32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home विशेष सलाम विश्वविक्रमी भरारीला

सलाम विश्वविक्रमी भरारीला

‘जीतता वोही है, जिसके हौसलों में दम है...’ असे म्हटले जाते. इतिहासकाळापासून आधुनिक काळापर्यंत विजयासाठीची ही ऊर्मी, उमेद, साहस, संयम, धैर्य महिलांनी अनेकदा दाखवले आहे. याचा पुन:प्रत्यय अलीकडेच एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या विश्वविक्रमाने आला आहे. बोईंग-७७७ या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वाधिक लांबीचा म्हणजेच १६ हजार किमीचा सॅन फ्रॅन्सिस्को ते बंगळुरू हवाई प्रवास करत या रागिणींनी आपल्या कर्तृत्वाची ओळख जगाला करून दिली आहे. महिला वैमानिकांच्या टीमने उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ होती. अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या मोहिमेत या तरुणींनी दाखवलेले साहस ऐतिहासिक आहे.

एकमत ऑनलाईन

‘ऑल विमेन कॉकपिट क्रू’ म्हणजेच विमानाच्या कॉकपिटमध्ये सर्व महिला कर्मचारी नियुक्त करून सर्वांत मोठा प्रवास करण्याचा विक्रम भारतीय महिला वैमानिकांनी नोंदविला आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान सर्वांत मोठा एअर रूट पार करून बंगळुरू विमानतळावर सुखरूप उतरले. कॅप्टन झोया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी ही कामगिरी फत्ते करण्यासाठी निघाल्याची माहिती नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी सर्वप्रथम दिली आणि विमान बंगळुरूला येण्याची प्रतीक्षा सर्व देशवासीय करू लागले. या महिला कर्मचा-यांच्या चमूला उद्देशून मंत्रिमहोदयांनी ‘प्रोफेशनल, क्वालिफाईड अँड कॉन्फिडन्ट’ असे शब्द वापरले.

या उड्डाणातील सर्वांत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे, विमान उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणार होते. या विमानाने एकूण १४ हजार किलोमीटरचा प्रवास केला. प्रवास सुरू करण्यापूर्वीच कॅप्टन झोया अग्रवाल यांनी सांगितले होते की, आपण एक इतिहास घडविण्यासाठी निघालो आहोत, या जाणिवेने सर्व महिला कर्मचारी उत्साहित आहेत. कॅप्टन थनमई पापागारी, कॅप्टन आकांक्षा सोनावणे आणि कॅप्टन शिवानी मनहास यांनी कॅप्टन झोया अग्रवाल यांच्यासोबत उड्डाण केले. याच विमानातून एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक (फ्लाईट सेफ्टी) कॅप्टन निवेदिता भसीन यांनीही प्रवास केला. ‘‘हा विक्रम आम्ही गेल्याच वर्षी नोंदविला असता; परंतु खराब हवामानामुळे दुर्दैवाने त्यावेळी हा विक्रम झाला नाही,’’ असे कॅप्टन झोया यांनी सांगितले. अनेकांच्या दृष्टीने हे एक खूप जुने स्वप्न आहे आणि ते उद्या आम्ही पूर्ण केलेले असेल, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

मुख्य म्हणजे, सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावर सजावट करून उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले होते. भारतीय महिला वैमानिक एक मोठा विक्रम करण्यासाठी निघाल्या आहेत, हे विमानतळावर उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांना यामुळे समजले होते. या उड्डाणाची खासीयत अशी की, उत्तर ध्रुवावरून यापूर्वीही उड्डाण करण्यात आले असले तरी सर्वच्या सर्व महिला कॉकपिट कर्मचा-यांसह असे कधीच झालेले नव्हते. शिवाय आणखी एक खासीयत म्हणजे अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’पासून भारतातील ‘सिलिकॉन व्हॅली’पर्यंत म्हणजे बंगळुरूपर्यंत हे उड्डाण होते.

झोया यांच्या मते, लांब पल्ल्याची उड्डाणे महिला वैमानिक नेहमीच करतात. अटलांटिक महासागरावरून जाणे आणि तेथूनच परत येणे किंवा जाताना प्रशांत महासागरावरून जाणे आणि येताना अटलांटिक महासागरावरून परतणे असे अनेकदा करावे लागते. अशा प्रकारच्या उड्डाणांवेळी अनेकदा बदल करावे लागत असतात. परंतु उत्तर ध्रुवावरून प्रवास करणे ही विशेष गोष्ट आहे. ‘‘उत्तर ध्रुव कुणाला पाहायलाही मिळत नाही; पण मी या ध्रुवावरून उड्डाण करणार, हे खूप भाग्याचे आहे,’’ असे झोया यांनी सांगितले होते. हे सलग सतरा तासांचे उड्डाण होते आणि या प्रवासादरम्यान कुठेही थांबायचे नव्हते. जगातील सर्वांत मोठ्या हवाई रूटपैकी हा एक रूट असला तरी त्यासाठी इतर रूटच्या मानाने इंधन कमी लागेल, असा अंदाज झोया यांनी उड्डाणापूर्वी व्यक्त केला होता. एअर इंडियाने या ऐतिहासिक उड्डाणासाठी बोईंग ७७७-२०० एलआर या जातीच्या विमानाचा वापर केला. या विमानात २३८ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. ‘‘जगाच्या दोन परस्परविरुद्ध टोकांना जोडणारा प्रवास करणेही या विमानाने शक्य आहे,’’ असे सांगत कॅप्टन झोया यांनी बोईंग ७७७-२०० एलआर विमानाची प्रशंसा केली होती.

या विश्वविक्रमी मोहिमेमधील कॅप्टन आकांक्षा सोनावणे या महाराष्ट्राच्या सुकन्या आहेत. मोहिमेनंतर वांद्रे येथील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणतात, वैमानिक महिला असो वा पुरुष; काम हे काम असते. माझ्यावर कंपनीने विश्वास ठेवला आणि मी मिळालेल्या संधीचे सोने केले. हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय आहे.’ सांघिक यशामध्ये अहंला थारा न ठेवणे, हे एक गुणवैशिष्ट्य असते. विक्रमी गगनभरारी घेणा-या या सर्व तरुणींकडे आहे, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे.

कॅप्टन झोया अग्रवाल या खूप अनुभवी वैमानिक असून, ८००० तासांहून अधिक काळ विमानोड्डाण करण्याचा अनुभव त्यांना आहे. कमांडर या नात्याने बोईंग-७७७ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव त्यांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळ आहे. या विमानाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २५०० तास उड्डाण केले आहे. त्यांनी जेव्हा एअर इंडियामध्ये प्रवेश केला, तेव्हा अगदी मोजक्या महिला वैमानिकांपैकी त्या एक होत्या. महिला वैमानिकांकडे सगळे लोक अगदी लहान मुलासारखे आश्चर्याने पाहत असत, कारण विमानोड्डाण हे पुरुषांचे वर्चस्व असणारे क्षेत्र मानले गेले आहे. आपल्याला सर्वांचे सहकार्यही चांगले लाभले, असे त्या सांगतात. झोया या त्यांच्या मातापित्यांच्या एकुलत्या एक आहेत. आपण वैमानिक बनू इच्छितो असे झोया यांनी जेव्हा घरात प्रथम सांगितले होते, तेव्हा त्यांची आई घाबरून रडू लागली होती, अशी आठवण त्या सांगतात. परंतु लवकरच त्यांची आई यासाठी तयार झाली. गेल्या आठ वर्षांपासून झोया या कमांडर म्हणून भूमिका बजावत आहेत. हा प्रवास जबरदस्त झाला, असे त्या सांगतात. ‘‘२०१३ मध्ये जेव्हा मी कॅप्टन बनले तेव्हा माझी आई पुन्हा एकदा रडली होती; मात्र आज ती आनंदाने रडली,’’ असे झोया यांनी नमूद केले.

उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक असते. एअरलाईन कंपन्या या मार्गावरून आपल्याकडील सर्वश्रेष्ठ आणि अनुभवी वैमानिकांनाच पाठवितात. येथून उड्डाण करताना ब-याच तांत्रिक बाबी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. या ठिकाणी कम्पास (दिशादर्शक यंत्र) १८० अंशांनी फिरते. हा अनुभव अत्यंत रोमांचक असतो आणि तेवढाच आव्हानात्मकही असतो. बोईंग-७७७ विमानाचे उड्डाण करणा-या झोया या सर्वांत कमी वयाच्या वैमानिक आहेत, तसेच उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणा-या विमानाचे कप्तानपद भूषविणा-या एअर इंडियाच्या पहिल्या कमांडर आहेत. सॅन फ्रॅन्सिस्को आणि बंगळुरू ही दोन्ही ठिकाणे जगातील ‘टेक्नॉलॉजी हब’ म्हणून ओळखली जातात. या दोन्ही शहरांदरम्यान थेट (विनाथांबा) विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना खूपच फायदे मिळणार आहेत. ही नवी विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळा सुरू होणार आहे. बंगळुरू आणि सॅन फ्रॅन्सिस्को या दोन शहरांमधील हवाई अंतर १३,९९३ किलोमीटर एवढे प्रचंड आहे.

या नव्या हवाई रूटचे अनेक फायदे होणार आहेत. या उड्डाणाला लागणारा एकूण वेळ, ज्या-त्या दिवशी असणा-या हवेच्या वेगाच्या आधारावर १७ तासांचा असेल. या विमानासाठी हा रूट सर्वाधिक सुरक्षित तर आहेच, शिवाय तो सर्वांत गतिमान आणि किफायतशीर आहे. यामुळे इंधनाची बचत तर होईलच, शिवाय पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा हे उड्डाण खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण यामुळे ‘कार्बन फुटप्रिंट’वरही लगाम बसणार आहे. अन्य मार्गांनी या दोन शहरांदरम्यानच्या प्रवासाला याहून कितीतरी अधिक वेळ आणि इंधन लागते. त्यामुळे या मार्गावरून जाताना प्रवाशांना कमी प्रवासभाडे मोजावे लागेल. एअर इंडियामार्फत संचालित होणारे हे उड्डाण जगातील सर्वाधिक लांबीचा प्रवास करणारे पहिले उड्डाण ठरले आहे.

अशी ही बहुपयोगी, बहुउद्देशीय विमानसेवा सर्वप्रथम संचालित करण्याचा बहुमान महिला वैमानिकांच्या चमूला मिळाला ही भारताच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपासून भारतापर्यंतचा हा पहिला विनाथांबा मार्ग असेल. सध्या एअर इंडियाकडून दिल्लीहून न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डी. सी., सॅन फ्रॅन्सिस्को आणि शिकागो अशी उड्डाणे आहेत. तसेच मुंबईहून नेवार्क आणि न्यूयॉर्कदरम्यान विनाथांबा उड्डाणे आहेत. १५ जानेवारीपासून शिकागो आणि हैदराबाद या शहरांदरम्यानही विनाथांबा उड्डाण सुरू करण्याचा एअर इंडियाचा विचार आहे. सॅन फ्रॅन्सिस्को ते बंगळुरू या किफायतशीर परंतु आव्हानात्मक मार्गावरून सर्वप्रथम प्रवास करणा-या कॅप्टन झोया आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला वैमानिकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

कॅप्टन नीलेश गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या