26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषस्वाभिमानी, संवेदनशील

स्वाभिमानी, संवेदनशील

एकमत ऑनलाईन

निरागस भावना, मऊ मुलायम कलिजा असलेला संवेदनशील माणूसच कवी बनू शकतो, असे एक पिढी म्हणत असे. रविकिरण मंडळाचे सर्व कवी भावकवीच होते. भावनांचे व्यामिश्र कल्लोळ त्यांच्या कवितांतून निथळत, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. सोलापूर येथील भावकवी रा. ना. पवार यांनी अत्यंत तरल कविता लिहिली. जन्मभर ते निष्ठेने कवितालेखन करीत राहिले.

सोलापुरातील रेल्वे लाइन्स भागातील मोदीखाना परिसरात एक जुनाट घर. पत्र्यांचं छप्पर. त्यात ते राहात. अतिशय शालीन असा हा कवी. मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात त्यांचा सहवास लाभला. कोणतेही छक्केपंजे नसलेला हा सद्गृहस्थ. मला वेळ मिळाला की मी त्यांच्या घरी गप्पा मारायला जात असे. कधी कधी कॉलेज सुटल्यावर दुपारनंतर मला घराकडे जायला ट्रेन नसायची. ती थेट संध्याकाळीच असायची. तेवढा वेळ मी आपसूकच रा. ना. पवारांच्या घरी जात असे. त्यांच्याशी मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालायच्या. त्यात जुन्या जमान्यातील खूप आठवणी ते जाग्या करायचे.

रा. ना. पवार हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या मनात कुणाविषयी किल्मिष नसे. कितीतरी दु:ख भोगले त्यांनी. त्याला काही पारावारच नव्हता. प्रारंभी गिरणकामगार असलेले रामचंद्र नारायण पवार. त्यांनी भावकविता लिहिली. त्यांच्या कवितेत कधीच अभिनिवेश नव्हता. साधी भावना आणि थेट भिडणारी कविता ते लिहीत. त्यांना शिक्षक होण्याची आवड होती. परंतु ते त्यांना जमले नाही. मात्र आपली ही हौस एका चित्रपटाने पूर्ण केली असे त्यांनी सांगितले. एका जुन्या मराठी चित्रपटात मास्तरांची भूमिका मिळाली होती. सोलापूरचेच कवी संजीव यांची गीते त्या चित्रपटात होती. चित्रपट होता ‘भाऊबीज’. आपले स्वप्न अशा रीतीने पूर्ण झाल्याबद्दल ते कृतज्ञतेने देवाचे आभार मानत.

ते नेहमी सदाचारी माणसांशी मैत्री असावी अशा विचारांचे होते. त्यांची कविता देखील अशी सदाचारी होती. कविता कशी असावी आणि कशी नसावी याविषयी त्यांची एक कविता आहे. वेदना म्हणजे काय हे रा. ना. पवार यांच्याकडूनच समजून घ्यावे. कारण त्यांच्या पोटावर कोठे शस्त्रक्रिया झाली नाही असे नव्हते. जवळ जवळ शरीरभर असे शस्त्राचे वार सोसणारा हा सोशिक कवी. मानसिक वेदना आणि अठराविश्वे दारिद्र्य भोगणारा हा कवी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा यांनी त्यांची गीते गायिली आहेत. आजही ती अजरामर आहेत.

त्या गाण्यातील भाव जसाच्या तसा रसिकांपर्यंत पोहोचावा, अशी रा. ना. पवार काकांची अपेक्षा या दोन्ही गायिकांनी पूर्ण केली. १९५५ मध्ये एच. एम. व्ही. कंपनीने ही रेकॉर्ड तयार केली. दशरथ पुजारी यांचे संगीत असलेले आणि माणिक वर्मा यांनी गायिलेली ही रचना म्हणजे ‘क्षणभर उघडी नयन देवा।।’ देवाला आळवणारी एक अंध मुलगी पंढरपूरला दर्शनाला आली आणि तिने हात जोडून त्या परमपावन पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. हे दृश्य रा. ना. पवार पाहत होते. हे दृश्य पाहून त्यांना आत्यंतिक वेदना झाली. आपल्याला एकवारच दृष्टी दे आणि तुझे मनोहर रूप डोळे भरून पाहू दे, अशी विनवणी जणू ती मुलगी करते, असा भाव या गीतातून रा. ना. काकांनी व्यक्त केला आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हे वचन रा. ना. पवार यांच्या या गीतातून प्रकट झाले आहे.

प्रत्येकाला देव कसा दिसत नाही. तो तसा दिसतो हे कुणी सांगत नाही. तो कुणालाही दिसलेला नसतो. परंतु सर्व संतांनी त्याला हृदयात पाहायला सांगितले. तो कसा असतो हे रा. ना. पवार आपल्या ‘नका विचारू देव कसा । देव असे हो भाव जसा’ या गीतातून सांगतात. ज्याचा जसा भाव तसा देव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील असेच सांगतात. ‘मनी नाही भाव अन् देवा म्हणे पाव। देव बाजारचा भाजीपाला नाही हो।।’ मनी भाव असेल तर तो देव दिसेल. ज्या रूपात त्याला पाहण्याची इच्छा कराल त्याला तो तसा दिसेल. ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो । विसरून गेलो देहभान’ हे कशासाठी तर देवाने आपल्याशी बोलावे, काही तरी बोलावे, यासाठीच तर देवा माझ्याशी बोला.

सावळ्या विठ्ठला। तुझ्या दारी आले
विसरूनी गेले । देहभान ।।

हा अभंग सुमन कल्याणपूर यांनी गायिला. आकाशवाणी मुंबई आणि पुणे केंद्राने ही दोन्ही गीते अजरामर केली आहेत. २ नोव्हेंबर १९९२ रोजी त्यांचे निधन झाले. अत्यंत गरिबीमुळे त्यांनी आपला कवितासंग्रह काढला नाही. त्यांच्या हयातीत तो निघाला नाही. कोणाही नामवंत प्रकाशकाने कधी त्यासंबंधी विचारणा केली नाही. पैसे देऊन संग्रह काढणे त्यांना पसंत नव्हते आणि शक्यही नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मित्रांनी हा संग्रह काढला. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने अनुदान दिले. तेच अनुदान त्यांच्या हयातीत दिले असते तर… पण ते त्यांच्या नशिबी नव्हते. कवी, कलावंतांना तो शापच असावा जणू. कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार हॉस्पिटलमध्ये नेऊन दिला. त्यानंतर काही दिवसांत त्यांचे निधन झाले. तशीच काहीशी परिस्थिती रा. ना. पवारांच्या बाबतीत झाली असावी.

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
ताळगाव, गोवा. मोबा. ९०११० ८२२९९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या