‘सिंघम रिटर्न्स’नंतर गाजलेलं ‘रिटर्न’ फडणवीसांचं आणि त्यानंतर आता गाजतंय ते चंद्रकांतदादा पाटील यांचं. तसं पाहायला गेलं तर साहित्यिक आणि विचारवंतांच्या ‘पुरस्कार वापसी’पासून ‘परत करणं’ आणि ‘परत फिरणं’ या प्रक्रिया ब-याच वेळा गाजल्यात. यंदा तर मान्सूनचं ‘रिटर्न’सुद्धा प्रचंड गाजलं. हो, गाजलंच म्हणायला हवं! कारण पावसानं बळिराजाला दिलेलं हे ‘रिटर्न गिफ्ट’ त्याला झेपलं नाही आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यानंतर किती संकटग्रस्तांना किती मदत पोहोचली, याचा तपशील काही समजू शकलेला नाही. केंद्र आणि राज्यातला कलगी-तुरा मात्र रंगत गेला. शेतक-यांना भरपाई देण्यावरून राज्यानं केंद्राकडे बोट दाखवलं आणि केंद्रातले राज्यातले प्रतिनिधी म्हणाले, ‘‘वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न करता आणि संसाराला त्यांच्याकडूनच मदत मागता? असेल हिंमत तर स्वत:चा संसार स्वत: सांभाळा!’’ मग एकमेकांचे ‘वडील’ काढण्याचा सीझन येऊन गेला. बळिराजा तसाच राहिला. नंतर ब-याच दिवसांनी आलं केंद्राचं पाहणी पथक. ते उशिरा आलं म्हणून राज्यातल्या सत्ताधा-यांनी तोफ डागली, तर राज्यानेच अहवाल उशिरा पाठवल्यामुळे हे घडले, असे सांगून केंद्रातल्या सत्ताधा-यांनी राज्याकडे बोट दाखवले. आता केंद्राचं पथकही ‘रिटर्न’ गेलं. बळिराजा मात्र अजून तसाच! तिकडे दिल्लीच्या वेशीवरही शेतकरी कुडकुडत बसलेला असताना सन्मान योजनेचे दोन हजार रुपये किती शेतक-यांना मिळाले याचं
‘काऊंटर’ मात्र टीव्हीच्या पडद्यावर झळकलं.
असो, ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ असं म्हणून अखेर शेतक-यानंसुद्धा शेतात ‘रिटर्न’ जाणं पसंत केलं आणि इकडे राजकीय ‘रिटर्नबाजी’ने पुन्हा उचल खाल्ली. ‘‘पुण्यात सेटल व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं; पण मी मात्र कोल्हापूरला परत जाणार,’’ असं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटल्यामुळं सगळे तातडीचे विषय पुन्हा दूर फेकले गेले आणि दादांचा रोख कुणाकडे होता, याची चर्चा रंगली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या सत्कार समारंभात चंद्रकांतदादांनी हा बाण सोडल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. कारण ‘मी परत जाईन’ हे दादांचे शब्द ऐकायला ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते. ‘सेटल’ होण्यासाठी पुणं चांगलं आहे आणि आता हद्दवाढीमुळे ते मुंबईपेक्षा मोठं झालंय, हे खरंय; पण एकाच ठिकाणी ‘सेटल’ व्हायला दोन दादा उत्सुक असतील तर संघर्ष होणारच. पण चंद्रकांतदादांच्या वक्तव्यामुळे या संघर्षाने थोडं विनोदी वळण घेतलं. कारण अजितदादा लगेच म्हणाले, ‘‘एक नेता पुन्हा येईन म्हणतो, दुसरा नेता परत जाईन म्हणतो. जर परतच जायचं होतं तर पुण्याला आलातच कशाला?’’ एवढं बोलून न थांबता, चंद्रकांतदादा स्वपक्षीयांवर अन्याय करून पुण्यात आले, हेही अजितदादांनी बोलून दाखवलं.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून काँग्रेसवर अन्याय करतायत, असे भाजपचे नेते जाहीरपणे बोलतात. आता अन्यायाची ही कथा स्वत:च्याच बाबतीत सांगितली गेली, तर तेही ‘रिटर्न गिफ्ट’ मानून स्वीकारलंच पाहिजे. चंद्रकांतदादांनी आता पुण्यात घर घेतलंय. ते कोल्हापूरला परतणार हे ऐकून ब-याच जणांना (पुण्यातल्यांना आणि कोल्हापुरातल्यांनाही) धक्का बसला असणार! नशीब… ‘जगात काहीही घडलं तरी त्याचा संबंध आम्ही पुण्याशी जोडतो,’ असे सांगून वातावरण सैल करायला गिरीश बापट मंचावर होते.
शैलेश धारकर