27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeविशेषसट्टेबाजी अ‍ॅप्सचा धोका

सट्टेबाजी अ‍ॅप्सचा धोका

एकमत ऑनलाईन

देशात सरकारी व्यवस्थांच्या नाकावर टिच्चून एक ऑनलाईन व्यापार सुरू असून त्यामुळे दरवर्षी सरकारचे ३.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. रेल्वे, शिक्षण आणि आरोग्यासाठीचे बजेट एकत्र केले तर तेसुद्धा ३.५० लाख कोटी रुपयांपेक्षा कमीच भरेल. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या रकमेची करचोरी राजरोस सुरू असूनही ती रोखण्यासाठी सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. खरे तर ही करचोरी कोठून होत आहे, याविषयी सरकारच अनभिज्ञ आहे. सरकारी यंत्रणांना याची कल्पनाच नाहीये. आज इंटरनेटच्या विश्वात अनेक ऑनलाईन गेम्समध्ये युजर्सना आपल्या आवडीच्या टीम बनवण्यास सांगितले जाते आणि गेममधील सामन्यादरम्यान खेळाडूंच्या खेळाच्या आधारावर गुण दिले जातात. या गुणांच्या आधारावर जय-पराजय ठरवला जातो. मात्र देशात अशा ऑनलाईन गेम्स किंवा खेळांच्या नावावर सट्टेबाजी करणा-या विदेशी कंपन्यांनी लपूनछपून घुसखोरी केली आहे. या विदेशी कंपन्या वेबसाईटस्वर, अ‍ॅप्सवर आणि सोशल मीडियावर जाहिराती देत आहेत. त्यातून या खेळात सट्टेबाजी वैध आहे आणि हे गेम ऑफ स्कील आहे असे सांगत आहेत. वस्तुत: आपल्या देशात सट्टा लावणे आणि सट्टा खेळायला लावणे या दोन्हीही गोष्टी अवैध आहेत.

आपल्या देशात कोणताही खेळ वैध आहे की अवैध, हे दोन बाबींवरून ठरविले जाते. पहिली बाब म्हणजे, ‘गेम ऑफ स्कील’. याचा अर्थ बौद्धिक क्षमतेचा कस लागणारा क्रीडाप्रकार. दुसरी बाब म्हणजे, ‘गेम ऑफ चान्स’. याचा अर्थ बौद्धिक क्षमतेबरोबरच नशिबाचासुद्धा भाग असणारा खेळ. ‘गेम ऑफ स्कील’ला आपल्या देशात वैध मानले जाते. मात्र ‘गेम ऑफ चान्स’ला देशात अवैध मानले जाते. थोडक्यात, ज्या खेळात तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात असे खेळ वैध आहेत. मग तेथे बौद्धिक क्षमतेचा कस लागत असो किंवा शारीरिक क्षमतेचा कस लागत असो. याउलट ज्या खेळामध्ये आपण काहीही करत नाही, सर्वकाही नशिबाचाच भाग असतो, नशिबाच्या आधारावरच तुमचा जय-पराजय अवलंबून असतो असे खेळ अथवा गेम्स अवैध मानले गेले आहेत.

मोबाईलवर फोनमध्ये असणारे अनेक खेळ हे ‘गेम ऑफ स्कील’साठी ओळखले जातात. अशा पद्धतीचे गेम्स वैध आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर क्रिकेटचे घेऊ शकतो. यात कोणत्याही सामन्याच्या अगोदर तुम्ही एक टीम बनवता. त्या टीममध्ये ज्या खेळाडूची निवड करता, त्याचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला माहिती असते. तुम्हाला माहिती असते की तो खेळाडू फॉर्ममध्ये आहे की नाही. या माहितीलाच तुमचे ‘टॅलेंट’ समजले जाते. मॅचमध्ये उतरण्यापूर्वी तुम्ही मोबाईल गेमच्या वॉलेटमध्ये काही पैसे टाकता. या पैशांच्या साह्याने तुम्ही मोबाईल गेम खेळता. निवडलेला खेळाडू जर चांगला खेळत असेल किंवा तुम्ही निवड केलेली टीम जिंकली असेल तर त्या आधारावर तुम्हाला गुण मिळतात आणि त्या गुणांच्या आधारेच तुमचा जय-पराजय ठरविला जातो. यात तुम्हाला रँकिंगच्या आधारे पैसे मिळतात. हे फॉरमॅट वैध मानले गेले आहे. मात्र आपल्या देशात अशा विदेशी कंपन्यांनीही जाळे पसरवले आहे, ज्या मोबाईल अ‍ॅप्सच्या आडून ऑनलाईन गेम्सच्या नावावर सर्रास सट्टेबाजी चालवतात. यात बेट ऑन क्रिकेट, यूनीबेट, बेटवे यासारख्या तब्बल २४ विदेशी कंपन्या आहेत. सट्टेबाजी करणा-या कंपन्या यूजर्सला ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून फसवतात. सरकारची उदासीनता आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे खेळात सट्टेबाजी करणा-या विदेशी कंपन्यांचा प्रचार-प्रसार इंटरनेट, स्मार्टफोनच्या माध्यमातून वेगाने वाढत आहे. अशा प्रकारच्या खेळांत आपले स्कील, टॅलेंट किंवा कोणतेहे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

केवळ तुमचे नशीब असते, तुम्ही चान्स घेत जाता आणि नशीब असेल तर संधीचे सोने होते आणि तुम्ही जिंकता नाहीतर पराभूत होता. अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमला सरकार ‘गेम ऑफ चान्स’ असे मानते. या कारणामुळे असे गेम देशात अवैध आहेत. जितक्या भारतीय कंपन्या ऑनलाईन गेम खेळवतात, त्या आपल्या कमाईतून सरकारला कमीत कमी १८ टक्के जीएसटी देतात. हा कर भारत सरकारच्या तिजोरीत जातो. मात्र ज्या विदेशी कंपन्या ऑनलाईन गेमच्या नावाखाली सट्टा चालवतात, त्या कोणत्याही प्रकारचा कर आपल्या सरकारला देत नाहीत. अशा प्रकारच्या कंपन्या ज्या देशांतून ऑपरेट होतात, त्यांना ‘टॅक्स हेवन’ म्हटले जाते. तसेच भारतीय कंपन्यांकडून ऑनलाईन गेम्समध्ये जिंकलेल्या रकमेतून ३० टक्के टॅक्स कापला जातो आणि हा टॅक्स जिंकलेल्या यूजर्सलाच द्यावा लागतो. याचा फायदा घेऊन विदेशी कंपन्या यूजर्सला आमिष दाखवतात की, त्यांच्या अ‍ॅप्समध्ये गेम खेळल्यास जिंकलेल्या रकमेतून कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. या आमिषाला बळी पडून अनेक यूजर्स विदेशी कंपन्यांच्या अ‍ॅप्समधील गेम खेळण्यास प्राधान्य देतात. मात्र यामुळे देशाच्या तिजोरीला आणि पुढे तुम्हालाही फटका बसू शकतो.

– अनिल विद्याधर

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या