31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषतिहेरी उत्परिवर्तनाचा धोका

तिहेरी उत्परिवर्तनाचा धोका

कोविड-१९ च्या दुस-या लाटेसाठी डबल म्युटन्ट म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झालेला विषाणू कारणीभूत असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. परंतु आता असाच ट्रिपल म्युटन्ट म्हणजे तिहेरी उत्परिवर्तन झालेला विषाणू महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये आढळून आल्याने चिंता वाढली आहे. उत्परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी दहा प्रयोगशाळांमध्ये काम सुरू असून, जीनोम सिक्वेन्सिंगचे हे काम अधिक गतिमान करण्याची आणि त्यासाठी पुरेसा निधी पुरविण्याची आवश्यकता आहे.

एकमत ऑनलाईन

भारतात मंगळवारी कोरोनाचे सुमारे तीन लाख नवे रुग्ण आढळले आणि तोपर्यंतच्या २४ तासांच्या काळात सुमारे २ हजार रुग्णांनी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमागे आतापर्यंत दुहेरी उत्परिवर्तनाच्या (डबल म्युटेशन) विषाणूचे कारण सांगितले जात होते. परंतु आता एक नवीनच आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे आणि ते म्हणजे तिहेरी उत्परिवर्तनाचा (ट्रिपल म्युटेशन) विषाणू. कोरोना विषाणूच्या तिहेरी उत्परिवर्तनाच्या व्हेरिएन्टने देशाचा दरवाजा ठोठावला असल्याचे मानले जात आहे. ट्रिपल म्युटेशन म्हणजे कोरोना विषाणूचे तीन वेगवेगळे व्हेरिएन्ट एकत्र येऊन तयार झालेला नवा व्हेरिएन्ट होय. देशातील काही भागांमध्ये हा ट्रिपल म्युटेशनचा व्हेरिएन्ट आढळून आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये ट्रिपल म्युटन्ट विषाणू आढळून आला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोना रुग्णांच्या वेगाने वाढत असलेल्या संख्येमागे नवनवीन व्हेरिएन्ट हेच कारण आहे. वस्तुत: विषाणू जेवढा फैलावतो तेवढा तो स्वत:च्या प्रती बनवितो आणि त्या प्रक्रियेत त्यात काही बदलही होतात.

भारतात यापूर्वी दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आढळून आला होता. म्हणजेच, त्यात दोन वेगवेगळ्या विषाणूंच्या एकत्रित येण्यामुळे नवा विषाणू तयार झाला होता. ट्रिपल म्युटन्टमध्ये तीन स्ट्रेन एकत्र आले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल आणि दिल्लीत ट्रिपल म्युटन्ट आढळून आला आहे. हा ट्रिपल म्युटन्ट किती घातक आहे किंवा तो किती वेगाने पसरतो आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी अजून संशोधन करावे लागेल. सध्याच्या काळात भारतातील दहा प्रयोगशाळांमध्ये विषाणूंच्या जनुकीय साखळीचे (जीनोम सिक्वेन्सिंग) संशोधन होत आहे. डबल म्युटन्ट विषाणूमुळे कोरोनाचा आजार वेगाने तर पसरलाच; परंतु यावेळी लहान मुले आणि तरुणही अधिक संख्येने संसर्गित झाले. आता हा तिहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू किती वेगाने पसरतो आणि किती घातक ठरतो, हे येणारा काळच सांगेल. ट्रिपल म्युटेशन असलेल्या स्ट्रेनमधील दोन विषाणू असे आहेत, जे घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तयार असलेल्या लसींचा त्यावर परिणाम होईल की नाही, याबाबतही अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या विषाणूशी लढण्यासाठी जी इम्युनिटी (रोगप्रतिकार शक्ती) तयार झालेली असते, ती भेदण्याची ताकद तिहेरी उत्परिवर्तन असलेल्या विषाणूत आहे.

भारतात जी कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, त्यासाठी बहुसंख्य शास्त्रज्ञांनी दुहेरी उत्परिवर्तनाच्या विषाणूला जबाबदार मानले आहे. त्याला बी.१.१६७ असे नाव देण्यात आले होते. जीनोम सिक्वेन्सिंग प्रक्रियेत या नव्या म्युटन्टची ओळख गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच पटविण्यात आली होती. कारण या विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये (प्रथिनयुक्त आवरण) ई-४८४-क्यू आणि एल-४२५-आर या आधीच्या दोन विषाणूंचे एकत्रीकरण झाल्याचे दिसून आले होते. बी.१.१६७ ची ओळख पटताच त्याचा संसर्ग टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलणे आणि व्यापक स्तरावर जीनोम सीक्वेन्सिंग करणे गरजेचे होते. परंतु तरीही सिक्वेन्सिंगचा वेग कमीच होता. नोव्हेंबर आणि जानेवारीत निधीची कमतरता, स्पष्ट निर्देशांचा अभाव आणि मुख्य म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची घटलेली संख्या यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातूनच आता बी.१.१६७ मध्येच आणखी एका विषाणूचा मिलाफ झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये वेग आणला जाईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु – दत्तात्रय भरणे

विषाणूच्या अंतर्गत रचनेमध्ये होणारे बदल जीनोम सिक्वेन्सिंगमुळे कळून येतात. त्यामुळे विषाणूची उत्पत्ती आणि एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात तो पोहोचण्याचे रस्ते, म्युटेशन अर्थात उत्परिवर्तनाशी संबंधित अन्य माहिती या प्रक्रियेद्वारेच मिळते. शिवाय विषाणू कमकुवत होत आहे की अधिक प्रबळ होत आहे, हेही समजते. याच कारणामुळे चीनमधून विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली, त्या काळापासून जीनोम सिक्वेन्सिंग करणा-या देशांनी विक्रमी कालावधीत कोविड-१९ ची लस विकसित केली. जागतिक स्तरावर विचार करता संक्रमण पसरल्यानंतर सहा महिन्यांत चीन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी हजारोंच्या संख्येने जीनोम सिक्वेन्सिंग केली. भारतात मात्र आतापर्यंत काही-शे जीनोम सिक्वेन्सिंग झाली आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगचे महत्त्व पाहता भारत सरकारने जानेवारी २०२१ मध्ये सार्स-कोव-२ जीनोम कन्सोर्टियमची (इन्साकॉग-आयएनएससीओजी) स्थापना केली. इन्साकॉगला दहा प्रयोगशाळा जोडण्यात आल्या. जीनोम सिक्वेन्सिंगला मोठा कालावधी लागतो आणि हे काम खर्चिकसुद्धा असते, हे लक्षात घेतले पाहिजे. एका सिक्वेन्सिंगसाठी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि त्यावर तीन ते पाच हजारांचा खर्च येतो.

इन्साकॉगला सरकारच्या वतीने सुरुवातीच्या काळात ११५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे आणि अतिरिक्त निधीसाठी जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विभागाला स्वतंत्रपणे निधी उभारण्यास सांगण्यात आले आहे. ११५ कोटींच्या निधीचा पहिला हप्ता ३१ मार्चला जारी करण्यात आला आणि तरतूद ११५ कोटींच्या ८० टक्क्यांवर आणण्यात आली. फेब्रुवारीत काम सुरू केल्यापासून इन्साकॉगने १३ हजारांहून अधिक सिक्वेन्सिंग केली आहेत. मात्र, संसर्गग्रस्तांच्या संख्येच्या पाच टक्के या संख्येने सिक्वेन्सिंग करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्ण चोवीस तासांत आढळत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तांतानुसार, प्राप्त झालेल्या नमुन्यांच्या अवघ्या एक टक्का नमुन्यांचेच इन्साकॉग सिक्वेन्सिंग करीत आहे. परंतु संस्थेला अशी काही माहिती मिळत आहे, जी चिंताजनक आहे. सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने असे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाला असे सांगण्यात आले होते की, डबल म्युटन्ट स्ट्रेनमध्ये आता आणखी एक उत्परिवर्तन झाले आहे. हा तिसरा म्युटन्ट असून, त्यात तीन वेगवेगळ्या स्ट्रेनचा मिलाफ झालेला आहे.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली याव्यतिरिक्त छत्तीसगडमध्येही ट्रिपल म्युटन्टचा व्हेरिएन्ट आढळून आला आहे. नव्या स्ट्रेनमध्ये स्पाईक प्रोटीनच्या बाहेर म्युटेशन (उत्परिवर्तन) पाहायला मिळाले आहे. या चार राज्यांमधून आलेल्या १७ नमुन्यांमध्ये हा व्हेरिएन्ट आढळून आल्याने चिंता वाढली आहे. १६ एप्रिल रोजी आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की, १३,६१४ नमुन्यांमधून १,१८९ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील ११०९ नमुने ब्रिटनमधील स्ट्रेनशी संबंधित आहेत, तर ७९ नमुने दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी संबंधित आहेत. एक नमुना ब्राझीलमधील स्ट्रेनशी संबंधित असल्याचेही आढळून आले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, संसर्गासाठी कोणता स्ट्रेन किती प्रमाणात जबाबदार आहे, हे सांगता येणार नाही. आपल्याकडे असे कोणतेच पुरावे नाहीत. बी.१.१६७ किंवा बी.१.१.७ यापैकी कोणताही एक स्ट्रेन किंवा हे दोन्ही स्ट्रेन मिळून या रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत असू शकतात. या परिस्थितीमुळेच जीनोम सिक्वेन्सिंग आवश्यक बनते.

विनिता शाह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या