25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeविशेषलोकप्रिय सिनेगीतांचे ‘शास्त्र’

लोकप्रिय सिनेगीतांचे ‘शास्त्र’

एकमत ऑनलाईन

एखाद्याला सहजपणे विचारले की, तुला कोणते संगीत आवडते, तर तो लगेचच एखाद्या चित्रपटाचे गाणे म्हणून दाखवेल. कारण हिंदी चित्रपट संगीताची लोकप्रियताच एवढी आहे की प्रत्येकाच्या ओठी कोणते ना कोणते गीत रेंगाळत असते. यामुळे सिनेसंगीत हेच खरे भारतीय संगीत आहे, असे चित्र एकप्रकारे निर्माण झाले आहे. पण या गीतांना शास्त्रीय संगीताचा साज आहे, बैठक आहे हे विसरता येणार नाही. किंबहुना, शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेली किंवा त्या धाटणीतून तयार झालेली गाणीच बहुमुखी लोकप्रिय झालेली दिसतात.

भारतरत्न गायिका स्व. लता मंगेशकर, आशा भोसले, गायक किशोर कुमार, मोहंमद रफी यांसारख्या जुन्या काळातील गायकांची गाणी कित्येक वर्षे लोटली तरी अनेकांना ती तोंडपाठ आहेत. हा हिंदी चित्रपट संगीताचा करिष्मा आहे. वास्तविक आपल्या देशात शास्त्रीय संगीताला खूपच मोठे स्थान आहे. संगीत घराणे आणि संगीतकारांची मोठी परंपरा लाभली आहे. शास्त्रीय रागांचा हिंदी चित्रपटगीतांशी थेट संबंध नसतो, परंतु या गीतात शास्त्रीय संगीत दडलेले असते. एका अर्थाने हिंदी चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीताचाच एक भाग आहे. हिंदी संगीताने शास्त्रीयतेचे बंधन काढून गीत सोपे करण्याचे काम केले आहे. शास्त्रीय संगीत हे पूर्वी राजदरबारातील वैभव असायचे. परंतु हिंदी चित्रपट संगीताचा बोलबाला वाढल्यानंतर शास्त्रीय संगीतावर मर्यादा आल्या, मात्र लोकप्रियतेत घट झाली नाही. असे असतानाही अभिजात चित्रपटातील गाणे हे शास्त्रीय संगीतावरच रचले गेले हे विशेष.

हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगीताची परंपरा पाळली जात नाही. हे एकप्रकारे मुक्त संगीत आहे. यात शास्त्रीय संगीताची शैली आणि नाद सोयीने वापरला जातो. अशीच स्थिती शास्त्रीय वाद्यांची आहे. अनेक चित्रपट संगीतात तबल्याचा, सतारचा वापर केला गेला आहे. तबला तर उत्तर भारतीय वाद्य आहे. कर्नाटक संगीतात पखवाजचा उपयोग केला जातो. आता तर शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचे फ्युजन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शास्त्रीय संगीताशी निगडीत गीते आजही लोकप्रिय आहेत. मोरा पिया मोसे बोलत नाही (राजनिती), अलबेला सजन आयो रे (हम दिल दे चुके सनम), आओगे जब तुम साजना (जब वुई मेट), ओरे पिया (आजा नच ले) सारखी गीते ही शास्त्रीय संगीताचीच देणगी आहेत. चित्रपटाच्या नामांकित संगीतकारांनी देखील कोणत्या ना कोणत्या गुरूंकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. एस. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी- आनंदजी यांचे मूळ शिक्षण शास्त्रीय संगीतातच झाले आहे. संगीत विद्यालयात अध्यासन केल्यानंतर ते नामांकित संगीतकार म्हणून विख्यात झाले. लखनौच्या मॅरिस म्युझिक कॉलेजमधून बाहेर पडलेल्या निष्णात संगीतकारांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यात सरस्वती देवी, मदनमोहन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

‘बैजू बावरा’चे संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत शास्त्रीय संगीत आणले. १९५२ मध्ये ‘बैजू बावरा’ चित्रपट सुपरहिट ठरला आणि याचे श्रेय शास्त्रीय संगीतालाच गेले. नौशाद यांनी ‘अनमोल’, ‘शहाजहाँ’, ‘मदर इंडिया’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले आणि त्यांचे नाव घराघरांत पोचले. ‘बैजू बावरा’चे गीतकार शकील बदायुनी यांना नौशाद यांनीच आणले होते. मात्र त्यांना या चित्रपटासाठी उर्दू सोडावी लागली आणि हिंदीत गीत लिहावे लागले. गीताबरोबरच भजन ‘मन तडपत हरि दर्शन को आज’ हे देखील संगीतबद्ध केले. नौशाद यांनी ‘बैजू बावरा’साठी डी. व्ही. पलुसकर आणि उस्ताद आमिर खाँ यांच्या आवाजाचा वापर केला. नौशाद यांनी शास्त्रीय संगीताचा कौशल्याने वापर करत गीतांची रचना केली. १९७२ मध्ये ‘पाकिजा’चे संगीतकार गुलाम मोहंमद यांच्या निधनानंतर नौशाद यांनी या चित्रपटाचे संगीत पूर्ण केले. ‘अंदाज’, ‘दुलारी’ यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून लता मंगेशकर यांचे करिअर बहरले. नौशाद यांनी चित्रपटात बासरी, सतार, सारंगीचा प्रथमच वापर केला.

मूक चित्रपटांना आवाजाची देणगी लाभल्यानंतर संगीताची परंपरा सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणजे हिंदी चित्रपटांची लोकप्रियता पाहून शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गजांनी हिंदी चित्रपटात योगदान दिले. प्रख्यात बासरी वादक पन्नालाल घोष हे करिअरच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटाशी जोडले गेले. १९५७ मध्ये ‘बसंत बहार’ मध्ये लता मंगेशकर यांचे ‘मै पिया तेरी तू माने या ना माने…’ या गीतात बासरीचा वापर केला. त्यासाठी पन्नालाल घोष यांना दिल्लीहून मुंबईला आणले होते. त्यांच्या बासरीने या गाण्याला अमरत्व मिळाले. सरस्वती देवी यांची संगीतकार होण्याची कहाणी देखील वेगळी नाही. हिमांशू रॉय यांच्या सांगण्यावरून त्यांनी हिंदी चित्रपटाला संगीत दिले. त्या शास्त्रीय गायनात माहिर होत्या. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती पहिली महिला संगीतकार म्हणून. ‘अछूत कन्या’ आणि ‘जीवन नैया’ या चित्रपटांना सरस्वती देवी यांनी संगीत दिले आणि इतिहास घडला. ‘गूंज उठी शहनाई’चे गीत ‘तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए’ मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी वाजवलेल्या सनईचे स्वर आजही कानसेनांच्या मनात घोळत आहेत.

उस्ताद अल्लारखा खाँ यांनी १९५० च्या दशकात सुमारे २० चित्रपटांना संगीत दिले. यात ‘सबक’ आणि ‘बेवफा’ चित्रपटाची अधिक चर्चा झाली. सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांनी १९५२ मध्ये ‘आँधिया’ चित्रपटाला संगीत दिले. सतारवादक पंडित रविशंकर यांनी ‘धरती का लाल’मध्ये पहिल्यांदा संगीत दिले. चेतन आनंद यांचा चित्रपट ‘नीचा नगर’ ला रविशंकर यांचेच संगीत होते. १९६० मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘अनुराधा’ आणि ‘गोदान’ चित्रपटाला रविशंकर यांनी संगीत दिले. बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि संतुरवादक शिवकुमार शर्मा या शिव-हरी नावाच्या जोडीने हिंदी चित्रपटांना एकाहून एक सरस गीते दिली आहेत. १९८२ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटाला या जोडीने पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर याच बॅनरखाली ‘डर’, ‘लम्हे’, ‘चांदणी’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले.

या चित्रपटांनी तिकिटबारीवर घवघवीत यश मिळविले. त्यात शिव-हरी यांच्या संगीताचा मोठा वाटा राहिला आहे. राग आणि हिंदी चित्रपट गीत राग आणि हिंदी चित्रपट संगीत यांचा जवळचा संबंध आहे. यात राग बिहाग, राग भैरवी, भीमपलासी, राग भूपाळी, राग दरबारी कानडा, राग देस, राग जयजयवंती, राग जौनपुरी, राग काफ, राग केदार याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या रागांवर आधारलेली गीते लोकप्रिय ठरली आहेत. राग यमनवर आधारित हिंदी गाण्यांची संख्या लक्षणीय आहे. चित्रपटात बहुतांशवेळा यमन कल्याण रागाचा वापर केलेला दिसून येतो. गाणे जुने असो किंवा नवीन असो यमन कल्याण रागाचा वापर हा प्रत्येक कालखंडात झाला आहे. मराठी चित्रपटात देखील शास्त्रीय संगीताचा वापर झालेला दिसून येतो. अलीकडच्या काळात लोकप्रिय ठरलेला ‘कट्यार काळजात घुसली’ (२०१६) या चित्रपटाचे उदाहरण घेता येईल. याशिवाय अष्टविनायक (१९७९) चित्रपटाचा देखील उल्लेख करता येईल.

-सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या