22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeविशेषस्वबळावरून आघाडीत खडाखडी !

स्वबळावरून आघाडीत खडाखडी !

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणा-या काँग्रेसला शेलक्या शब्दात कानपिचक्या दिल्या. आघाडीत सगळं सुरळीतपणे चालले तर विधानसभेच्या निवडणुकीला अजून साडेतीन वर्ष आहेत. त्यामुळे त्याची चर्चा आत्ता अप्रस्तुत आहे. व गेल्या २५ वर्षातील आघाडी व युतीच्या राजकारणाकडे पाहिले तर त्यातील पक्षांनी बहुतांश निवडणूका स्वबळावर लढल्या आहेत. कल्याण-डोंबिवली व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर शिवसेना-भाजप युती असूनही अत्यंत त्वेषाने लढले होते. मग आत्ताच स्वबळाच्या ना-याचा एवढा त्रास का व्हावा? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

एकमत ऑनलाईन

शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन परवा साजरा झाला. कोरोनाच्या संकटामुळे सलग दुस-या वर्षी त्यांना ऑनलाइन मेळावा घ्यावा लागला. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. पक्षाच्या व्यासपीठावर बोलणार असल्याने काही काळासाठी आपण मुख्यमंत्रीपदाची वस्त्रं बाजूला ठेवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जाहीर केले. त्यामुळे आपले भाषण शासकीय नाही तर ठाकरी भाषेत असेल याचा अंदाज आलाच होता. पण त्यांची तोफ भाजपाऐवजी आपल्याच सरकारमधील सहयोगी काँग्रेसवर धडाडली. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा इरादा व्यक्त करणा-या काँग्रेसला त्यांनी चांगलेच फटकारले. राज्यावर संकट असताना कोणी स्वबळाची भाषा करत असतील तर लोक जोड्याने मारतील, असा इशाराही दिला.

त्यांच्या या पवित्र्यामुळे सगळेच चकित झाले. कालपर्यंत समन्वयाचे व सहमतीच्या राजकारणाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदम एवढे आक्रमक का झाले? एखाद्या पक्षाच्या, एखाद्या नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व साडेतीन वर्षांनी होणा-या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा असे सांगितल्यामुळे मुख्यमंत्री एवढे का बरं रागावले? की त्यांच्या बदललेल्या स्वरामागे अन्य काही कारण आहे? ज्यांच्यासोबत जोडीने काम करायचे आहे त्यांच्यासंदर्भात जोड्याची भाषा वापरणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. त्यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पुन्हा भाजपाशी जुळवून घेण्याची मागणी केल्याने वेगवेगळे तर्क सुरु झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने दिलेली संयमित प्रतिक्रिया व एकूण राजकीय स्थिती पाहता हे प्रकरण फार चिघळेल असे दिसत नाही. पण वातावरण मात्र नक्की गढूळले आहे.

महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून आघाडी व युतीचे राजकारण सुरू आहे. ९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. ९९ पासून २०१४ पर्यंत दोन काँग्रेसच्या आघाडीची सत्ता होती. तर २०१४ च्या निवडणुकीत वेगळे झालेल्या शिवसेना-भाजपाने पुन्हा एकत्र येऊन सत्तेची चूल मांडली. तर २०१९ च्या निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी होऊन शिवसेना व दोन काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. भाजपाने अनेक प्रयत्न करूनही गेल्या दीड वर्षात आघाडीला साधा तडाही गेला नाही. मग स्वबळाच्या ना-यामुळे एवढी अस्वस्थता कशासाठी? गेल्या २५ वर्षात आघाडी व युतीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका स्वबळावर लढवल्या. मागच्या सरकारात सहयोगी असलेल्या भाजप व शिवसेनेने मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका तर अत्यंत त्वेषाने लढवल्या. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्यावरून थेट ‘बांद-याच्या बॉस’वर आरोप केले होते.

पण राज्यातील सत्तेवर त्याचा परिणाम झाला नाही. राज्यात आघाडीचे सरकार असताना दोन काँग्रेसनी बहुतांश निवडणुका स्वबळावर लढल्या. एवढेच नव्हे तर २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना, भाजपशी हातमिळवणी केली होती. तरीही राज्यातील सरकारवर त्याचा परिणाम झाला नव्हता. विधानसभा निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे व त्या निवडणुकांमध्ये आघाडी करायची नाही याचा काँग्रेसचा निर्णय महाराष्ट्रात नाही, तर दिल्लीत होईल. त्यामुळे त्याबाबत आत्ताच कोणी बोलण्याचे कारण नव्हते व कोणी बोलले तरी सरकारमधील घटकपक्षांना एकसंघ ठेवण्याची जबाबदारी असलेल्यांनी टोकाची प्रतिक्रिया देण्याचेही कारण नव्हते. म्हणूनच एवढी तिखट प्रतिक्रिया येण्याचे कारण काय? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

पुढील वर्षी मिनी विधानसभा निवडणूक !
पुढच्या वर्षी मुंबईसह दहा महापालिका व २७ जिल्हा परिषदांची निवडणूक आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी निवडणूक होऊ न शकलेल्या आणखी ५ महापालिकांची निवडणूक होणार आहे. कोरोनाचे संकट निवळले तर फेब्रुवारीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असली तरी यातील अनेक ठिकाणी आघाडी होऊ शकणार नाही. पक्षाची पुनर्बांधणी करायची असेल तर किमान जेथे पक्षाची थोडी फार ताकद आहे तेथे या निवडणुका स्वबळावर लढवण्याला त्या त्या पक्षांचे प्राधान्य राहील. त्यामुळे नाना पटोले किंवा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देऊन मोर्चेबांधणी सुरू केली असेल. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पंचप्राण आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने जवळपास मुंबईची सत्ता खेचली होती. थोडक्यात त्यांचा प्रयत्न हुकला. आता पुन्हा नव्या जोमाने हा प्रयत्न होणार हे नक्की आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर युती होऊ शकेल, पण राष्ट्रवादीची मुंबईतील ताकद खुपच मर्यादित आहे. त्यामुळे काँग्रेसची स्वबळाची घोषणा शिवसेनेला अस्वस्थ करतेय का? असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

पुन्हा वावड्यांना ऊत !
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीच २० मिनिटं बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेनंतर ब-याच वावड्या उठल्या होत्या. त्या शांत होत नाहीत तोवर मुख्यमंत्र्यांच्या कालच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला वाव दिला आहे. दिल्लीतील भेटीने मुख्यमंत्र्यांना वेगळी ऊर्जा दिलीय का? त्यांचा आत्मविश्वास वाढलाय का? अशीही कुजबुज सुरू आहे. शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये परवा शिवसेनाभवनासमोर झालेली हाणामारी व त्यानंतरची भाजपा नेत्यांची वक्तव्ये संभाव्य समिकरणाच्या चर्चेला छेद देणारी आहेत. पण चर्चा तर होणारच.

प्रताप सरनाईकयांचे पक्षप्रमुखांना साकडे !
मातोश्री’चे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी पत्रात केला असला तरी केंद्रीय यंत्रणांकडून होणारा त्रास हे त्यांचे प्रमुख दुखणे आहे. सरनाईक यांची सध्या ईडी कडून चौकशी सुरू आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना आपल्याला, अनिल परब व रविंद्र वायकर यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जातो आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी जुळवून घेतल्यास त्यालाही कुठे तरी आळा बसेल, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपशी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना व शिवसेनेला होईल असेही त्यांनी पत्रात म्हटलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्या लोकांना फोडतायत, शिवसेना आमदारांची कामं होत नाहीत, असे आरोप त्यांनी केले असले तरी खरं दुखणं ईडीच्या ससेमि-याचे दिसते आहे. पण या पत्राने आधीच सुरू असलेल्या चर्चेला फोडणी मिळाली आहे.

बार्शी तालुक्यातील गौडगावात सापडल्या सातवाहन काळातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या