दक्षिणेतील चित्रपटांचा बोलबाला अलीकडच्या काळात वाढला आहे. काही काळापूर्वी केवळ डब चित्रपट म्हणून त्याकडे पाहिले जायचे. पण आता मात्र त्याची हिंदी आवृत्ती करून कमाई केली जात आहे. ‘दृश्यम’ चित्रपट हे त्याचे आदर्श उदाहरण आहे. तसेच ‘बाहुबली’ चित्रपटाच्या यशाने दक्षिणेकडील प्रभुत्व सिद्ध झालेले असताना ‘आरआरआर’च्या ऑस्कर विजयाने यशाचे यशोशिखर गाठले आहे.
मनोरंजन आणि चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार भारताला मिळण्याची परंपरा १९९५ पासून सुरू झाली. एकंदरीत शंभर वर्षांच्या इतिहासात भारताला एकदाही ऑस्करची बाहुली कोणत्याही श्रेणीत मिळाली नव्हती. अर्थात काही भारतीय कलाकारांना हा पुरस्कार मिळाला, परंतु त्यापैकी बहुतेकांनी परदेशातील चित्रपटात भूमिका साकारलेली असायची. याचे उदाहरण रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटाचे देता येईल. सत्यजित रे यांना लाईफटाईम ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. एका विदेशी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिल्याने ए. आर. रेहमान यांना ऑस्करने सन्मानित करण्यात आले. तो चित्रपट होता ‘स्लमडॉग मिलेनियर’. भारतीय पार्श्वभूमीवर तयार झालेला हा परदेशी चित्रपट होता. अशा प्रकारे अनेक भारतीय प्रतिभावंतांना ऑस्कर मिळाले आहेत. ‘मदर इंडिया’ आणि ‘लगान’ या दोन्ही चित्रपटांना नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागले. या पार्श्वभूमीवर यंदा भारताला अशा दोन संधी चालून आल्या. एकच नाही तर दोन दोन श्रेणीत भारतीयांना पुरस्कार मिळाले.
‘आरआरआर’ या बहुचर्चित चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘द एलिफंट व्हिस्परर’ला सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. हे दोन्ही चित्रपट सर्वार्थाने भारतीय होते. म्हणजेच त्यांची निर्मिती भारतीय कलाकारांनी, भारतीय पटकथेवर आणि भारतातच तयार झाली होती. यातील आणखी एक समान धागा म्हणजे ते दोन्ही चित्रपट दक्षिणेत तयार झालेले आहेत. साहजिकच, या पुरस्कारांमुळे दक्षिणेतील चित्रपट- निर्माते आणि कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. देशात मुंबईला भारतीय चित्रपटांची राजधानी मानली जाते. परंतु या चंदेरी नगरीतील सिनेसृष्टीत तयार झालेल्या एकाही चित्रपटाला आतापर्यंत पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे दक्षिणेकडील चित्रपटनिर्मात्यांनी आणि कलाकारांनी आनंदी होणे स्वाभाविकच होते. मुळातच गेल्या काही वर्षांत दक्षिणेकडील चित्रपटांचा दबदबा देशभरात वाढला आहे.
भारतीय चित्रपट उद्योगाचे मूल्यांकन केले तर बॉलिवूडपेक्षा दक्षिणेतील चित्रपट उद्योग हा दहा वर्षे पुढे गेलेला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एकाहून एक सरस अभिनेते-कलावंत समोर येत आहेत. दक्षिणेतील चित्रपटांच्या पटकथा रंजक असतातच; पण सिनेतंत्रज्ञानाच्या आघाडीवर देखील दक्षिणेतील चित्रपटांनी बाजी मारली आहे. एक वेळ अशी होती की, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांतील बहुतांश चित्रपट हे स्थानिक भाषेत म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये तयार व्हायचे. त्यांची बाजारपेठ स्थानिकच असायची. दक्षिणेत तयार होणा-या या चित्रपटांची निर्मिती ही प्रामुख्याने चेन्नईतच व्हायची. तेथे चित्रपट तयार करण्यासाठी चांगले स्टुडिओ असण्याबरोबरच सुविधाही दर्जेदार आहेत. कालांतराने यातील काही उद्योग आंध्र प्रदेशमध्ये सरकला. कारण एकसंध आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. टी रामाराव हे राजकारणात येण्यापूर्वी तेलुगू चित्रपटाचे मेगास्टार होते. त्यांनी हैदराबाद, विशाखापट्टण येथे चित्रपटनिर्मितीच्या सुविधा विकसित केल्या. त्यांच्या काळात फिल्म सिटीचा विकास झाला. आजघडीला रामोजी फिल्मसिटी लोकप्रिय मानली जाते. केरळचे चित्रपट हे कथानक आणि अभिनयाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानले जातात. त्याचवेळी दक्षिणेतील अन्य राज्यांत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारे चित्रपट तयार होत.
मात्र गेल्या दहा वर्षांत दक्षिणेतील चित्रपटांच्या निर्मितीत कायापालट झाला आहे. अर्थात हा बदल तेलुगू चित्रपटाने झाला. काही वर्षांपूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम तोडले. हा चित्रपट हिंदीसह चार भाषांत तयार करण्यात आला. तंत्रज्ञान आणि अन्य दृष्टिकोनातूही जागतिक दर्जाच्या तोडीचा हा चित्रपट होता. त्याची पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली. त्याचे दिग्दर्शन एस. एम. राजामौली यांचे होते. या चित्रपटाने उत्तरेतही चांगला व्यवसाय केला. या यशानंतर राजामौली यांनी ‘बाहुबली’चा सिक्वेल तयार केला आणि तो देखील तिकिटबारीवर जोरदार कामगिरी करणारा ठरला. आता तिस-या चित्रपटाने ‘आरआरआर’ने मागचे सर्व विक्रम मोडले.
– सोनम परब