26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeविशेषधोका म्युकर मायकोसिसचा

धोका म्युकर मायकोसिसचा

एकमत ऑनलाईन

कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. सध्याच्या काळात कोरोना हा या आजाराचे मूळ कारण आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. त्यापेक्षा अधिक धोका हा मधुमेहग्रस्त, एचआयव्हीग्रस्त आणि केमोथेरेपी सुरू असलेल्या रुग्णांना आहे. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आणखी काही काळ सजगता बाळगणे गरजेचे आहे.

म्युकर मायकोसिस आजारामुळे डोळ्यांची शक्ती कमी होते. वास्तविक हा आजार पूर्वीदेखील होता, परंतु त्याचे प्रमाण कमी होते. अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात गेल्या वीस वर्षांत या आजाराचे केवळ २० ते २५ रुग्ण आढळून आल्याची नोंद आढळते; पण नऊ महिन्यांत तब्बल १०० हून अधिक रुग्णांना म्युकर मायकोसिसचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी बहुतांश रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले आहेत, त्यातही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना मायकोसिसचा अधिक त्रास होत आहे. विशेष म्हणजे भारतात एवढ्या संख्येने रुग्ण यापूर्वी कधीही सापडले नव्हते.

हा संसर्ग नाक आणि घशातून पसरतो. मात्र तो डोळे, मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरतो. जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर मल्टीपल ऑर्गन फेल्युअर होण्याची शक्यता राहते. दिलादासायक बाब म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही आणि एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संपर्कातूनही जात नाही. कोरोना हा प्रामुख्याने श्वसन यंत्रणेवर प्रभाव टाकतो. त्याचवेळी हा आजार रक्तपेशी आणि शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. कोरोना आणि म्युकर मायकोसिसचा सामना आपले शरीर कसा करतो, यावर या आजाराची तीव्रता अवलंबून आहे. मधुमेह आणि मूत्रपिंड विकाराने त्रस्त, कर्करोगग्रस्त, हृदयरोगी आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत मायकोसिसचा आजार पसरत आहे.

कोरोनाचे संकट आणखी दीड वर्षे – सौम्या श्रीनिवास

हा आजार शरीरात अनेक माध्यमांतून जातो. प्रामुख्याने श्वसनाच्या माध्यमातून त्याचे विषाणू प्रवेश करतात. त्वचेवर जखम असेल किंवा त्वचा भाजलेली असेल तर तो विषाणू त्यातूनही पसरतो. तेथूनच रक्तपेशींवर प्रभाव पडू लागतो. हा संसर्ग डोळ्यांपर्यंत गेल्यास बाहुलीला बाधा करतो. परिणामी दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता राहते. जेव्हा हा आजार मेंदूपर्यंत पोचतो तेव्हा त्यास राइनो ऑर्बिटल सेरेब्रल म्युकर मायकोसिस (आरसीएम) असे म्हणतात.

उपचार कसे करावे?
आजाराचे निदान सीटी स्कॅन आणि एंडोस्कोपीच्या माध्यमातून केले जाते. संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यास अँटी फंगल इंजेक्शन दिले जाते. संसर्गबाधित भागात लहान लहान गाठी होतात आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. सध्या या आजारासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. संसर्गाच्या स्थितीनुसार उपचाराचे पर्याय निवडले जातात. हा शरीरातील टिश्यूंना हानी पोचवतो. वेळेवर उपचार केल्यास तो गंभीर रूप धारण करत नाही. डोळे, गालावर सूज येणे, नाक बंद होणे यासारखी लक्षणे असली तर तातडीने बायोप्सी करून घ्यावी आणि अँटी फंगल थेरेपी सुरू करावी.

लक्षणे
> या आजारात डोके सतत दुखत राहते. चेहरा देखील सुजलेला असतो किंवा जाणवतो. ही प्राथमिक लक्षणे आहेत. हा संसर्ग शरीरातील कोणत्या भागात किती पसरला आहे यावरून त्याची लक्षणे आढळून येतात.
> नाक किंवा सायनेस कंजेशन, ताप येणे, नाक किंवा टाळूवर काळे चट्टे येणे, छाती दुखणे, श्वसनाचा त्रास, घसा बसणे, त्वचा ही काळी किंवा लाल पडणे. डोळ्यावर सूज येणे, जखमांच्या ठिकाणी सूज, अर्धांगवायूचे झटके ही लक्षणे आहेत.

बचावासाठी उपाय
> माती आणि धुळीच्या थेट संपर्कात येऊ नये.
> शेत, बगिचा किंवा बांधकामाच्या ठिकाणी संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालणे. शूज आणि गॉगलचा वापर करणे.
> त्वचेवर जखम असेल तर त्याला साबण आणि पाण्याने स्वच्छ करावे. ४कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहावे ४मास्कचा नियमित वापर करावा.
> घरात बुरशी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.
> स्वयंपाकघर, फ्रिज नियमित स्वच्छ ठेवणे. वास येणारे, खराब अन्न टाकून देणे.
> सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवावी. भरपूर पाणी प्यावे. रोगप्रतिकारक औषधे घेऊ नयेत. स्टेरॉईडस्चा वापर कमी करणे.

कोणाला सर्वाधिक धोका?
> कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण
> टाईप टू मधुमेह, कर्करोग आणि जुनाट आजाराने त्रस्त ४ किचकट शस्त्रक्रिया झालेले रुग्ण
> पांढ-या पेशींची संख्या कमी असणे
> शरीरात लोहसत्वाचे प्रमाण अधिक असल्यास
> दीर्घकाळापर्यंत कॉर्टिकोस्टेरॉईडचे सेवन करणारे
> वेळेच्या अगोदरच जन्मलेली मुले

डॉ. महेश बरामदे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या