34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेष‘निवडक मराठी गद्य’

‘निवडक मराठी गद्य’

एकमत ऑनलाईन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदवी द्वितीय वर्गाचा नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये बी. ए. द्वितीय वर्गाच्या मराठी ऐच्छिक विषयाच्या तिस-या सत्रासाठी नेमलेली पाचवी अभ्यासपत्रिका ‘निवडक मराठी गद्य’ ही असून; विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाच्या मान्यतेने या अभ्यासक्रमावरील ‘निवडक मराठी गद्य’ याच नावाचे पुस्तकही संपादित करण्यात आले आहे. या पुस्तकातील अभ्यासघटक याआधीच मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. जयद्रथ जाधव यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या, बी. ए. पदवी मराठी फेसबुक लाईव्ह अभ्यासक्रम अध्यापन या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ परिक्षेत्रातील मराठीच्या जवळपास अध्यापक वर्गापर्यंत तरी पोहोचलेले आहेतच.

परंतु, निवडक वेच्यांचा अभ्यास असतो तेव्हा तो विद्यार्थ्यांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध करून देणे ही अभ्यासमंडळाची एक नैतिक जबाबदारी ठरते.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे सर्वांत कठीण काम कोणते असेल तर ते अभ्यासक्रमाची रचना असते. त्यातही सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असलेल्या भाषा आणि वाङ्मय विषयाचा अभ्यासक्रम ठरविणे, हे त्या अभ्यासमंडळापुढील एक दिव्यच काम म्हणता येईल. मराठी गद्य लेखनप्रकारातील वैविध्यता, अभ्यास घटकांची रचना, त्यांची आकर्षक मांडणी तसेच ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील मराठी भाषा व साहित्यलेखनाची समृद्ध परंपरा दाखवून देणारा अंबाजोगाई येथील खोलेश्वरचा शिलालेख (इ.स.१२२८) आणि पहिल्या पानावरील स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिक्षकांविषयीचे मौलिक विचार या प्रथमदर्शनी नजरेत भरणा-या या ग्रंथाच्या काही ठळक गोष्टी.

अभ्यास घटकांची कौशल्यपूर्ण निवड आणि नेमका, नेटका व आटोपशीर अभ्यास हे या अभ्यासक्रमाचे पर्यायाने या ग्रंथाचे पहिले वैशिष्ट्य म्हणता येते. मध्ययुगीन मराठीतील पत्र, बखर गद्य आणि आधुनिक साहित्यातील चरित्र, प्रबोधनपर वैचारिक लेख, आत्मचरित्र, अनुभव, ललित लेख व व्यक्तिचित्र अशा वेगवेगळ्या गद्य लेखनप्रकारातील वेच्यांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे त्या-त्या लेखनप्रकारातील निवडलेले मौलिक वेचे ही होय.

मूल्यसंस्काराबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सकवृत्ती वाढीस लागावी, त्यांचा पिंड वैचारिक बनावा आणि विवेकी, वस्तुनिष्ठ व मुद्देसूद मांडणीची त्यांना सवय व्हावी या हेतूने निवडलेले; डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ या ग्रंथातील ‘विवेकानंद : धर्म आणि विज्ञान’ हा चरित्र उतारा आणि ‘प्रबोधन’ या लेखनप्रकारातील डॉ. आ. ह. साळुखे यांचा ‘वैदिक परंपरेची घमेंड’ हा लेख हे दोन्हीही वेचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि साहित्याच्या अभ्यासातून त्यांना अप्रत्यक्षपणे साहित्य लेखनाला चालना देणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने या ग्रंथातील आत्मचरित्र, अनुभव आणि ललितलेख या लेखन प्रकारातील वेचे महत्त्वाचे ठरतात. इंद्रजित भालेराव यांचा ‘गायी घरा आल्या’ हा ‘ललित लेख’ ग्रामीण लोकजीवन, कृषी संस्कृतीच्या दर्शनाबरोबरच ‘प्राणिमात्रांवर दया करावी’ तसेच ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असल्याची जाणीव करून देतो. या दोन्ही लेखांतील प्रांजळपणा वाचकाला भावतो. श्रद्धा आणि सबुरीची शिकवण मिळते व थोरामोठ्यांचा आदर करावा हे मूल्य यातून संस्कारित होते.

डॉ. अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या ग्रंथातून घेतलेला ‘शांती’ हा लेख ‘अनुभव’ या लेखन प्रकारातील असून; माणसाची उमेद वाढवणारा, जगण्यावर निष्ठा असावी, माणसाने जीवनावर प्रेम करावे असे सांगणारा हा लेख आहे. या पुस्तकातील शेवटचा अभ्यासघटक ‘व्यक्तिचित्र’ या लेखनप्रकारातील असून; त्यात उत्तम सूर्यवंशी यांच्या ‘थोरवी’ या ग्रंथातून घेतलेला, ‘मराठवाड्याचे गांधी : गंगाप्रसाद अग्रवाल’ हा उतारा निवडलेला आहे. हे व्यक्तिचित्र असले तरी यात व्यक्तीचे केवळ दिसणे किंवा त्याचे स्वभाववर्णन नाही; तर अभ्यासक्रमाच्या एकूण भूमिकेशी सुसंगत, महाराष्ट्रातील थोर स्वातंत्र्यसेनानी भाई गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा हा लेख आहे. तसेच गंगाप्रसाद अग्रवाल यांचा ‘मराठवाड्याचे गांधी’असा जो उल्लेख करण्यात आलेला आहे ती गांधीजींशी तुलना नाही, तर आज ‘गांधी’ हेच एक मूल्य बनले असून; ते मूल्य आयुष्यभर जपलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणजे अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवरील मूल्यसंस्काराचाच तोही एक भाग आहे.

विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटल्याप्रमाणे, ‘मूल्यात्मक ज्ञानाची गरज ओळखून’ आणि ‘साहित्याच्या संस्कारामुळे आपली ‘माणूस’ म्हणून असणारी उंची वृद्धिंगत व्हावी’. डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. राजकुमार मस्के आणि डॉ. लहू वाघमारे या संपादक मंडळींनी विशेष कष्ट घेऊन सिद्ध केलेला हा ग्रंथ अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. ग्रंथाचे मुखपृष्ठ, आकर्षक मांडणी, निर्दोष मुद्रणप्रत आणि अभ्यासपूर्ण संपादकीय यातून संपादक मंडळींनी त्यासाठी घेतलेले कष्ट व त्यांचे संपादकीय कौशल्य हेच दाखवून देते. पण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचे पुस्तक म्हणून या ठिकाणी एक गोष्ट नोंदवणे महत्त्वाची वाटते की, छत्रपती शिवरायांच्या पत्रातील अरबी, फारसी शब्दांचे अर्थ यात दिलेले आहेत. तसेच ‘आसमंताभ्दागी’(पृ. ३१), ‘इथॉस’(पृ. ५२), ‘ओनामाशिधम्’(पृ. ५८), ‘गंतव्य’ (पृ.७५) यासारखा शब्दांचेही अर्थ दिले असते तर विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीचे झाले असते.

प्रा. डॉ. यादव सूर्यवंशी
अहमदपूर,मोबा. ९८५०८ ५०३३०

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या