हैदराबाद संस्थानात नागरी स्वातंत्र्याची, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांची अत्यंत दुरवस्था होती.हैदराबाद संस्थानाबाहेर पण या परिस्थितीविषयी चर्चा होऊ लागली. हैदराबादमध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आर्य समाज आणि हिंदू महासभा यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी सत्याग्रह केले. त्याअगोदरच हैदराबादमध्ये सेनापती बापट यांनी सत्याग्रह केला होता. हैदराबाद संस्थानातील पीडित जनतेच्या मदतीसाठी आणि भारतीय नागरिकत्वाचे कर्तव्य बजावण्यासाठी संस्थांनाबाहेरील लोकांनी संस्थानात गेले पाहिजे व तेथे सत्याग्रह केला पाहिजे असे सेनापती बापट यांना वाटत होते. त्यांनी अशा आशयाचे एक पत्र प्रसिद्ध केले व आपण १ नोव्हेंबर १९३८ ला हैदराबादमध्ये प्रवेश करून सत्याग्रह करणार आहोत असे जाहीर केले.
या दरम्यान त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी पत्रव्यवहार केला. स्वामीजींनी ‘आपण अवश्य यावे, आपले स्वागत असो’ अशा आशयाचे उत्तर सेनापती बापट यांना पाठवले. २९ ऑक्टोबर १९३८ रोजी पुण्यात शनिवारवाड्यासमोर जाहीर सभा झाली. या सभेत हैदराबादचे राघवेंद्र शर्मा यांचेही भाषण झाले. यावेळी सेनापती बापट यांनी सत्याग्रहींनी कोणती प्रतिज्ञा केली, अटक झाल्यानंतर गांधीप्रणीत सत्याग्रहाच्या शिस्तीप्रमाणे खटला न चालवता आरोप कबूल करावयाचा असल्याने सत्याग्रहींनी कोणता जवाब द्यावा हे पण छापून प्रसिद्ध केले. त्यांना संस्थानाबाहेरील लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळेल असे वाटले होते पण फारसा पाठिंबा मिळाला नाही. तरी पण सेनापती बापट २३ सप्टेंबर १९३८ रोजी पुण्याहून हैदराबादकडे निघाले. त्यांच्यासोबत इतर पाच सत्याग्रही होते. दुस-या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबरला ते हैदराबादला पोहोचले. तेथे त्यांना तात्काळ अटक करण्यात आली व नामपल्ली स्टेशनमधून पुण्याकडे जाणा-या गाडीत बसवून परत पाठवण्यात आले. परत आल्यानंतरही ते स्वस्थ बसले नाहीत. या काळात त्यांनी १२ पत्रके काढली. १ नोव्हेंबर १९३८ला ते दुस-यांदा हैदराबादमध्ये दाखल झाले पण याही वेळी परत पुण्याकडे पाठवण्यात आले.
सेनापती बापटांनी एक डिसेंबर १९३८ ला गुलबर्गामार्गे संस्थानात तिस-यांदा प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत २२ सत्याग्रही होते. गुलबर्गा येथे त्या सर्वांना अटक करण्यात आली व त्यांना चालत करोडगिरी नाक्यापर्यंत नेण्यात आले. तेथून मोटारीतून पोलिस क्वॉर्टरकडे नेण्यात आले व दुस-या दिवशी रिमांडकरता कोर्टात हजर करण्यात आले. ६ डिसेंबर १९३८ ला हा खटला सुरू झाला. सेनापती बापट यांना दोन वर्षे सश्रम कारावास व दोनशे रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली. त्यांच्यासोबतच्या सत्याग्रहींना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पुढील काळामध्ये महात्मा गांधीजी व सर अकबर हैदरी यांच्यात पत्रव्यवहार झाला. त्यानुसार सत्याग्रहींना सोडून अनुकूल वातावरण निर्माण करा असा गांधीजींचा आग्रह त्यांनी मान्य केला आणि त्यातूनच संस्थानांबाहेरील सत्याग्रहींची सुटका करण्यात आली. सेनापती बापट हे संस्थानांबाहेरचे असल्यामुळे त्यांची ८ जानेवारी १९३९ रोजी सुटका करण्यात आली. सेनापती बापट यांनी हैदराबादमध्ये केलेला सत्याग्रह हा अत्यंत महत्त्वाचा होता. जनतेचा फारसा प्रतिसाद नसतानाही ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले. या सत्याग्रहाच्या बातम्या ‘निजामविजय’ व तत्कालीन इतर नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या होत्या.
हैदराबाद संस्थानातील धार्मिक स्वातंत्र्यासाठी जे सत्याग्रह झाले त्यात हैदराबाद हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आलेला सत्याग्रह महत्त्वाचा होता. या सत्याग्रहात महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे पण सहभागी झाला होता याची अनेकांना माहिती नाही. हैदराबादमध्ये वीर यशवंतराव जोशी हे हिंदू महासभेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. २१ ऑक्टोबर १९३८ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची तुकडी नागरी प्रतिकाराच्या नावावर कायदा मोडून तुरुंगात गेली. यावेळी यशवंतराव जोशी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. अशा पद्धतीने हिंदू महासभेच्या एकूण सहा तुकड्या तुरुंगात गेल्या. निजाम राज्यातील हिंदू सभेने संस्थानातील या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला तर महाराष्ट्र हिंदू सभा त्यास पाठिंबा देईल असे आश्वासन नांदगाव येथे भरलेल्या परिषदेत देण्यात आले होते. त्यानुसार संस्थानातील परिस्थितीची पाहणी करण्याकरिता शंकरराव दाते व शिवराम मोडक यांनी मराठवाडा व कन्नड भाषिक प्रदेशात अनेक ठिकाणांना भेटी दिल्या व तेथील लोकांशी संवाद साधून हिंदू समाजाच्या जीवनाची माहिती मिळवली. खरोखरच संस्थानात हिंदू प्रजेला राजकीय तर सोडाच पण धार्मिक अधिकारापासून पण वंचित ठेवले जात होते. उलट विविध कायदे करून हिंदू समाजावरील बंधने वाढवली जात होती. याविषयी ‘केसरी’ या वर्तमानपत्रात अग्रलेख छापण्यात आला होता. त्यामुळे संस्थानातील प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले.
हिंदू महासभेचे नागपूर अधिवेशन होण्याच्या अगोदरच पुण्यात केसरी, मराठा या संस्थेच्या ‘मराठा’ या इंग्रजी नियतकालिकाचे संपादक ग. वि. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑक्टोबर १९३८ रोजी ‘भागानगर हिंदू नि:शस्त्र प्रतिकार मंडळ’ स्थापन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी शनिवारवाड्यासमोर जाहीर सभा घेऊन ‘भागानगर हिंदू नि:शस्त्र प्रतिकार मंडळाचे’ पदाधिकारी जाहीर केले. अध्यक्षपदी ग. वि. केतकर तर सरचिटणीस म्हणून नथुराम विनायक गोडसे याचा समावेश होता. नि:शस्त्र प्रतिकार मंडळातर्फे हैदराबादला नथुराम गोडसेच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी रवाना झाली. यात एकूण बारा सदस्य होते. हिंदू महासभेच्या स्वयंसेवकांनी हैदराबादसह गुलबर्गा, नांदेड, तुळजापूर, जालना, परभणी, औरंगाबाद, वैजापूर, पैठण अशा अनेक ठिकाणी कायदेभंग केला. हिंदू महासभेला संस्थानातील हिंदूंना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे हक्क प्राप्त होईपर्यंत हा सत्याग्रह चालावा असे वाटत होते. या काळात संस्थानातील व बाहेरील सुमारे चार हजार हिंदू महासभेचे सत्याग्रही तुरुंगात गेले. यातील १४ कार्यकर्त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. निजाम सरकारने राजकीय सुधारणांची एक योजना १७ जुलै १९३९ रोजी घोषित केली. त्यानंतर हिंदू महासभेने आपले आंदोलन स्थगित केले. सर्व सत्याग्रहींची १७ ऑगस्ट१९३९ रोजी तुरुंगातून सुटका झाली.
हिंदू आघाडीच्या पथकातील एक देशप्रेमी तरुण व्ही. रामचंद्रराव यांना तुरुंगात ‘वंदे मातरम्’ गीत म्हणण्यावरून फटक्यांची शिक्षा देण्यात आली. अंगातून रक्ताच्या धारा उडत असतानाही प्रत्येक फटक्याच्या आघाताबरोबर ‘वंदे मातरम्’ची गर्जना करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते ढळले नाहीत. या त्यांच्या वीरकृत्यामुळे पुढे त्यांना ‘वंदे मातरम् रामचंद्रराव’ हेच नाव रूढ झाले. नंतरच्या काळात भारत सरकारचे एजंट जनरल म्हणून के. एम. मुन्शी यांची हैदराबादमध्ये नियुक्ती झाली. त्यांना संस्थानातील सर्व हालचालींची माहिती मिळवण्यासाठी काही गुप्तहेर म्हणून कार्य करू शकणा-या तरुणांची आवश्यकता होती. तेव्हा रामचंद्रराव व त्यांच्या काही बहादूर मित्रांनी ही जबाबदारी स्वीकारली. वास्तविक पाहता हे अतिशय जोखमीचे काम होते. संस्थानात हवाईमार्गे शस्त्रास्त्रे आणली जात आहेत असा संशय व्यक्त केला जाऊ लागला तेव्हा रायचूर, वरंगल व बीदर येथील पापनाशजवळील विमानतळावरील सर्व हालचालींची माहिती जमा करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी या भागात शेतक-याच्या वेशात राहून विमानातून कोणती शस्त्रे आणली जात आहेत याची माहिती जमवण्यास सुरुवात केली.
-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९