27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषग्रामीण रोजगार आणि अर्थव्यवस्था

ग्रामीण रोजगार आणि अर्थव्यवस्था

ग्रामीण भाग हाच भारताच्या समृद्धीचा खरा आधार आहे. गावे, शेती, पशुपालन हेच या समृद्धीचे प्रमुख स्रोत आहेत आणि या व्यवसायांचा प्रमुख आधार गावे हाच असतो. त्यामुळे याच तीन बाबींवर आधारित लहान-लहान व्यवसायांची स्थापना आपल्याला ग्रामीण भागात करावी लागेल आणि त्यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला खरी बळकटी मिळेल. ग्रामीण लोकांचा स्वाभिमान जागा करण्यासाठी त्यांना शाश्वत रोजगार गावात मिळणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील उत्पादने जास्तीत जास्त खरेदी केल्यास हे शक्य होईल.

एकमत ऑनलाईन

सध्याच्या काळात जगातील सर्वच अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटाच्या दुष्परिणामांमुळे लडखडू लागल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेलाही कोरोनाकाळात मोठा फटका बसला. परंतु ग्रामजीवनाची शक्ती आणि कृषक समाजाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने याही काळात यशाची शिखरे काबीज केली. प्रतिकूल परिस्थितीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारतीय परंपरा जोपासणा-या खेड्यातील साध्यासुध्या लोकांनी बड्या अर्थतज्ज्ञांचे अंदाज साफ खोटे ठरवून कोरोनाच्या संकटालाही पराभूत केले. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) २३.९ टक्क्यांनी घसरले होते. परंतु एकमेव कृषी क्षेत्राने याही काळात सकारात्मक वृद्धी नोंदविली.

हा काळ संसर्गाने सर्वाधिक प्रभावित झालेला काळ होता. रब्बी हंगाम समाप्त होताच टाळेबंदी (लॉकडाऊन) सुरू झाली होती. तरीही कृषी क्षेत्राकडून सकल मूल्यवर्धित (जीव्हीए) गेल्या वर्षीच्या (२०१९-२०) तुलनेत ३.४ टक्के वाढलेला होता. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास या क्षेत्राने राजकोषात पहिल्या तीन महिन्यांत १४८१५ कोटी रुपयांची भर टाकली. ट्रॅक्टर विक्रीत ३८.५ टक्क्यांची वृद्धी झाली. शेतक-यांनी खरिपासाठी ट्रॅक्टरसारख्या मोठ्या सुविधांवर गुंतवणूक केली. २०१३-१४ नंतर प्रथमच कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेत प्रथम स्थान पटकावले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, या वृद्धीमुळे देशातील एकंदर कुटुंबांपैकी ४८.३ टक्के कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम केला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही कुलूपबंद झाले होते. औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील उलाढाल पूर्णत: ठप्प झाली होती आणि लोक आपापल्या घरात कैद झाले होते. घराबाहेर पडणा-यांना पोलिस दंडुक्याचा प्रसाद देत होते. त्यामुळे नागरी जीवनाची गतीच थांबली होती आणि जगातील मोठमोठे उद्योगपतीही प्रचंड मोठ्या तोट्यामुळे धपापू लागले होते. उद्योगांमधील कामकाज ठप्प झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यात येत होती. ग्रामीण भागातील जे लोक मजूर म्हणून शहरांत वास्तव्यास आहेत, ते फार काळ कामाविना राहू शकत नव्हते. काही दिवस शहरांमध्ये अशा लोकांसाठी अन्नछत्रे आणि अन्नपाकिटे वाटण्याचे उपक्रम चालले; परंतु नंतर तेही बंद झाले. शहरात घरकाम करणा-या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या श्रमजीवींना दोन वेळच्या जेवणासाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहणे मान्य नव्हते. त्यांचा स्वाभिमान आणि शक्ती उफाळून आली आणि ते आपापल्या गावी पायीच रवाना झाले.

इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लसींना भारतात मंजुरीची गरज नाही

अशा भीषण परिस्थितीतही भारताच्या कृषी क्षेत्राने आणि ग्रामीण जीवनाने आपल्या संकल्पशक्तीने महामारीविरुद्ध कंबर कसली आणि अद्भूत उच्चांक प्रस्थापित केला. नागरी अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे लोकांना शहरात टिकून राहणे अवघड झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उलट्या दिशेने म्हणजे शहरांकडून गावांकडे होणारे स्थलांतर पाहायला मिळाले. रोजगारासाठी भटकंती करणा-या तरुणांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. शहरांत उपजीविकेचे साधन मिळण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे भविष्याच्या अनिश्चिततेची भीती मोठ्या प्रमाणावर लोकांना पुन्हा शेतीकडे वळवू लागली. त्यामुळेच शेतीत जुलै-ऑगस्ट २०२० या काळात मोठी गुंतवणूक झाली. गावांतील लोकांनी शेतीशी संबंधित अनेक छोटी-छोटी कामे सुरू केली.

ग्रामीण लोकांनी आसपासच्या गावांतील लोकांशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कयंत्रणा उभी केली. या माध्यमातून देशात स्वयंसहायता समूह तयार होऊन सहकार तत्त्वावर मोठमोठी कामे सुरू झाली. त्यामुळे शेती क्षेत्रात मोठे परिवर्तन आणि यश प्राप्त झाले, असे म्हणता येईल. त्याचबरोबर ग्रामीण महिलांनी लोणचे-पापड यांसारखी उत्पादने तयार करणारे कुटीरोद्योग सुरू केले. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमधील लोकांना या दृष्टीने मोठे यश मिळाले. उत्तराखंड सरकारने शहरातून परत आलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी योजना सुरू केल्या आणि डोंगराळ भागात राहणा-या लोकांनी मोठ्या संख्येने या योजनांचा लाभ घेतला. आपापल्या गावात त्यांनी पुन्हा पाय रोवले. आत्मनिर्भर भारत संकल्पनेबरोबरच यामुळे आत्मनिर्भर गावाची संकल्पनाही प्रभावी पद्धतीने अमलात येत आहे. लोकांना आता गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या ग्रामीण अर्थशास्त्राची आठवण झाली आहे.

ग्रामीण भाग हाच भारताच्या समृद्धीचा आधार आहे, यात शंकाच नाही. गावे, शेती, पशुपालन हेच या समृद्धीचे प्रमुख स्रोत आहेत आणि या व्यवसायांचा प्रमुख आधार गावे हाच असतो. त्यामुळे याच तीन बाबींवर आधारित लहान-लहान व्यवसायांची स्थापना आपल्याला ग्रामीण भागात करावी लागेल आणि त्यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला खरी बळकटी मिळेल. ग्रामीण लोक जेव्हा गावात राहतात, तेव्हा आर्थिक संसाधने कमी असूनसुद्धा सन्मानाने जगतात आणि पैशांची बचतही करतात. ग्रामीण क्षेत्रातून शहरांत स्थलांतर करणारा सर्वसामान्य आणि भोळ्याभाबड्या लोकांचा एक वर्ग सातत्याने आर्थिक आणि मानसिक शोषणाचा बळी ठरतो. गलिच्छ वस्त्यांमध्ये हा वर्ग नरकयातना भोगत जगताना दिसतो.

गेल्या काही वर्षांत देशातील सर्वांत शेवटच्या स्तरातील माणसाबाबत बरीच हालचाल आणि चर्चा सरकारी पातळीवर घडून आली. अंत्योदयच्या बाबतीत यामुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शेवटच्या माणसासाठी अनेक योजनाही येत आहेत. यातील काही योजना उपयुक्त ठरल्या असल्या तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, शेवटच्या माणसाला मदत करण्यापेक्षा त्याला त्याच्या पायावर उभे करणे आणि स्वाभिमानाने जगणे शक्य होईल, अशी परिस्थिती निर्माण करणे हा योजनांचा हेतू असला पाहिजे. उत्पादन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार वाढविण्याची चर्चा धोरणकर्ते आणि उद्योगपतींकडून नेहमी केली जाते. या क्षेत्रात रोजगार आहे; परंतु तो कायमस्वरूपी नाही. महात्मा गांधी आणि दीनदयाळ उपाध्याय नेहमी रोजगाराच्या शाश्वतीच्या विषयावर भर देत असत. रोजगाराची शाश्वती हा भारताच्या आर्थिक विचारांचा एक भाग आहे.

रोजगाराची शाश्वती ही भारतीय जीवनमूल्याची आर्थिक बाजू आहे. ग्रामसंवर्धनात, कृषी आणि पशुपालनाच्या क्षेत्रात आणि त्यावर आधारित कुटिरोद्योगांच्या स्थापनेत हाच विचार आहे. स्वदेशीच्या जाणिवेतसुद्धा हीच शाश्वती आहे. उलटपक्षी पाश्चात्त्य देश आणि चीन आदी देशांकडे अन्य देशांमधून आणलेले धन मोठ्या प्रमाणावर आहे. ते आपली उत्पादने महागड्या दराने गरीब आणि विकसनशील देशांत नेऊन विकतात. त्यांची अर्थव्यवस्था शहरांच्या माध्यमातून दीर्घकाळ सुरू राहू शकते. परंतु भारताच्या बाबतीत हे शक्य नाही.

जोपर्यंत राष्ट्रनिर्माणाच्या केंद्रस्थानी समाजातील शेवटचा माणूस येत नाही तोपर्यंत त्या माणसाला त्याचा आर्थिक-सामाजिक आणि सामाजिक-राजकीय सन्मान प्राप्त करून देता येणार नाही. अखेरच्या माणसाचा विकास करायचा असेल तर त्याला बळ देऊन राष्ट्रनिर्मिती कशी करता येईल, असा विचार केला पाहिजे. जेव्हा गावाचा आणि ग्रामीण लोकसंख्येचा स्वाभिमान जागा होईल, रोजगारातील शाश्वती वाढेल आणि त्यामुळे गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल, तेव्हा गावाचा आत्मा जागा होईल आणि समृद्ध भारताचे स्वप्न साकार होईल. गावाचा आत्मा आणि शहराचे शरीर यामुळे ग्रामीण भागाचे स्वरूप बिघडेल, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळेच ग्रामीण भागातील लोकांना आपण विवेक आणि सनातन ज्ञानाच्या आधारावर शाश्वत रोजगार प्रदान करण्याच्या योजना तयार करू, त्यासाठी धोरण आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करू तेव्हाच त्यांना शाश्वत रोजगार मिळेल. आपण ग्रामीण भागात तयार झालेल्या उत्पादनांची खरेदी जास्तीत जास्त केली पाहिजे. मित्र आणि स्नेह्यांना भेटवस्तू म्हणून ही उत्पादने द्यायला सुरुवात केली पाहिजे. गावातील उत्पादनांमध्ये स्वदेशाचा स्वाभिमान आहे. ग्रामीण लोकांचा स्वाभिमान आहे आणि गावच्या मातीचा सुगंधही आहे.

सीए संतोष घारे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या