28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषसरदार वल्लभभाई पटेल आणि संस्थानांचे विलीनीकरण

सरदार वल्लभभाई पटेल आणि संस्थानांचे विलीनीकरण

एकमत ऑनलाईन

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतात लहान-मोठी ५६५ संस्थाने होती. या संस्थानांत भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एक-चतुर्थांश जनता रहात होती. भारताच्या अखंडतेसाठी ही सर्व संस्थाने भारतात विलीन होणे आवश्यक होते. भारताचे स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आल्यानंतर या संस्थानिकांना भारतात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोकशाही भारतात राजेशाहीचा मागमूसही ठेवायचा नव्हता. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविला होता. ते या खात्याचे प्रमुख मंत्री होते. त्यांनी व्ही. पी. मेनन यांची सचिवपदी नियुक्ती केली. मलबार प्रांतातून आलेल्या मेनन यांनी संस्थानिकांच्या विलीनीकरणात अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्यांनी संस्थाने विलीन करून घेण्याचा एक मसुदा तयार केला.

एकसंध भारताच्या निर्मितीसाठी भारतातील सर्व संस्थानांचे विलीनीकरण करणे आवश्यक होते. पण विलीनीकरणाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या व अवाढव्य कामासाठी फक्त ७० दिवस उरले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिकांना एक दीर्घ पत्र पाठवून भारतात विलीन होण्याचे आवाहन केले. त्यानंतर ख-या अर्थाने विलीनीकरणाच्या या महायज्ञाला सुरुवात झाली. त्यासाठी नरेश मंडळ व संस्थान खाते यांच्यात वाटाघाटी झाल्या. या समितीने एकत्र येऊन ९ कलमी विलीनीकरणनामा तयार केला. त्यानंतर संस्थानिकांचे मन वळवून सह्या घेण्याचे काम सुरू झाले. व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी मुंबईत संस्थानिकांची एक परिषद आयोजित केली. तेथील भाषणात त्यांनी संस्थानिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार स्वतंत्र राहण्याचा हक्क आहे. पण तसे कुणी केल्यास ते आत्मघातक ठरेल, तुम्ही विलीन झाला नाहीत तर संपून जाल, असे सांगितले. माऊंटबॅटन यांच्या या भाषणाचा संस्थांनिकांवर प्रचंड परिणाम झाला.

आपण स्वतंत्र राहू शकत नाही व त्यासाठी ब्रिटिश शासनाची मदत मिळू शकणार नाही हे वास्तव त्यांना कळाले. सरदार पटेलांच्या बाजूने येणा-या पहिल्या काही महाराजांमध्ये बिकानेरच्या महाराजांचा समावेश होता. २८ जुलै रोजी दिल्लीत एकाच दिवशी १५० संस्थानिकांना मोठ्या सन्मानाने निमंत्रित केले गेले व त्यांना भारतात विलीन करून घेतले. पटेलांचा मार्ग गांधीवादी अहिंसेचा होता. त्यांचे राजकारण मूल्यांवर आधारित होते. राजांना नष्ट करण्यापेक्षा त्यांना मित्र बनवण्यावर त्यांचा अधिक भर होता. सरदार वल्लभभाई पटेल व व्ही. पी. मेनन यांनी अत्यंत संयमाने व मुत्सद्दीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले. पण अजूनही काही संस्थाने भारतात विलीन झाली नव्हती. यात काश्मीर, जुनागड व हैदराबाद या संस्थानांचा प्रामुख्याने समावेश होता. येथील संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास नकार दिला, यातील आपले हैदराबाद एक प्रमुख संस्थान होते. भारतातील इतर संस्थानिक भारतात विलीन होत असताना सातवा निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर यांनी मात्र भारतात विलीन होण्यास ठाम नकार दिला. भारताच्या अखंडतेसाठी हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे आवश्यक होते.

पण निजामाच्या भूमिकेमुळे संस्थानातील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत होती. निजामाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या ‘मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन’ व रझाकार या संघटनांच्या माध्यमातून संस्थानातील हिंदू प्रजेवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार केले जात होते. या अन्यायाविरुद्ध हिंदू महासभा, आर्य समाज व हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला. शेवटी ‘ऑपरेशन पोलो’ म्हणजेच पोलिस अ‍ॅक्शन झाली आणि १७ सप्टेंबर १९४८ ला निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. १९४९ च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पटेलांनी हैदराबादला भेट दिली. निजामाने विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. निजामाकडून अशा प्रकारचे स्वागत मिळालेले ते पहिले भारतीय नेते होते. पराभूत निजामाला त्यांनी दिलेल्या सन्माननीय वागणुकीमुळे निजामाच्या मनातील भीती तर नाहीशी झालीच पण ते दोघं एकमेकांचे मित्र बनले. उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना हैदराबादच्या जनतेला उद्देशून पटेल म्हणाले, ‘‘आपण आता भूतकाळावर पडदा टाकला पाहिजे. देशाचे भवितव्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून उभे राहिले पाहिजे.

आपण सर्व जण या भारतभूमीत जन्मलो आहोत आणि आपण इथेच एकत्र राहणार आहोत. त्यामुळे आपण प्रत्येकाने जातीय सलोखा राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत.’’ फतेह मैदानावरील जाहीर सभेत बोलताना पटेल हैदराबादवासीयांना उद्देशून म्हणाले,‘‘तुम्ही आता भारताचा एक भाग नव्हे, तर भारताचे हृदय बनला आहात.’’ हैदराबादच्या जनतेला दिलासा देत ते म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांतल्या दूषित आणि विषारी वातावरणामुळे काही लोकांच्या हातून घडू नये ते कृत्य घडले असेल. पण आता भूतकाळ विसरा आणि योग्य मार्गाने वाटचाल करा.’’ सरदार पटेलांच्या हैदराबादच्या यशाला दुहेरी किनार होती. राष्ट्रीय स्तरावर हा एक ऐतिहासिक विजय होता. ५६५ संस्थानांचे विलीनीकरण ही दूरगामी परिणाम करणारी फार मोठी घटना होती. डब्ल्यू गॉर्डन ग्रॅहॅम यांनी ख्रिश्चन सायन्स मॉनिटरमध्ये लिहिले, ‘‘सुमारे ८० हजार चौरस मैलांचा भूप्रदेश असलेले हैदराबाद हे राज्य भारतापासून तोडण्याचा या लोकांचा प्रयत्न होता आणि पाकिस्तानची त्यांना फूस होती. ते यशस्वी झाले असते तर भारत राजकीयदृष्ट्या कधीही एकसंध झाला नसता. त्यासाठी एखाद्या पोलादी पुरुषाची गरज होती. सरदार पटेलांमध्ये भारताला असा माणूस मिळाला.’’

मोठमोठी बिरुदं लावणारे हे राजेरजवाडे डोळ्याचं पातं लवण्याच्या आत इतिहासाच्या चादरीखाली झाकले गेले. पटेलांनी त्यांना इतक्या कमी वेळात विलीनीकरण करून कसे घेतले याचे अनेकांना आश्चर्य वाटते. दिवंगत राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या मते पटेल हे बिस्मार्कपेक्षा कितीतरी पटींनी सरस आहेत.१९५६मध्ये भारताच्या दौ-यावर आले असताना रशियाचे अध्यक्ष ख्रुश्चेव्ह यांना या गोष्टीचे महत्त्व नेमके समजले होते. ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही भारतीय अजबच आहात. राजांना नष्ट न करता तुम्ही त्यांची राज्यं कशी नष्ट केलीत हे एक न उलगडणारे कोडे आहे.’’ पटेलांनी सहानुभूती, समजूतदारपणा आणि सर्वसमावेशकता यांतूनच त्यांचे उद्दिष्ट साध्य केले. कटुता आणि सूड यांपासून ते कायम दूर राहिले. छळ करण्यावर किंवा त्रास देण्यावर त्यांचा विश्वास नव्हता.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात ‘‘भारताच्या एकात्मतेचे पहिले आणि
सर्वांत महत्त्वाचे शिल्पकार म्हणजे सरदार वल्लभभाई… पोलादी निर्धाराने,
घणाचे घाव घालून त्यांनी एक देश उभा केला. त्यांच्या कार्यासाठी अनेक पानं
खर्ची घालत नवभारताचे निर्माते व संघटक म्हणून इतिहास त्यांची नोंद घेईल.’’
हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मनात सरदार वल्लभभाईंचे ‘आमचे
मुक्तिदाता’’ हे स्थान अटळ आहे.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या