26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषसाकव मैत्रभावाचा

साकव मैत्रभावाचा

एकमत ऑनलाईन

मैत्रीतील नातं जपणं केव्हाही चांगलंच असतं; पण त्याचसोबत नात्यातील मैत्री जपणं अतिशय गरजेचं असतं आणि त्याकडे नेमकं आपलं ब-याचदा दुर्लक्ष होतं. माझ्या मते कोणत्याही नात्यात मैत्री असली, समन्वय असला तर ते छान असतं. मैत्री ही नेहमी साकवाचं काम करते. साकव म्हणजे पूल. दोन नात्यांना जोडणारा, सांधणारा असा त्याचा अर्थ. आजकाल सर्वच नात्यांना नावापुरती का होईना मैत्रीची साथ असते. नवीन लग्न ठरताच विहिणी-विहिणी ‘आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहोत’, असं जाहीर करतात. तेही अगदी साखरपुड्याच्या दिवसापासून. ही आनंदाची गोष्ट आहे. पण ती कितपत टिकते, ते पाहणंदेखील तेवढंच गरजेचं आहे. काही अपवाद जरूर असतात; पण तेही बोटांवर मोजण्याइतकेच.

फार जुनी नाही आणि फार नवीनही नाही अशी एक घटना आज आठवते. दोघी पक्क्या मैत्रिणी होत्या. त्यांच्या मुलांनी आपापसात लग्न ठरवलं. दोघींना खूप आनंद झाला. मैत्रीला नवा आयाम मिळाला. देणंघेणं ठरवताना काही वाद नाही. वातावरण अगदी खेळीमेळीचं. कपड्यांची शॉपिंग दोघींची बरोबरीनं झाली. एकमेकींच्या आवडी माहिती होत्या. सुबत्ता होती. त्यामुळे काहीच अडचण आली नाही. मुलगा, मुलगी परदेशात नोकरी करणारे असल्याने ते तेथेच कायम राहतील असा अंदाज होता.

आपल्यालाच सोबत रहायचे असा दोघींचा पक्का निर्णय. मनं जुळलेली. दोघींचे नवरे एकमेकांचे चांगले मित्र. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं होतं. लग्न अगदी छान झालं. सर्वांनी मनापासून वाखाणलं. दोघी मैत्रिणी सुखावल्या! समाधानाची एक दाट साय दोन्ही कुटुंबांवर पसरली. काही दिवस लोटले. वर्षभराचे सणवार मुलांशिवाय दोन्ही आई-बाबांनी मित्रमंडळींसोबत साजरे केले. त्याही गोष्टीचं कौतुकच झालं. एका रात्री मुलीनं आपल्या घरी फोन करून आपण वेगळं होतोय, असं आई-बाबांना सांगितलं. काही कारण देणं त्या मुलीला महत्त्वाचं वाटलं नाही. मुलानंही आपल्या घरी सांगितलं. त्यानंही कारणं सांगितली नाहीत किंवा त्यांना ते फारसं महत्त्वाचं वाटलं नाही. भारतातील दोन्ही घरं हादरली. एकमेकांचं चुकलं, असं म्हणू लागली. एकमेकांची तोंडं चुकवू लागली. अबोला सुरू झाला. मन मोकळं करायची हक्काची जागा दोघी मैत्रिणींनी गमावली होती. त्याचं दु:ख फार झालं. कोंडी काही केल्या सुटत नव्हती.

देशभरात १ ऑगस्ट मुस्लीम महिला हक्क दिवस म्हणून पाळणार

दोघींची अवस्था दोघींच्या नव-यांना बघवत नव्हती. आतापर्यंत आवडीचा पदार्थ एकमेकींना दिल्याशिवाय कधी खाल्ला नव्हता. आता घास घशात अडकत होता. एका भल्या पहाटे त्यातील एकीला रियलाईज झालं की अरे, नातं तर नंतर जुळलं. मैत्री तर आधीपासूनची. ती कशी कच्ची, इतकी तकलादू ? आपणच जाऊन बोललं पाहिजे. ती तशी हळवी आहे. बीपीची पेशंट आहे. मुलांचा निर्णय काही होवो, आपण का असं वागायचं? सकाळ व्हायची वाट न पाहता तिनं नव-याला सांगितलं. चला, आपण तिच्याकडे जाऊया. नवरा हसत होता. प्रेमानं तिला जवळ घेत म्हणाला, मी याच दिवसाची वाट बघत होतो. चल जाऊया. प्रौढ वयातही ती लाजली. ती म्हणाली, माहिती होतं तर वाट का बघितली? तो हसत म्हणाला, तिकडेही हीच स्थिती आहे. चल जाऊया, तुझी मैत्रीण वाट बघत असेल. आलेल्या वादळातही त्यांच्या मैत्रीचा साकव चिरेबंद होता.

दुसरा प्रसंग तर अगदी ताजा आहे. आज ऑफिसात आल्याबरोबर काही वेळात एक साधारण प्रौढ बाई आल्या. मला म्हणाल्या, मॅडम मला कॉम्प्युटर येईल का हो? त्यांना आश्वासन देत मी बोलले. का नाही? कोणालाही येऊ शकेल. त्यात कठीण काहीच नाही. बाई एकदम तावात होत्या. मी जरा विचारात पडले. काय कारण असावं? एका वेगळ्याच निश्चयानं त्यांचा चेहरा चमकत होता. मलाही अंदाज येत नव्हता. जरा चाचपडत चाचपडत त्या माझा अंदाज घेत स्वत:ला मोकळं करू पाहत होत्या. बोलता बोलता त्यांचं कॉम्प्युटर शिकण्याचं कारण कळलं आणि मी दचकले. नव-यानं केलेला विश्वासघात, मुलानं केलेलं दुर्लक्ष, सुनेनं केलेली अवहेलना यामुळे बाई मनापासून दु:खी होत्या. मला परीक्षा नको, सर्टिफिकेट नको.

फक्त मला शिकायचं आहे. का शिकायचं ते कारण विचित्र होतं. त्यानं त्यांचं अंतिम ध्येय साधणारं नव्हतं. ते मला आणि त्यांनाही ठाऊक होतं. पण त्यायोगे त्या मोकळ्या होणार होत्या. एका नव्या ईर्षेने नवीन काही शिकणार होत्या. त्यांचे दोन महिने आनंदात जाणार होते. त्यांचा बीपी या दोन महिन्यांच्या काळात वाढणार नव्हता.

इथे माझ्यात आणि त्यांच्यात साधलेला मैत्रीचा साकव काही काळासाठी का होईना जुळणार होता. तो काळ महत्त्वाचा नाही तर ती मैत्री महत्वाची होती, ते नातं महत्त्वाचं होतं आणि या मैत्रीच्या काळात त्या आपलं मनातलं मळभ मोकळं करून स्वच्छ मनानं आपल्या जगात परतणार होत्या. कदाचित या काळात त्यांच्या आपापसातल्या तुटलेल्या साकवाला परत जोड मिळून एक नवं नातं त्यांच्यात उमलेलही. अपमानाचं, अवहेलनेचं त्यांचं दु:ख जरा कमी होईल. आमचं बोलणं क्लासमधली एक तरुण विवाहित मुलगी ऐकत होती. त्या गेल्यावर ती मला म्हणाली, मॅडम नाण्याला दोन बाजू असतात. त्यांचंही काही चुकत नसेल कशावरून? सगळेच कसे विरोधात जातील हो? मला तिचंही पटत होतं. पण आज त्या बाईला कोणीतरी तिचं मनापासून ऐकावं असं वाटत होतं. ते काम मी केलं.

मी तिला तसं बोलूनही दाखवलं. ते तिला पटलेलं असावं, असं वाटत होतं. आपल्याला कोणीतरी खूप जवळचं असं हवं असतं जे समजून घेईल. आपण मनातलं मोकळं बोलू त्याचं भांडवल करणार नाही. त्याचा गैरवापर करणार नाही. यासाठी मैत्रीइतकं कोणतंच नातं नाही. मग ती मैत्रीतील मैत्री असो, वा नात्यातील मैत्री असो. तो मैत्रपणाचा साकव आपापसांत असणं अधिक महत्त्वाचं आहे.

नात्यानात्यांत असलेल्या मैत्रीला खरंच मोल नाही. मी मोठी, तू लहान, मी श्रीमंत, तू गरीब हा भेदभाव तिथे नसतो. म्हणून भगवंताने सुदाम्याचे पोहे आवडीने खाल्ले. विदुराकडे भोजन केलं. आपण कोण हे माहिती झाल्यावरही कर्णानं महाभारताच्या युद्धावेळी दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. मित्र हा एखाद्या भिंतीसारखा असतो. त्याला आपली सर्व गुपितं माहीत असतात, पण इतरांसमोर तो आपल्याला उघडं पाडत नाही.

– अरुणा सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या