22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home विशेष वाचवा...

वाचवा…

एकमत ऑनलाईन

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या दिवशी मुंबईजवळ काशिमिरा परिसरात बिबट्याची गरोदर मादी अशाच प्रकारे महामार्गावरील अपघातात ठार झाली. पिंपळगाव राजा परिसरात कवळगावनजीक ज्ञानगंगा अभयारण्याच्या हद्दीतला बिबट्या गेल्याच आठवड्यात मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या दुस-याच दिवशी पातूर-बाळापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. केवळ आठ-दहा दिवसांच्या कालावधीत घडलेल्या या पाच घटना आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यामुळे केवळ त्या-त्या ठिकाणच्या लोकांसाठीच दिवसभर चर्चेचा विषय ठरल्या.

कारण राज्यभर दिवाळीची धामधूम सुरू होती. परंतु दिवाळीच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्यातून खूपच दु:खद बातमी आली. पैठण तालुक्यातल्या आपेगावजवळ बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी पिता-पुत्राचा दुर्दैवी अन्त झाला. या ठिकाणी आसपासच्या शिवारातच बिबट्या दबा धरून बसलाय. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये त्याने एका शेतक-याचा जीव घेतला होता. त्यामुळे परिसरातले लोक खूप घाबरलेत. अगदी कमी कालावधीत, लागोपाठ घडलेल्या या घटनांनी एक स्पष्ट संदेश दिलाय. बिबटे आणि इतर वन्यजिवांच्या रक्षणासाठी त्याचप्रमाणे त्यांच्यापासून नागरिकांच्या रक्षणासाठी राज्याच्या वनविभागाने सर्वंकष धोरण आखण्याची वेळ आता आलीय.

मानव-वन्यजीव संघर्षाचा विषय आता नवीन राहिलेला नसला तरी ताज्या घटना-घडामोडी या विषयाची व्याप्ती आणि जटिलता वाढली असल्याचे दाखवून देणा-या आहेत. विदर्भात पंधरा दिवसांत तीन वाघ मृतावस्थेत सापडलेत. गोंदिया शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर घडलेली शिकारीची ताजी घटना तर क्रौर्याच्या सीमा ओलांडणारी आहे. रविवारी रात्री एका शेतात वाघाच्या शरीराचे तुकडे आढळून आले. या वाघाला विजेचा शॉक देऊन आणि विषप्रयोग करून मारलं असावं, असा संशय आहे. वाघाच्या पायांची नखं आणि शेपटी गायब आहे. काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी वनक्षेत्रात झालेला वाघाचा मृत्यूही वीजप्रवाहामुळे झाल्याचा अंदाज आहे. ताडोबात तीन बछडे आढळले; पण त्यांची आई अद्याप सापडलेली नाही.

तीनपैकी एक बछडा मृत्युमुखी पडलाय आणि दोघांवर उपचार सुरू आहेत. वाघिणीची शिकार झाल्याचा संशय व्यक्त होतोय. विदर्भात कधी वाघाचा मृतदेह सापडतो तर कधी नागरिकांवर हल्ले करणा-या नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी पुढं येते. माणसांना वाचवायचं की वन्यजिवांना? असा विचित्र पेच निर्माण होतो. वन्यजीव निसर्गसाखळीचे घटक असल्यामुळे त्यांना वाचवायला हवंच; पण ते मानवी वस्तीत येणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यायला हवी. वन्यजीव प्रामुख्याने महामार्गावरच्या अपघातांत ठार होतायत. काही वेळा तहानलेले वन्यजीव विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. या जिवांच्या भ्रमणमार्गातून आपले महामार्ग गेल्यामुळे निर्माण झालेला पेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने सोडवावा लागेल.

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या