22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषभाजपात खांदेपालट, सामाजिक समीकरणांची फेरमांडणी !

भाजपात खांदेपालट, सामाजिक समीकरणांची फेरमांडणी !

एकमत ऑनलाईन

राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाने पक्षांतर्गत फेरबदल केले आहेत. तोडफोड करून महाविकास आघाडीचे सरकार तर घालवले, पण आघाडीतील तीन पक्ष एकत्रितपणे लढले तर पुढची निवडणूक सोपी असणार नाही, याची जाणीव भाजपा नेतृत्वाला आहे. त्यामुळे जुन्या चुका दुरुस्त करून सामाजिक समीकरणाची फेरमांडणी सुरू केली आहे. २०१९ साली ज्यांना उमेदवारी नाकारली होती, त्या बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन २०२४ च्या तिकिटवाटपाचे अधिकार दिले आहेत. शिवसेनेवर निर्णायक आघात करण्याची रणनीती आखून मुंबई भाजपाला मराठी चेहरा दिला आहे.

तब्बल अडीच वर्षाच्या अथक परिश्रमानंतर शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तांतर करण्यात अखेर भाजपाला यश मिळाले. सत्ता आली असली तरी ती निवडणुकीच्या मार्गाने आलेली नाही. कोणाच्याही कुबड्या किंवा आधार न घेता निवडणुकीच्या मार्गाने स्पष्ट बहुमत मिळवून एकहाती सत्ता हवी असेल तर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी लागेल याची पूर्ण जाणीव भाजपा नेतृत्वाला आहे. त्यामुळे सत्तांतर होताच थोडाही वेळ न घालवता त्यांनी हे काम सुरू केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर आशिष शेलार यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार उलथवले असले तरी हे तीन पक्ष एकत्र राहिले तर पुढील निवडणुकीत यश मिळवणे सोपे नाही याची जाणीव असल्याने नवीन मांडणी करण्याचाही प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पहिल्यापेक्षा अधिक यश मिळवत केंद्रातील सत्ता कायम राखल्यानंतर महाराष्ट्रातले राजकारणही बदलून गेले होते. दोन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भाजपात जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती. तीन-तीन पिढ्या काँग्रेस-राष्ट्रवादीत घालवलेली बडी घराणी भाजपात सामील झाली. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा आकडा सव्वादोनशेच्या पुढे जाईल, दोन काँग्रेस ५० पर्यंतही पोचू शकणार नाहीत, असे अंदाज राजकीय पंडित व्यक्त करत होते. लढण्यासाठी समोर कोणी पैलवानच नाही, अशा वल्गना काही नेते करत होते. त्या आत्मविश्वासाच्या बळावर एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आदी मातब्बर उमेदवारांची तिकिटं कापण्यात आली. खडसेंवर आरोप झाले असल्याने व तावडे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याने त्यांचा पत्ता कापला गेला असावा असे दिसत होते. पण तेव्हा ऊर्जामंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता का कापला गेला याचे कोडे भाजपाच्याही राज्यातील नेत्यांना पडले होते. बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असले तरी फडणवीस यांच्याशीही त्यांचे बरे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी दोघांनीही बरेच प्रयत्न केले. पण केंद्रीय नेतृत्वाने आपला निर्णय बदलला नाही. एका बड्या उद्योगपतीच्या तक्रारीमुळे त्यांना घरी बसवण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. कारण काहीही असले तरी तत्त्वशून्य मेगाभरती व खडसे, तावडे, बावनकुळे यांची उमेदवारी कापल्यामुळे गेलेला संदेश भाजपाला महागात पडला. जनसंघापासून केलेले सोशल इंजिनीअरिंग बिघडले. त्यामुळे २०१४ ला स्वबळावर १२३ पर्यंत गेलेल्या भाजपाचा विजयरथ २०१९ मध्ये युती असूनही १०५ वरच अडकला. त्यामुळे शिवसेनेला वेगळी भूमिका घेण्याची संधी मिळाली व हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपाला गमवावा लागला होता.

ओबीसी जनाधार परत आणण्याचा प्रयत्न!
बावनकुळे हे ओबीसी समाजाचे, विदर्भात राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणा-या तेली समाजाचे नेते आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्याचा परिणाम अनेक मतदारसंघांत झाला होता. त्यामुळे निवडणुकीत २७ ओबीसीबहुल मतदारसंघांत बावनकुळे यांना प्रचारासाठी फिरवण्यात आले. तरीही मोठा फटका बसला. २०२० साली नागपूर पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार अनिल सोले यांना बावनकुळे यांच्याप्रमाणेच उमेदवारी नाकारली गेली व संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. यामुळे नागपूर या बालेकिल्ल्यात ५८ वर्षांत प्रथमच भाजपावर पराभवाची नामुष्की आली. काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ओबीसींची नाराजी हे त्यामागील मुख्य कारण होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रोखले होते. ते परत मिळवण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू होते. आरक्षण कोणामुळे गेले यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने अखेर ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित केले. हा निर्णय योगायोगाने शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर झाला. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्वाभाविकच सत्ताधारी मंडळी करत आहेत. पण ओबीसी आरक्षण मिळाले असले तरी ते सरसकट २७ टक्के राहिलेले नाही. एकत्रितपणे विचार केला तर सरासरी १८ ते १९ टक्के आरक्षण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसींमधील कमी झालेला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न यामागे असावा हेच यातून स्पष्ट दिसते. २०१९ ला ज्यांना उमेदवारी नाकारली ते बावनकुळे २०२४ च्या निवडणुकीत तिकिट वाटप करणार आहेत.

मुंबईसाठी घमासान लढाई !
२०१९ ला सत्ता जाण्यास कारणीभूत झालेल्या चुकांची दुरुस्ती भाजपाकडून केली जाते आहे. तावडेंना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली गेली. विधानसभेला उमेदवारी नाकारलेल्या बावनकुळे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आले व आता तर प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर मुंबईत भाजपाने पुन्हा आशिष शेलार हा मराठी चेहरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांना गळाला लावून भाजपने सत्तांतर घडवले, शिवसेनेची शकलं केली असली तरी सामान्य शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या मतदारांत त्या प्रमाणात फूट पडलेली दिसत नाही. विशेषत: मुंबईत अजूनही शिवसेना उभी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईतील सत्तेच्या बळावर शिवसेना महाराष्ट्रभर गेली हा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेला नेस्तनाबूत करायचे असेल तर मुंबईतील सत्ता काढून घ्यावी लागेल याची जाणीव भाजपाला आहे. २०१७ ला राज्यात एकत्र असतानाही भाजपाने हा प्रयत्न केला होता. यावेळी तर तो अधिक जोमाने केला जाणार हे उघड आहे. या पार्श्वभूमीवरच आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेने एवढी वर्षे सत्ता असताना मुंबईकरांसाठी, मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? याबाबत वेगवेगळी मतं असू शकतील. पण शिवसेना ही मुंबईतील मराठी मतदारांची भावनिक गरज आहे हे विसरता येणार नाही. दिवसेंदिवस मुंबईत अल्पसंख्य होत चाललेल्या मराठी माणसाला शिवसेना हा आधार वाटतो. तर त्यांना ज्यांचे वाढते प्राबल्य डाचते तो समाज भाजपाचा पाठीराखा आहे. त्यामुळेच आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याऐवजी आशिष शेलार यांना पुन्हा मुंबईचे अध्यक्ष केले असावे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ८३ जागा जिंकून शिवसेनेच्या तोंडाला अक्षरक्ष: फेस आणला होता. बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांना यशाची पुनरावृत्ती करता येईल का? हा खरा सवाल आहे.

-अभय देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या