अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीची ही भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे यात पहायला मिळणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.’ ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वत:ला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होणा-या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. १२ मे रोजी ‘रावरंभा’ हे मोरपंखी पान प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
शिवानी रांगोळे
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगला धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली ती या मालिकेतील मास्तरीणबाईमुळे. या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात शिवानी रांगोळे एक मराठमोळी मॉडेल आहे. पुण्यात स्थायिक असलेल्या शिवानीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. एक उत्तम मॉडेल असलेल्या शिवानीचा प्रवास हा मॉडेलिंगपासूनच झाला. नंतर अथेमा, झुलता पूल, वेलकम जिंदगी अशा नाटकांमधून अभिनय करीत तिने अँड जरा हटके, फूटरू डबल सीट अशा चित्रपटांमधून देखील भूमिका साकारल्या आहेत. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानायक’ या मालिकेतून तिने प्रवास सुरू केला आणि त्यानंतर शेजारी शेजारी, सांग तू आहेस ना, बन मस्का अशा अनेक मालिकांमधून अभिनयाची मुशाफिरी केली आहे. शिवानीला आता वेध लागले आहेत बॉलिवूडचे. तिचा आकर्षक आणि सोज्वळ चेहरा आणि उत्तम अंगभूत अभिनयाच्या जोरावर ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार हे वेगळे सांगायला नको.
‘प्रपोजल’ मराठी नाटक
मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक वेगळा प्रयोग सादर करीत आहे नवीन मराठी नाटक ‘प्रपोजल’.खरेतर या नाटकाच्या बोल्ड जाहिरातींनी आधीच नाटकाचा बोल्डपणा रसिकांसमोर आणला. सर्वसामान्य नाटकांमध्ये २-४ वेगवेगळे सीन असतात, एखादा हॉलमधला, एखादा बेडरूममधला ..पण ‘प्रपोजल’ हे नाटक वेगळे आहे. कारण हे नाटक रसिकांसमोर सादर होते ते एका लोकल ट्रेनमधून.. नाटकाच्या दिग्दर्शकांनी(राजन ताम्हाणे) लोकल ट्रेनचा एक डबा रसिकांसमोर सादर केला आहे..या नाटकाचे नेपथ्य खूपच महत्त्वाचे, कारण ‘चालणारी लोकल ट्रेन रंगभूमीवर सादर करणे खरच खूप कठीण आव्हान होते’ पण ते अगदी उत्कृष्टपणे साकारले गेले आहे. लोकल ट्रेनच्या दुस-या बाजूने मागे जाणारे वेगवेगळ्या स्टेशन्सचे फलक .. ट्रेनला जिवंत करण्यास मदत करतात..हा लोकल ट्रेनचा प्रवास आहे तो ठाणे ते कर्जत चा.. तो ही शेवटच्या लोकल ट्रेनमधील..ही गोष्ट आहे दोन तरुणांची.. त्यातील एक आहे निवृत्ती पवार (डॉ. अमोल कोल्हे)‘एक सरळ साधा मराठी माणूस’आणि दुसरी आहे एक कॉल गर्ल(अदिति सारंगधर)दोघांनीही या नाटकात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. अदितै सारंगधरने रंगवलेली कॉल गर्ल उत्तमच.. हे दोघे भेटतात शेवटच्या ट्रेनमध्ये.. आणि सुरू होते एक कहाणी..या रात्रीनंतर हे दोघे भेटतात ते सात वर्षांनी.. काय घडते या मधल्या सात वर्षांत.. हे जाणून घेण्यासाठी हे नाटक एकदा पहाच.
झी मराठीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका होणार बंद
झी मराठीवरील मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये येण्यासाठी धडपड करत आहेत. परिणामी या वाहिनीवर वेगवेगळ्या विषयांवरील मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली अशीच एक मालिका बंद होत असून, त्याजागी सुरू होणा-या नव्या मालिकेचा प्रोमोही सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोकप्रिय कलाकार स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर स्टारर ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून स्वप्नील आणि शिल्पा या दोन्ही कलाकारांनी ब-याच कालावधीनंतर टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. परिणामी या मालिकेची विशेष चर्चा झाली. सौरभ आणि अनामिका अशी मुख्य पात्रं या मालिकेत आहेत. चाळीशीनंतर पुन्हा नव्याने गवसलेले प्रेम असे कथानक या मालिकेत दाखवण्यात आले. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांना अलविदा करणार आहे.
संकलन-संयोजन : सुशीलकुमार
मोबा. ९६१९५ ८२८३५