29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeविशेषज्येष्ठ सर्वश्रेष्ठ

ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ

एकमत ऑनलाईन

ज्येष्ठ नागरिक म्हणजे इंग्रजीमध्ये सिनिअर सिटीझन! सिनिअरचा अर्थ ज्यांना अनुभव खूप जास्त आहे. जगात सर्वच देशांत ज्येष्ठ नागरिकांना मानाचे स्थान आहे. त्यांच्यासाठी ब-याच सुविधा, सवलती सरकारांनी दिलेल्या आहेत. तसाच समाजातही ज्येष्ठांना मानसन्मान, आदर आहे. आज कितीतरी ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मंडळे स्थापन झालेली आहेत.

रोजचे जीवन जगत असताना एकदम एखाद्या दिवशी तुम्ही सेवानिवृत्त होता. हार, तुरे, चांगल्या कार्याचा गौरव घेऊन, स्वत:ची तारीफ, सोबत्यांची-सहका-यांची आपल्याविषयीची चांगली मते, थोडासा गहिवर, क्वचित तरळणारे डोळ्यातले पाणी पापणीआड करीत घरी येता. घरीही चांगले स्वागत लेक-सुनेकडून, जावयाकडून होते. बायकोकडून डोळाभर कौतुक होतं. ‘बाबा आता आराम करा! खूप कष्ट घेतले. आता मनासारखे जगा! निवांत उठा! आरामात पेपर वाचा! बागेतला झोपाळा तुमच्यासाठी तयार होऊन वाट बघतोय!’ असे मुलांचे संवाद कानात पडतात. किती आनंदात आपण झोपी जातो! उद्याचा सूर्य वेगळा असेल! उद्याची पहाट वेगळी राहील! दुपार, सायंकाळ आणि रात्र वेगळी राहील. मनावरचंं दडपण नाहीसं झाल्याचं स्वप्न रंगवत आपण झोपेच्या आधीन होतो.

दुस-या दिवशी घरातली सकाळ! रोजचीच धावपळ! फक्त आपण तेवढे निवांत! स्वयंपाकघरात सुनेची, बायकोची गडबड-धांदल सुरू असते. नातवाचा किंवा नातीचा डबा तयार होत असतो. मुलांची घाईगडबड सुरू असते. मध्येच बायकोच्या नावाचा पुकारा होतो. आपली बायको पण तशीच घाईत असते. ‘आज्जीऽऽ’ असा नातवाचा पुकारा होताच ‘आले रे’ चा स्वर उंच टिपेला लावत धावत असते. सुनेच्या सूचना तिच्या मुलाला आणि सासूच्या मुलाला सारख्याच आवाजात सुरू असतात. काहीच सुचत नाही. आत-बाहेर चकरा मारून काय करावं हे कळत नाही. बायको गालातल्या गालात हसत राहते. सुनेकडे पाहून डोळे मिचकावते. सूनही गालात हसते! मुलगा जरा विचारात दिसतो.

बाबा तुम्ही पेपर नंतर वाचाल का? मी फक्त हेडलाइन्स पाहतो, असं म्हणत हातातून पेपर घेतो. अशा वेळी काय करावं हे कळत नाही. थोड्याच वेळात घर शांत होतं. बायको जवळ येते. चहाचा कप हातात देते. ओशाळवाणे हसत बसल्यासारखी करत विचारते, ‘‘अहो स्वयंपाकघरात येता का? तुम्ही चहा घ्या तोवर मी भाजीची तयारी करते.’’ चहा होेतो. मग नंतर वेळ जात नाही. ऑफिसमधल्या सहका-यांची आठवण यायला लागते. दिवसाचा हा वेळ ऑफिसात किती घाईगर्दीचा असतो. आता मात्र रिकामपण! असं रिकामंपण पूर्ण दिवसात थोड्या थोड्या वेळानं भेटणारच! आणि भरगच्च दिवसांच्या, आधीच्या आठवणी आठवणारच! कालाय तस्मै नम:!

रात्रीची जेवणं होेतात. झोपेची वेळ होते. दिवसभरात न भेटलेली बायको आईच्या मायेनं जवळ येते. कपाळावर हात ठेवून थोपटल्यासारखं करत सांत्वन करते, ‘‘निवांत रहा, आठ-दहा दिवसांत मार्ग नक्की सापडेल! इतक्या वर्षांच्या व्यस्त जीवनाची सवय! आता बदलणार! कोणत्याही बदलासाठी तयारीचा वेळ हा व्यक्तीपरत्वे भिन्न असतो. पण नंतर सर्वच छान होतं. माझ्यावर विश्वास ठेवा.’’ दिवसभराची तगमग संपलेली असते. शांतपणे झोपेच्या आधीन झालेलो असतो. खरंच आहे, कोणताही बदल स्वीकारणे कठीणच असते. सेवानिवृत्ती किंवा साठी म्हणजे जीवनाचा थांबा नाही. तर पुन्हा नव्याने सुरुवात होय. फक्त त्याचा स्वीकार सकारात्मक हवा! फरक एवढाच असतो. आपण पहिल्या बेंचवरून मागच्या बेंचवर जातो. त्यातही मानला तर आनंदच आहे. आपणच वाढविलेल्या मुलांचे पालकत्व, जबाबदारीने पूर्ण केलेली कर्तव्ये याचा सार्थ अभिमान असावा, अहंकार नाही! अभिमान आणि अहंकारात कधीही गफलत करू नये. मुलांनाच नाहीतर घरातल्या सर्वांना आपण आपले वाटायला हवे. या वयात मीठ आणि सल्ला विनाकारण वापरल्यास वाया जातो. हे लक्षात ठेवलं की निवृत्तीनंतरचं जीवन सुखनैव होऊ शकतं.

आज कुटुंबापेक्षाही समाजाला ज्येष्ठांची गरज आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना प्राधान्य आहे. आज एकल कुटुंबपद्धती आहे. नवरा-बायको-मुलं! वाढत्या महागाईच्या काळात दोघांनी काम करणं गरजेचं बनलं आहे. अशावेळी मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं किंवा मुलं साभाळायला बाई ठेवणं हा पर्याय निवडला जातो. आज जग झपाट्याने बदलतंय. लहान वयात निरनिराळी प्रलोभनं, मोबाईल यामुळे मुलांचं लहानपण फार लवकर संपत चाललंय. वाईट सवयी लागणं नित्याचं होऊन बसलंय. अशा वेळी वडीलकीचा आश्वासक हात आधाराचा ठरतो. दोन्ही बाजूंनी सुजाणता असल्यास समस्या राहातच नाही. जशी कुटुंबात तशी समाजातही ज्येष्ठ नागरिकांची निकड आहे. देशाला वैज्ञानिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या प्रगत करायचे असेल तर तरुण पिढीला भरपूर मेहनत करावी लागते. अशा वेळी समाज संस्कारान िसुसंस्कारित करीत नेण्यासाठी नव्या उमलत्या पिढीवर संस्कार करण्याचे काम अनुभवी हातांनी हातात घेतले तर देशाचे भवितव्य सुरक्षित, सुसंस्कारित होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. सुरक्षित, ऊबदार घरं असतील तर देशही चांगला एकसंध राहील. म्हणूनच सिनिअर सिटिझन ही देशाची मजबूत फळी आहे.

– अरुणा सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या