतर ती पाण्यात कुस्करून गाळून घ्यावी व रुग्णाला प्यायला द्यावी. दिवसातून दोन वेळा काही दिवस पिल्यास मंदाग्नी कमी होऊन भूक लागण्यास मदत होते. संधिवात या आजारामध्ये सांधेदुखी होऊन अस वेदना होतात त्यासाठी श्योनक वृक्षाच्या मुळाच्या सालीचे बारीक वाटून चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण दररोज तीन वेळा २.५ मिलीग्रॅम मात्रेमध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ सेवन करावे. तसेच याची पाने गरम करून दुख-या भागावर बांधावीत त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. मलेरिया ज्वर- सुंठ, बेल फळाचा गर, डाळिंबाचे दाणे, अतिविष आणि टेटू ही सर्व द्रव्ये समप्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्यावे.

त्यातील १० ग्रॅम मिश्रण अर्धा लिटर पाण्यात मंद आचेवर उकळून एक चतुर्थांश राहिल्यावर थंड करून गाळून घ्यावे. हे गाळलेले पाणी रुग्णाला सकाळ- दुपार व संध्याकाळ दिल्यास मलेरिया ताप कमी होऊन आराम मिळतो. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडामध्ये लाल चट्टे येतात यासाठी श्योनक वृक्षाच्या मुळाची साल पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून त्याचा काढा तयार करावा. या तयार केलेल्या काढ्याने दररोज सकाळी नियमितपणे काही दिवस गुळण्या केल्यास चट्टे कमी होण्यास मदत होते. अनेक स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जास्तीचा रक्तस्त्राव होऊन तीव्र वेदना होतात व अशक्तपणा येतो त्यासाठी सोनपाठा मुळाच्या सालीचे अर्धा ग्रॅम चूर्ण, अर्धा ग्रॅम सुंठ चूर्ण व तितकाच गूळ घेऊन त्याच्या तीन गोळ्या तयार कराव्यात. या तयार केलेल्या गोळ्या दशमुळ काढ्यासोबत सकाळ-दुपार-संध्याकाळ १५ दिवस नियमितपणे घेतल्यास वेदना व अशक्तपणा कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते. प्लीहा प्रामुख्याने कोशिकाभक्षण, कोशिकानिर्मिती व तांबड्या कोशिकांच्या संचय करण्याचे कार्य करते. काही कारणामुळे कार्यात बिघाड होतो. त्यासाठी टेटू वृक्षाच्या पानाचा काढा तयार करावा. हा तयार केलेला २० ते ३० मिली काढा दररोज काही दिवस नियमितपणे घेतल्यास लाभदायक होते.

दमा- हा श्वासाचा विकार असून यामध्ये सतत खोकला व धाप लागते. त्यासाठी एक ग्रॅम श्योनक सालीचे चूर्ण, अद्रकाचा एक चमचा रस व मध एक चमचा एकत्र करून घ्यावा. अथवा या झाडाच्या डिंकाचे (गोंद) २ गॅ्रम चूर्ण दुधामध्ये मिसळून घ्यावे. असे नियमितपणे काही दिवस घेतल्यास खोकला कमी होऊन दम्याचा त्रासही कमी होतो. यामध्ये त्वचा आणि डोळ्यामधील बा पांढरा भाग रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे पिवळा होतो. हा एक यकृताचा आजार आहे. त्यासाठी १५० ते २०० गॅ्रम टेटू वनस्पतीची साल (ताजी) बारीक वाटून एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी अनुशापोटी कापराच्या दोन वड्याचे चूर्ण सेवन करावे व १५ मिनिटांनी सालीचे पाणी प्यावे व नंतर दोन तासांनी जेवावे. असे नियमितपणे तीन दिवस केल्यास फायदा होतो. या आजारामध्ये शौचाला त्रास होतो. यासाठी करंज साल, इंद्रजव, चित्रक, मूळ, सुंठ, श्योनक वृक्षाची साल आणि शेंदी मीठ समप्रमाणात घेऊन बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले दोन ते तीन ग्रॅम चूर्ण ताकात मिसळून दररोज तीन वेळा सकाळ-दुपार-संध्याकाळ नियमितपणे काही दिवस घेतल्यास मूळव्याध कमी होण्यास मदत होते.

ब-याच महिलांना अंगावरून पांढरे पाणी जाण्याचा त्रास होतो व त्यामुळे अशक्तपणा येतो. त्यासाठी सोनपाठा वृक्षाची साल बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. हे वस्त्रगाळ केलेले १ ग्रॅम चूर्ण , १० ग्रॅम तूप व १० ग्रॅम साखर एकत्र मिसळून दररोज दोन वेळा सकाळी व संध्याकाळी नियमितपणे घेतल्यास आजार बरा होऊन आराम मिळतो. पोटात मुरडा होऊन वारंवार लामा व रक्तमिश्रित मल बाहेर पडतो. त्यासाठी टेटू वृक्षाच्या मुळाची साल आणि इंद्रजळाची पाने बारीक वाटून त्याचा रस तयार करावा. या रसामध्ये याचा रस समप्रमाणात मिसळून रुग्णाला चाटून प्यायला दिल्यास आमातिसार कमी होण्यास मदत होते.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या