Saturday, September 23, 2023

गणेशपूजेचे शास्त्र

गणपती हे संरक्षणाचे नि मांगल्याचे प्रतीक असून पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले आहे. पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणा-या सर्व संकटांचे हरण करावे अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना नि पूजा करीत असतो तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते. हे पूजन कसे करावे, षोडषोपचार पूजेचे महत्त्व काय, गणपतीला कोणती फुले वाहावीत आणि मुख्य म्हणजे यंदा पूजेसाठी मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे-

णपती हा विघ्नहर्ता आहे, कोणत्याही संकटातून तो आपल्याला बाहेर काढू शकेल, अशी लोकांची श्रध्दा असते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच बहार येते. सर्व दैवतांमध्ये गणपतीचं पूजन अग्रक्रमाने करावं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे या आद्य दैवताच्या पूजेसाठी प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने तयार होत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना मोठ्या भक्तीभावाने केली जाते. गणपती हे संरक्षणाचे आणि मांगल्याचे प्रतिक असून पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले आहे. आपल्या घरातील गणपतीचे पूजन कसे करावे, षोडशोपचार पूजनाचे महत्त्व काय? ते कशा प्रकारे करावे? गणपतीची मूर्ती कशी असावी याबाबत अनेक भक्तांच्या मनात संभ्रम असतात. त्याबाबतच आपण जाणून घेऊ.

दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना आणि पूजन केले जाते. हा पूजाविधी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पार्वतीने गणपतीची स्थापना संरक्षणाच्या उद्देशाने केली होती. पार्वतीमाता स्रान करत असताना या गणपतीने संरक्षण करावे, कोणालाही आत येऊ देऊ नये अशी पार्वतीची आज्ञा असल्यामुळे भगवान शंकर आल्यावरही गणपतीने त्यांना प्रतिबंध केला. त्यामुळे शंकरांनी त्याचे मस्तक उडविले. पार्वतीने हे पाहिल्यानंतर तिचा शोक अनावर झाला आणि तिने शंकरांना सांगितले की, हा माझा स्थापित केलेला पुत्र होता. तेव्हा तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करा. त्यावेळी शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा देऊन प्रथम दिसेल त्याचे शीर्ष आणावयास सांगितले. गणांनी हत्तीचे शीर्ष आणले आणि ते शंकरांनी गणपतीच्या मृत शरीरावर बसवले. त्यानंतर गणपती हा ‘गजानन’ या अर्थाने प्रसिद्ध झाला.

पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणा-या सर्व संकटांचे हरण करावे अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो. तसेच मांगल्याचे प्रतिक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते. हे पूजन किती दिवस करावे याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. ज्यांच्याकडे परंपरेने जितके दिवस हा उत्सव असेल तितके दिवस रोज त्याची पूजा करावी. काहींच्या घरी दीड दिवसांचा, काहींच्या घरी पाच दिवसाचा, काहींच्या घरी गौरींबरोबरचा, तर काहींच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. जेवढे दिवस गणपती घरात असेल तेवढे दिवस दररोज नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ त्याची पूजा अर्चा, आरती अवश्य करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा.

मूर्ती कशी असावी?
घरी स्थापन करण्यासाठी मूर्ती आणली जाते, तेव्हा ती वितभर म्हणजे ६ ते ८ इंच उंचीची असावी. ती आसनस्थ म्हणजे दोन्ही पायांची मांडी घातलेली असावी किंवा एक पाय खाली सोडलेला असावा. मूर्तीची मुद्रा सुबक आणि प्रसन्न वाटेल अशी असावी. विशेषत: गणपतीचे डोळे शांत आणि प्रसन्न अशा प्रकारचे असावेत. कारण डोळ्यांमध्येच सगळे भाव असल्यामुळे ते जर सुबक असतील तर संपूर्ण मूर्ती ही सुबक आणि संपन्न वाटते. गणपतीला गळ्यात हार घालता येईल अशा प्रकारची मूर्ती असावी. अन्यथा काही ठिकाणी हात कानाला चिकटलेले असतात. अशा वेळी हार घालता येत नाही. मूषक हे गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचे पायाशी चित्र असावे. तसेच हातात फूल, मोदक, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हातात शस्त्र असावे. ही मूर्ती मातीची अथवा शाडूची असावी.

गणेशाची मूर्ती बनवताना एखाद्या मूर्तीकाराने मूर्तीची सोंड उजवीकडे वळवलेली असते. काही जणांच्या मनात याबाबत थोडासा संभ्रम आहे. परंतु गणपतीची सोंड डावीकडे असावी क उजवीकडे असावी या पाठीमागे कोणतेही चांगले अथवा वाईट कारण नाही. समर्थ रामदासांनी गणपतीचे वर्णन करताना ‘सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना’ असे वर्णन केले आहे. त्यामुळे उजवीकडे किंवा डावीकडे सोंड वळलेली असली तरी त्यामुळे काही बिघडत नाही. मूर्तीचे पूजन करून आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी व्हावी, याच हेतूने पूजा केली जाते. त्यामुळे डावीकडे सोंड असलेला गणपती मवाळ आणि उजवीकडे सोंड असलेला गणपती कडक असा विचार भाविकांनी मनात आणू नये.

पूजा कशी करावी?
पूजा हा एक उपचार असतो. त्यामध्ये भक्तभाव हा महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा गणपतीची मूर्ती आणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येण्यासाठी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून आवाहन केले जाते. स्रान, पंचामृत स्रान, उष्णोदक स्रान, अथर्वशिर्ष म्हणून अभिषेक यावेळी केला जातो. हे सर्व करताना गणेशाची मूर्ती पार्थिव असल्यामुळे फुलांनी पाणी शिंपडून हे उपचार करावेत. गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी त्याची षोडशोपचार पूजा झाली पाहिजे. नंतर मात्र पंचोपचार पूजा केली तरी चालते. षोडषोपचारे पूजा म्हणजे, आवाहन, आसन, पाद्यस्रान, अर्घ्यस्रान, स्रान, पंचामृत स्रान, अत्तर लावून उष्णोदक स्रान, अभिषेक, गंध, अक्षता, हळद-कुंकू, वस्त्र, सुगंधी द्रव्ये म्हणजे अष्टगंध, शेंदूर इत्यादी, फुले-हार, विविध प्रकारची पत्री, दुर्वांची जुडी, तुळशीची पाने, धुप, दीप, नैवेद्य इत्यादी प्रकारे हे पूजन केले जाते.

-मोहन दाते, पंचांगकर्ते

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या