27 C
Latur
Tuesday, July 5, 2022

मीठ

एकमत ऑनलाईन

तिच्या घरचे सर्वजण रात्री जेवण करत होते. जेवणं सुरू झाली आणि एक घास खाल्ला न खाल्ला तोच तिच्या नवरोजींचा संताप अनावर झाला..कारण भाजीत मीठ नव्हतं…म्हणजे ती मीठ टाकायचं विसरली होती की मीठ कमी पडलं होतं हेच ती विसरली होती…समोरचं ताट रागारागाने तिच्याकडे ढकलत नवरोजी निघून गेले बाहेर…सासू तर कधीच सुनेची नसते. त्यांनीही तिला ऐकवायला सुरुवात केली. आपल्याला रोज आयतं ताट समोर येतंय याचं कुणाला काहीच पडलेलं नव्हतं, तिच्या कष्टाची कुणालाही जाण नव्हती. रोज अखंड दोनदा-तीनदा स्वयंपाक करणं, खरंच सोपं असतं का हो! तेच तेच रोज रोज…! खरं म्हणजे तिला खूप वाईट वाटत होतं. एकीकडे आपण प्रत्येक गृहिणीला अन्नपूर्णा म्हणतो आणि कधीतरी अनवधानाने मीठ कमी पडलं म्हणून तिचा आणि अन्नाचा सुध्दा अपमान करून निघून जातो.

कुटुंबाच्या उदरभरण यज्ञात सतत समिधा टाकायचं काम करणारी ही स्त्रीशक्ती एका वेळी किती काम करत असते याची जाणीव फक्त नव-यानेच नाही तर सर्व कुटुंबाने ठेवायला हवी. भाजीत मीठ कमी पडलं म्हणून तिला वाटेल ते ऐकून घ्यावं लागलं, तिच्या माहेरच्या सात पिढ्यांचा उद्धार कशाशी काहीही संबंध नसताना झाला. ती मात्र गप्प … अपराधीपणाच्या भावनेने दडपून गेलेली, पण डोळ्यांतलं खारट पाणी मात्र वाहत होतं…आणि कुटुंबातील सदस्यांचे शब्द मनाला जखमा करून त्यावर मीठ चोळत होते..ते मीठ फक्त भाजीत कमी पडलं होतं की तिचं मीठच आळणी होतं कोण जाणे! तिच्या आईचं नेहमीचं वाक्य ठरलेलं असे, ‘माझ्या मेलीचं मीठच आळणी आहे..कुणाचं किती करा..शेवटी मीच वाईट!’
इथली ‘ती’ प्रातिनिधिक आहे. असे प्रसंग सगळीकडेच घडत असतात. हा प्रश्न मिठाचा असूनही मिठाचा नाहीच पण चिमूटभर मीठ कमी पडलं तर काय घडतं हा आहे.

कमी पडलेलं किंवा अगदी विसरलेलं चिमूटभर मीठ भाजीत टाकून पुन्हा भाजी व्यवस्थित झालीच असती पण तेवढा वेळ, तेवढी संधी तिला द्यायला हवी किंवा इतर कुणीही हे काम करू शकलं असतं पण तसं झालं नाही. तिने भाजीत पुन्हा मीठ टाकून, डबडबलेल्या डोळ्यांनी इतर सर्वांच्या मिन्नतवा-या करून जेवू घातलंसुद्धा पण आपला पोरगा ताटावरून उपाशी उठला म्हणून सासूबाईंची चिडचिड काही थांबत नव्हती. ती जेवली की नाही हा विषय तर कुणाच्या डोक्यातही आला नाही. एका मिठाने तिला तिच्या घरातलं स्थान दाखवून दिलं होतं. सगळी रात्र तणतणत संपली. रात्रीचं सगळं विसरून ती कामाला लागली. सकाळी गाडीवरून ऑफिसला जाताना तिच्या मनात विचार सुरू झाला मीठ नेमकं कशात कमी पडतंय …भाजीत की कुटुंबातल्या नात्यांमध्ये..? नेमकी माणसं आळणी होत चालली आहेत की नाती..? हा प्रश्न तिला पडला. प्रयत्नपूर्वक तिने तो विषय डोक्यातून काढून टाकला.

पण खरंच मीठ किती महत्त्वाचं असतं जेवणात! नुसतं मीठच नाही तर त्याचं नेमकं प्रमाणही तितकंच महत्त्वाचं असतं. तसंच काहीसं नात्याचंही असतं, कुटुंबव्यवस्थेत नातं हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. कुटुंब नावाच्या स्वादिष्ट रेसिपीत छोट्या छोट्या कुरबुरींचा तडका, हसण्या- खिदळण्यातली गोडी, सण-समारंभांचं देखणेपण या सर्वांसोबत हवं असतं थोडंसं समाधानरूपी ‘मीठ’ ज्याशिवाय कुटुंब एकत्र राहू शकत नाही. आंबा, लिंबू यासारखे आंबट पदार्थसुद्धा या मिठात मुरल्याने चवदार होतात. अशीच काही माणसंही असतात. कौटुंबिक समाधान हे मीठच असतं जीवनाचं! आळणी जेवण आणि जीवन दोन्ही अस च नाही का! अशा विचारांच्या तंद्रीत असतानाच तिचा फोन वाजला. गाडी साईडला थांबवून तिने तो रिसिव्ह केला तर नवरोजींचा फोन होता. तो शांतपणे म्हणाला, ‘तू डबा विसरलीयस घरी. मी ऑफिसला जाताना देऊन जातो.’
एका क्षणात सगळं मळभ दूर झालं. तिला उगाच हलकं हलकं वाटू लागलं. तेवढ्यात कुठूनतरी गाण्याचे बोल कानावर पडले… ‘ज़ुबा पे लागा लागा रे नमक ईश्क का.!’ ती मनाशीच हसत हसत गाडी स्टार्ट करून कामाला निघाली.

– रोहिणी पांडे
मोबा.: ९५१८७ ४९१७५

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या