24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषसैंधव मीठ

सैंधव मीठ

एकमत ऑनलाईन

खरे म्हणजे मिठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ असत नाही कारण सर्वच जेवण बेचव लागते. यासाठी आपण दररोजच्या जेवणामध्ये पांढरे मीठ वापरतो. परंतु पांढ-या मिठाच्या अतिसेवनाने आरोग्यासंबंधी विविध समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच की काय काळ्या किंवा शेंदेलोण मिठाचे सेवन अत्यंत उपयोगी असते. या मिठामध्ये सोडियम क्लोराईड, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे अपचन, रक्तदाब आणि रक्ताल्पता या समस्या दूर होण्यास मदत होते. सैंधव मिठात असलेली ही खनिजे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. सामान्य मीठ आपल्याला समुद्रापासून मिळते परंतु शेंदेलोण (सैंधव) व पादेलोण (काळे मीठ) ही खनिज मीठ आहेत. त्यामुळे मिठाचे मोठे मोठे खडक फोडून व नंतर त्याचे बारीक चूर्ण करून ती बनवलेली असतात.

या मिठामध्ये सोडियम क्लोराईड शिवाय मॅग्नेशियम आणि कॅल्शियम तसेच लोह, झिंक, मॅग्निज व पोटॅशियम याची संयुगे अत्यंत अल्प प्रमाणात असतात. सर्वसाधारणपणे सैंधव मीठ हे उपवास, व्रत आणि सणांच्या दिवशी विविध पदार्थांमध्ये वापरले जाते. विशेष म्हणजे सैंधव मीठ पांढ-या मिठापेक्षा पवित्र मानले जाते. सैंधव मीठ हे हिमालयीन मीठ म्हणून सुध्दा ओळखले जाते. या मिठाच्या हलक्याशा गुलाबी रंगात बरेचसे औषधी गुण आढळतात. हिमालयीन मिठाच्या पाण्यात थोडावेळ जरी पाय भिजवले तरी अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या दूर होतात. प्रत्येक प्राण्याच्या शरीरातल्या पचनसंस्थेमुळे त्यांनी खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यामध्ये रूपांतर होणा-या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. या पचनक्रियेमध्ये अपचन, छातीत जळजळ, आंबट पोटशूळ व गॅस सारख्या समस्या निर्माण होतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सैंधव मीठ खनिजे आणि जीवनसत्व असल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

हवामानातील बदलामुळे किंवा थंड-गरम पदार्थ एकाच वेळी खाणे त्यामुळे सर्दीची समस्या निर्माण होऊ शकते. सैंधव मिठामध्ये चोंदलेले नाक/घसा साफ करणारे गुणधर्म आहेत. खोकल्याच्या समस्येपासून सुध्दा आराम मिळण्यास मदत होते. त्यासाठी कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो. आपल्या शरीरामध्ये स्नायू आणि तंत्रिका याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी इलेक्ट्रोलाईट्स गरजेचे असतात. यामध्ये असंतुलन झाल्यास स्नायू आखडतात. त्यामुळे वेदना होतात व हालचालींवर मर्यादा येतात. त्यासाठी स्नायूंची समस्या उद्भवल्यास पाण्याच्या टबमध्ये सैंधव मीठ टाकून त्यामध्ये काही वेळ बसावे अथवा कोमट पाण्यात सैंधव मीठ मिसळून पिल्यास फायदा होतो. सैंधव मिठामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व सोडियम आणि इतर खनिजे असतात. डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सैंधव मिठाची शिफारस केली आहे. त्यासाठी सैंधव मीठ तेलात मिसळून त्या तेलाने हलक्या हाताने डोक्याला मालिश करावी.

सैंधव मिठामध्ये तणाव कमी करणारे गुणधर्म आहेत. यासाठी मीठ थेरेपीचा वापर केला जातो. या थेरेपीमध्ये सैंधव मिठाच्या पाण्यामध्ये आंघोळ केली जाऊ शकते. तसेच विविध तेलांमध्ये सैंधव मीठ मिसळून त्या तेलाने शरीराचा हलका मसाज (स्पा) केला जातो. त्यामुळे तणाव निर्माण करणारे व हार्मोन्स कमी होण्यास मदत होते. त्वचा चांगली दिसण्यासाठी आपण बाजारातून खरेदी केलेल्या साबण आणि फेस वॉश किंवा बॉडी वॉशचा वापर करतो. परंतु त्यामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश असतो जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी फक्त नैसर्गिक पदार्थांचाच वापर करणे जास्त उचित असते. यासाठी सैंधव मीठ अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ घालून आठवड्यातून किमान एक वेळा स्नान केल्यास त्वचा निरोगी राहते. सैंंधव मिठामध्ये तोंडात जमा होणारे हानिकारक जिवाणू नष्ट करण्याचे घटक आहेत. ब-याच वेळा हिरड्यातून रक्तस्त्राव होतो, कारण दात व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे दातावर थर जमा होतात व हिरड्याचे आरोग्य बिघडते म्हणून हिरड्यामधून पस किंवा रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात सैंधव मीठ मिसळून दात नियमितपणे स्वच्छ करावेत.

सैंधव मिठामध्ये चयापचय वाढविण्याचा गुणधर्म आहे. सैंधव मिठामुळे पाचन तंत्रामध्ये आणि पचनसंस्थेशी संबंधित अवयवामध्ये पाण्याचे शोषण वाढते. शरीराला उत्साही ठेवण्यासाठी चयापचय अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण दररोज जे अन्न खातो त्यापासून शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. त्यासाठी सैंधव मिठामुळे चयापचयाच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीस मदत करते. सध्याच्या यंत्रयुगात कामाच्या व्यापामुळे व अवेळी खाण्यामुळे वजनावर नियंत्रण राहत नाही. सतत वाढत जाणा-या वजनामुळे त्रास होतो. त्यासाठी आपण दररोजच्या अन्नात वापरत असलेल्या मिठाची विविधता आणली पाहिजे. त्यासाठी सैंधव मिठाचा वापर केल्यास भूक कमी करण्यास, काही काळासाठी चरबी कमी करण्यासाठी लाभदायक होते. सैंधव मिठामध्ये स्वच्छता करणारे व मृत त्वचा गळून पडणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे सैंधव मीठ डोक्यावरील मृतपेशी आणि घाण काढून टाकण्यास मदत करते.

त्यासाठी कोणत्याही शाम्पूमध्ये केसांना लावण्याअगोदर थोडे सैंधव मीठ मिसळावे व नंतर लावून केस धुवावेत. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्यांचा धोका वाढतो. सैंधव मिठामध्ये केसांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असणारे घटक आहेत. जर आपले केस विरळ (पातळ) असतील अथवा सतत गळत असतील किंवा केसांचे टोक दुभंगलेले असतील तर आहारामध्ये सैंधव मिठाचा समावेश केल्यास या समस्या दूर होतात. त्यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये चिमूटभर मीठ घालून दररोज घेतल्यास केसांच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. सतत मळमळ, छातीत जळजळ करणे असे प्रकार होतात. त्यासाठी आले, लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण करून खाल्ल्यास पित्त कमी होते.
टिप : वनौषधींचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या