20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeविशेषपाहुण्या पक्ष्यांचा ‘रुसवा’

पाहुण्या पक्ष्यांचा ‘रुसवा’

एकमत ऑनलाईन

हिवाळ्याचे दिवस हे पर्यटनकांसाठी आनंददायी, मोहक असतात. याचे कारण या दिवसातील निसर्गसौंदर्य. पावसाळ्यातील बहरलेली सृष्टी हिवाळ्यात नववधूसारखी दिसते. केवळ झाडाफुलांनीच नव्हे तर विविध पक्ष्यांच्या गुंजनस्वरांनी त्याला नवा साज चढतो. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. वर्षानुवर्षांपासूनचं त्यांचं येणं पक्षीनिरीक्षक, पर्यटक आदींसाठी सुखावणारं ठरलं आहे. राजस्थानातील प्रसिद्ध सांभर सरोवर तर यासाठी प्रसिद्ध मानलं जातं. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. असे का घडले? याचे कारण वाढते प्रदूषण, मानवी अतिक्रमण, निसर्गातील वाढता हस्तक्षेप यांमुळे या विदेशी पाहुण्यांनी भारताकडे पाठ फिरवली आहे.

यंदा परदेशी पक्ष्यांसाठी सर्वांत आवडते ठिकाणी सांभर सरोवर येथे येणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही निम्यावर आली आहे. निसर्गाने पक्ष्यांना वाचा दिली नसली तरी धोक्याचे आकलन करण्याची क्षमता दिली आहे. सध्या देशातील पशुधनामध्ये पसरलेला लम्पी रोग पाहून पाहुणे पक्षी सांभर तलावाकडे फिरकले नाहीत, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या सरोवरावरील पक्ष्यांच्या अधिवासावर नेहमीच धोक्याची घंटा असते आणि मानवाकडून वारंवार हस्तक्षेपही केला जातो. परिणामी पाहुणे पक्षी रुसले आहेत. हजारो वर्षांपासून दिवाळी होताच या ठिकाणी पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ सुरू होते. पण यंदाची वर्दळ ही खूपच कमी झाल्याने पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागली आहे.

भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखल्या जाणा-या सांभरचा विस्तार १९० किलोमीटर अणि लांबी २२.५ किलोमीटर आहे. त्याची खोली तीन मीटरपर्यंत आहे. अरावलीच्या पर्तवरांगात असलेले सरोवर राजस्थानच्या तीन जिल्ह्यांत जयपूर, अजमेर आणि नागौरपर्यंत आहे. १९९६ मध्ये या सरोवराची व्याप्ती ५७०७.५२ चौरस किलोमीटर एवढी होती. मात्रा या सरोवराचे क्षेत्रफळ २०१४ मध्ये ४७०० चौरस किलोमीटर राहिले झाले. भारतातील एकूण मीठ उत्पादनाच्या सुमारे ९ टक्के (१,९६,००० टन) मीठ या ठिकाणातून काढले जाते. परिणामी मीठाचे तस्कर देखील या ठिकाणच्या जमीनीवर ताबा मिळवतात. अर्थात पाण्यातील खारटपणा टिकून राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. पण गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील पशुधनामध्ये पसरलेल्या लम्पी या आजारांचे सावट राहिल्याने पक्ष्यांनी सरोवरावर येण्याचे टाळले, असे दिसते.

राजस्थानात लम्पी रोगामुळे सुमारे ७२ हजार जनावरांचा मृत्यू झाला. या आजारावरून अनेक समज आणि गैरसमज आहेत. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या राज्यात अनेक आजारी जनावरांना मालकांनी भररस्त्यात सोडून दिले. ही कृती पाहुण्या पक्ष्यांसाठी हानीकारक ठरणारी आहे. यापूर्वी जेव्हा सांभर सरोवरात एकाचवेळी शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले तेव्हा त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे एव्हियन बॉटूलिज्म नावाचा आजार होता. हा आजार मांसाहारी जनावरांना होतो. गेल्या काही काळात सांभर सरोवराजवळ असंख्य जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बेवारस पडले आहेत. पशुवैद्यकीय खात्याकडून कोणत्याही प्रकारची तयारी केली गेली नाही अणि वन विभागाने देखील पाहुण्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. सांभर सरोवराच्या परिसरात वाढते प्रदूषण हे कोणापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे पक्ष्यांसाठी हे स्थान असुरक्षित बनले आहे. या ठिकाणी होणा-या पक्ष्यांच्या मृत्यूमागे हायपर नॅट्रिमिया हा रोग देखील कारणीभूत मानला जात आहे. खारट पाण्यात सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने पक्ष्यांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. ते खाणे पिणे सोडून देतात आणि त्यांचे पंख आणि पायाला अर्धांगवायूचा झटका येतो. अशक्तपणामुळे त्यांचा मृत्यू होतो. आतापर्यंत जनावरांच्या मृत्यूमागे हायपर नेट्रिमिया हे एकमेव कारण मानले जात होते, मात्र यात आता एव्हियन बॉटूलिज्मचा जीवाणू विकसित होऊ लागल्याने अशा बाधित मृतपक्ष्यांचे भक्षण अन्य पक्ष्यांनी केल्यास त्यांचाही मृत्यू होऊ लागला आहे. यंदा हा धोका अनेक पटीने अधिक आहे.

२०१० मध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर यासंदर्भातील अभ्यासासाठी नेमलेल्या समिती कपूर समितीने केलेल्या शिफारशींवर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. दोन वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने सांभर सरोवरला ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित केले. यानंतर सांभर सरोवराला अतिक्रमणापासून वाचविण्यासांठी सरकारकडून उपाय केले गेले आणि त्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. पण राजस्थान सरकारने अर्धवट माहिती दिली. प्रत्यक्षात सरोवराचे पाणी खराबच होत गेले आहे. सांभर सरोवरात गेल्या काही वर्षांत मानवी अतिक्रमण वाढले असून परिसरातील पर्यावरणाचा -हास होत आहे. परिणामी पाहुण्या पक्ष्यांनी पाठ फिरविली आहे. येथील अभ्यासकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, मीठ काढणारी कंपनी कोणतेही निकष आणि नियम न पाळता सरोवराच्या किना-यापासून खारे पाणी जमा करण्यासाठी दूर अंतरापर्यंत खड्डे खणत आहे. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर राहिलेली घाण त्या खड्ड्यातच टाकली जात आहे. परिणामी प्रदूषणाला निमंत्रण मिळत आहे. दुसरीकडे सरोवरात नदीचे खारे पाणी येणे आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याने सरोवरातील खारटपणा कमी होत आहे. त्यांच्यात संतुलन राहिलेले नाही. पर्यावरणाबाबत जागरूक आणि संवेदनशील असणारे पक्षी हे आपल्या नैसर्गिक अधिवासात मानवाचा वाढता हस्तक्षेप, प्रदूषण आणि भोजन अभावामुळे त्रस्त आहेत. दरवर्षी पाहुण्या परक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. अर्थात नैसर्गिक संतुलन आणि जीवनचक्रात स्थलांतरित पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे, हे विसरता येणार नाही.

स्थलांतरीतच नव्हे तर एकंदर पक्षीजीवन अलीकडील काळात धोक्यात येत चालले आहे. पक्ष्यांच्या बाबतीत आपला देश एके काळी प्रचंड संपन्न होता. परंतु आधुनिक जीवनशैली आणि विकासाच्या वादळाने प्राण्या-पक्ष्यांसमोर, कृमिकटकांसमोर प्रचंड संकटे निर्माण केली आहेत. आग ओकणारा उन्हाळा, प्रचंड उष्मा आणि तहान यामुळे २०१६-१७ मध्ये चेन्नईत शेकडो पक्ष्यांचा जीव गेला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. त्याचप्रमाणे तेलंगण आणि आंध्र प्रदेशातही २०१८-१९ मध्ये अनेक पक्षी अतिरिक्त उष्म्यामुळे मरण पावले होते. आता तर दरवर्षीच उष्णतेची लाट आणि तहान यामुळे शेकडो पक्षी मरण पावल्याची बातमी देशाच्या वेगवेगळ्या भागांतून ऐकायला मिळते. परंतु याला आपल्यापैकी अनेकजण संकट किंवा धोका मानायला तयार नाहीत. पक्ष्यांची नैसर्गिक आश्रयस्थाने लुप्त होत चालली आहेत किंवा कमी होत आहेत. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांना अन्नाचीही एवढी टंचाई भासत नव्हती कारण शेतीभाती, बागबगीचे आदी ठिकाणी त्यांना अन्न उपलब्ध होत असे. त्यामुळेच जे ठिकाण त्यांना आवडेल तेथे ते स्वत:साठी अन्न उपलब्ध करून घेत होते. विदेशातील पक्षीही विणीच्या हंगामात यासाठीच हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून भारतातील विविध तलावांवर यायचे. पण ही संख्या रोडावत चालली आहे. या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

-रंगनाथ कोकणे,
पर्यावरण अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या