Tuesday, October 3, 2023

घर विकताय? टॅक्स वाचवा!

रहिवासी मालमत्ता म्हणजे घर खरेदी करून दोन वर्षे उलटून गेली असतील आणि ते घर विकायचे असेल तर त्या व्यवहारात होणारा नफा हा दीर्घकालीन लाभ म्हणजेच लाँग टर्म बेनिफिट मानला जातो. या रकमेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपण प्राप्तिकर वाचवू शकतो. जर घर खरेदी केल्यानंतर दोन वर्षांच्या आत त्याची विक्री केली तर त्यावर मिळणाºया नफ्याला अल्पकालीन भांडवली लाभ मानले जाईल. या नफ्यावरील कर वाचविण्याचा कोणताही मार्ग असत नाही. हा लाभ आपल्या इतर नियमित उत्पन्नाचाच भाग मानला जातो. अन्य स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न या सदरात हे उत्पन्न आपल्या एकूण उत्पन्नात दाखविले जाते. जर अल्पकालीन भांडवली लाभासह आपली करपात्र प्राप्ती २.५० लाखांपेक्षा जास्त आहे तर त्यावर कर भरावा लागेल.

जर घराची विक्री करणारी व्यक्ती साठ वर्षांपेक्षा अधिक आणि ऐंशी वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ३ लाखांपर्यंत असते. जर घराची विक्री करणा-या व्यक्तीचे वय ऐंशी वर्षांपेक्षा जास्त असेल, तर या प्राप्तीवर कोणताही कर द्यावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नाच्या रकमेची मोजदाद आयुर्विमा, मेडिक्लेम, पीपीएफ यातील गुंतवणूक आणि गृहकर्जावरील व्याज भरणा झाल्यानंतर सुरू होते.

घराची विक्री केल्यानंतर जर आपल्याला दीर्घकालीन भांडवली लाभ झाला असेल, तर ही रक्कम दुसरे घर खरेदी करण्यात गुंतविल्यास त्यावरील कराच्या सवलतीचा लाभ घेता येईल. ही सूट घराची विक्री केल्यानंतर दोन वर्षांच्या आत दुसरे तयार घर खरेदी केल्यानंतरच मिळते. जर पहिले घर विकल्यानंतर एक वर्षाच्या आत एखादे घर खरेदी केले असेल तर त्यावरील करसवलतीचा लाभ घेता येतो. अपवादात्मक परिस्थितीत एका घरापासून मिळालेल्या भांडवली लाभाची रक्कम गुंतवून दोन घरांची खरेदी करता येते. परंतु त्यासाठी झालेल्या व्यवहाराची एकूण रक्कम दोन कोटींपेक्षा अधिक नसावी, अशी अट आहे.

ही सवलतही आयुष्यात एकदाच घेता येते. तसेच ही सवलत केवळ भारतात एक घर विकत घेण्याच्या बाबतीतच उपलब्ध आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, भांडवली लाभाची रक्कमआयुष्यात एका घरात एकाच वेळी घरात गुंतविता येते. अर्थात, दोन घरांमधून मिळणाºया भांडवली लाभाची रक्कम एका घरात गुंतवून करसवलतीसाठी दावा करता येतो. दीर्घकालीन भांडवली लाभाची रक्कम दोन कोटींपेक्षा कमी असली तरच ‘वन टाईम आॅप्शन’चा लाभ घेता येतो.

Read More  दहावीत एकाच वेळी माय लेकराचे यश संपादन

जुन्या घराची विक्री केल्यानंतर तीन वर्षांच्या आत नवीन घर बांधल्यास त्याच्या बांधकामासाठी लागलेला खर्च म्हणून भांडवली लाभावर करसवलतीचा दावा करता येतो. बांधकाम सुरू झालेल्या घराचे बुकिंग केले तरी हा व्यवहार बांधकामाच्याच श्रेणीत मानला जातो. जर आपण बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात घर बुक करीत असाल तर तीन वर्षांच्या निर्धारित अवधीत घराचा ताबा मिळेल याची खात्री करून घेणे चांगले. तुम्हाला तुमचे प्राप्तिकर रिटर्न भरायच्या तारखेपूर्वी घर खरेदी करणे किंवा विकसकाला पेमेन्ट करणे यासाठी योग्य त्या भांडवली लाभाचा वापर करावा लागेल. जर आपण भांडवली लाभाची पूर्ण रक्कम त्यासाठी वापरू शकत नसाल तर उर्वरित रक्कम कॅपिटल गेन अकाऊंट स्कीममध्ये जमा करावी लागेल.

या रकमेचा उपयोग कालबद्ध रीतीने याच उद्देशासाठी करावा लागेल. जर आपल्याला तसे करणे शक्य नसेल तर ही रक्कम करपात्र ठरेल. करसवलतीचा दावा करताना ब्रोकरेज, स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क आणि हस्तांतरण शुल्क आदी खर्चही खरेदी किमतीत गणले जाऊ शकतात. नवीन घराची खरेदी किंवा निर्मितीचा मूळ खर्च यात हे खर्च मिळवून करपात्र उत्पन्न मानले जाईल. नव्याने खरेदी केलेले घर किंवा अन्य मालमत्ता तीन वर्षांपर्यंत कुणालाही हस्तांतरित करता येत नाही. जर असे केले तर पूर्वी जी करसवलत मिळाली आहे, ती यावर्षीच्या तुमच्या उत्पन्नातून कापून घेतली जाईल.

सरकारकडून निर्धारित बाँड्समध्ये गुंतवणूक करूनसुद्धा भांडवली लाभावरील करातून सवलत मिळविता येते. याअंतर्गत घर विकल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत राष्टÑीय राज्यमार्ग प्राधिकरण, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ, रेल्वे वित्त महामंडळ आदींच्या कॅपिटल गेन बाँड्समध्ये भांडवली लाभाची रक्कम गुंतवून करसवलतीचा लाभ घेता येतो. या बाँड्सचा कालावधी पाच वर्षांसाठीचा असतो. या कालावधीत हे बाँड्स मोडता येत नाहीत किंवा गहाण ठेवता येत नाहीत. असे केल्यास करसवलतीचा लाभ परत घेतला जातो.

Read More  कोविड-१९ प्रादुर्भाव काळात डॉक्टरांवर हल्ला होणे हे गंभीर बाब

या बाँड्सवर आपल्याला वर्षाकाठी ५.२५ टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र असते. अर्थात बाँड्स मॅच्युअर झाल्यानंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. या बाबतीत एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे ती म्हणजे, घराची विक्री केल्यानंतर मिळणाºया भांडवली लाभावरील व्याजातून सूट मिळविण्यासाठी नवीन घरात किंवा बाँड्समध्ये गुंतवणूक करावी लागते. आपल्याला घराची विक्री करताना पूर्ण रक्कम मिळालेली नसली, तरीही अशी गुंतवणूक करावी लागते. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, एका देवाणघेवाणीच्या व्यवहारात मिळालेली रक्कम रक्कम वरील बाँड्समध्ये गुंतविताना एका वर्षात ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम गुंतविता येत नाही. अर्थात, एकाच घराच्या बाबतीत दोन्ही पर्यायांच्या माध्यमातून करसवलतीचा दावा करण्यावर कोणतेही बंधन नाही.

दखल
विधिषा देशपांडे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या