24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeविशेषक्रांतिकारी कृत्रिम बुद्धिमत्ता

क्रांतिकारी कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्तेची मुख्य ताकद मोठ्या प्रमाणावरील माहितीचे आणि आकडेवारीचे विश्लेषण करून, पूर्वीच्या परिस्थितीशी त्याची तुलना करून अचूक अंदाज बांधणे ही आहे. त्यामुळेच हे तंत्रज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी जोडले जाणार आहे. ग्रामीण भागाचा या तंत्रज्ञानाशी नजीकच्या काळात संबंध येणार नाही, असे मानणा-यांना या तंत्रज्ञानाचे वेगळेपण समजलेच नाही, असे म्हणावे लागेल.

एकमत ऑनलाईन

नवतंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे शब्द सातत्याने कानावर पडतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द ऐकताक्षणी खूपच तांत्रिक वाटतो आणि त्याचा संबंध केवळ शहरांमधल्या गगनचुंबी इमारतींशी असावा, असेच वाटते. गावखेड्यांसाठी हा शब्द वापरला जाण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात तरी आपल्याला स्वप्नवत वाटते. ग्रामजीवनात जिथे ब-याच ठिकाणी अखंडित वीजपुरवठाही अजून होऊ शकत नाही, मोबाईलला नेटवर्क मिळत नाही, जिथे इंटरनेटचा वापरही अत्यंत मर्यादित आहे अशा ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे तंत्रज्ञान पोहोचायला बरीच वर्षे जातील, असेच आपल्याला वाटते.

परंतु ग्रामजीवनात या तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. ग्रामीण जनजीवन, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था आदी बाबींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची ताकद ओळखून सरकार गेली काही वर्षे या तंत्रज्ञानाला खूपच महत्त्व देत आहे. ‘सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी आर्टिफिशियल इंटेलिजन्स २०२०’ नावाने माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयातर्फे आयोजित जागतिक संमेलनावरून याची सहज कल्पना येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते.

भारतात राबविण्यात येत असलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमातही कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे महत्त्व असल्याचे मानले जात आहे. येत्या काही वर्षांत या शक्तिशाली तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून भारत विकसित होईल आणि शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनावर या तंत्रज्ञानाचा सखोल ठसा असेल, अशी चिन्हे दिसतात. यंत्रांच्या आत मानवाप्रमाणे वाचणे, पाहणे, शिकणे, विश्लेषण करणे, पाहून समजून घेणे, निर्णय घेणे अशा काही बौद्धिक क्षमता कृत्रिमरीत्या निर्माण करणे हा या तंत्रज्ञानाचा अर्थ. ही शक्ती प्राप्त झालेली यंत्रे आपल्याला सहकार्य करणा-या व्यक्तीचीच भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. आपली अनेक कामे ही यंत्रे करू लागली आहेत. आपल्याला प्रचंड उपयुक्त माहिती पुरवू लागली आहेत आणि आपल्या अपार संगणकीय क्षमतेच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत करू लागली आहेत. अशा क्षमता हे तंत्रज्ञान येण्यापूर्वी अस्तित्वात नव्हत्या. उदाहरणार्थ, रुग्णाच्या शारीरिक स्थितीविषयी मिळालेल्या माहितीचे आणि आकडेवारीचे विश्लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या आरोग्याविषयी भविष्यवाणी करू शकेल. कोणता आजार संबंधित व्यक्तीला कधी होऊ शकतो, याचा अंदाज हे तंत्रज्ञान देऊ शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेची मुख्य ताकद मोठ्या प्रमाणावरील माहितीचे (डेटा) विश्लेषण करून, पूर्वीच्या परिस्थितीशी त्याची तुलना करून अचूक अंदाज बांधणे ही आहे. त्यामुळेच हे तंत्रज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी जोडले जाणार आहे. ग्रामीण भागाचा या तंत्रज्ञानाशी नजीकच्या काळात संबंध येणार नाही, असे मानणा-यांना या तंत्रज्ञानाचे वेगळेपण समजलेच नाही, असे म्हणावे लागेल. एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील हवामानाची स्थिती कशी असेल, तिथे कोणत्या हंगामात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल, एखाद्या भागात एखाद्या संसर्गाचा उद्रेक कोणत्या काळात होण्याची शक्यता आहे, कोणत्या विषयात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचणी येत आहेत, अशा अनेक विषयांचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जाऊ शकते. यावर्षी हवामानाची स्थिती कशी राहील, हे शेतक-यांना आधीच समजले, कोणते पीक अधिक उपयुक्त असेल, याची माहिती मिळाली तर त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा मोठ्या प्रमाणावर वाचण्याची शक्यता आहे. देशपातळीवर अशा प्रकारे विश्लेषण करता आले तर शेतीउत्पादन किती प्रमाणात वाढू शकेल, याचा अंदाज सर्वजण करू शकतात.

मायक्रोसॉफ्ट या विख्यात कंपनीने आंध्र प्रदेश सरकारशी सहकार्य करार करून ग्रामीण विद्यार्थ्यांची शाळेतील गळती रोखण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत एखादा विद्यार्थी शाळा सोडून जाण्याची शक्यता आहे, हे त्याच्या परिस्थितीवरून आधीच समजू शकते. त्यानंतर त्याच्या आईवडिलांशी संपर्क साधून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण साक्षरतेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते. ग्रामीण भागात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा अनेक बाबतीत घेतला जाऊ शकतो.

शेतीच्या दृष्टीने हवामानाचा अचूक अंदाज बांधणे, मातीच्या गुणवत्तेची चाचणी करणे, पिकांची वाढ आणि आरोग्य यावर देखरेख करणे, पिकांवरील रोग तसेच किडींच्या प्रादुर्भावाचा आधीच अंदाज बांधणे, योग्य पिकाची निवड करण्यास मदत करणे, जास्तीत जास्त उत्पादनासाठी प्रयत्न करणे, साक्षरतेसंबंधीच्या आव्हानांचा यशस्वी मुकाबला करणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेत वाढ करणे, संसर्ग आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी अचूक पूर्वानुमान, अन्नधान्ये, फळे आणि भाज्यांच्या भविष्यातील दरांचा आधीच अंदाज बांधणे, मनरेगासारख्या योजनांबाबत योग्य निर्णय घेणे, लसीकरण कार्यक्रमांवर देखरेख करणे अशा अनेक बाबतीत या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. हवामान बदलांचा परिणाम म्हणून निसर्ग लहरी झाला आहे.

बालेन्दु शर्मा दधिच,
माहिती-तंत्रज्ञानतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या